नवी दिल्ली : दरवर्षी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) मुख्य सोहळ्यात विविध विभागांच्या तुकड्या पथसंचलन करतात. यंदा यामध्ये भारतीय वायुसेनेच्या तुकडीचे नेत़ृत्व बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख ‘परेड कमांडर’ म्हणून करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. त्या पार्श्वभुमीवर बीडसह महाराष्ट्राला सुखद आणि अभिमानास्पद वाटणारी ही बाब आहे.
देशात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दरवर्षी राजधानीत कर्तव्यपथावर होतो. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विशेष अतिथी उपस्थित असतात. या दिमाखदार सोहळ्याला संबंध देश आणि जग बघतो. भारताच्या सामर्थ्याचे आणि महान संस्कृतीचे दर्शन कर्तव्यपथावरील पथसंचलनातून होते. यामध्ये भारतीय वायू सेनेची तुकडी देखील असते. यंदा वायुसेनेच्या 144 जणांच्या तुकडीचे नेतृत्व 4 अधिकारी ‘परेड कमांडर’ म्हणून करणार आहेत, त्यापैकी फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख एक आहेत.
बीड, पुणे ते दिल्ली... दामिनी देशमुखांचा प्रेरणादायी प्रवास
भारतीय वायू सेनेत फ्लाईट लेफ्टनंट म्हणून कार्यरत असलेल्या दामिनी देशमुख मुळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी गावच्या आहेत. दामिनी देशमुख यांचे वडील निवृत्त न्यायमुर्ती दिलीप देशमुख पुणे विभागाचे माजी सह धर्मादाय आयुक्त आहेत
दामिनी देशमुख यांनी 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई सैनिकी विद्यालय पुणे येथून पूर्ण केले. पुढे पुण्यातूनच यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि भारतीय वायुसेनेची कॉमन ऍडमिशन टेस्ट ही परीक्षा दिली. त्यामध्ये विविध पायऱ्या पूर्ण करून 2019 ला दामिनी देशमुख यांची वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली. त्यावेळी देशातील केवळ119 विद्यार्थी निवड या परीक्षेत झाली होती.
वायुसेनेत निवड झाल्यानंतर हैद्राबाद येथे 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना हरियाणामधील सिरसा येथे फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती दिली गेली. २ वर्षांनी त्यांना बढती मिळाली आणि फ्लाईट लेफ्टनंटपदी त्यांची निवड करण्यात आली. सध्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये त्या कार्यरत आहेत. दामिनी देशमुखांनी अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले आहे. कराटेमध्ये त्यांना ब्लॅकबेल्ट प्राप्त झाला आहे.
गेल्या २ महिन्यांपासून भारतीय वायू सेनेच्या तुकडीच्या १४४ जणांची तुकडी दिल्लीत पथसंचलनासाठी सराव करत आहे. या कठोर सरावातून तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी ४ जणांची निवड झाली. त्यापैकी दामिनी देशमुख एक आहेत.
दिलीप देशमुख, दामिनी देशमुख यांच्या वडीलांची प्रतिक्रिया
आमच्या मुलीचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय वायुसेनेत मोठ्या पदावर जावे, हे दामिनीचे स्वप्न होते. तिने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले. सुरुवातीच्या एक दोन प्रयत्नांमध्ये यश मिळाले नाही तेव्हा आम्ही अन्य परीक्षांबद्दल तिला सुचवले. मात्र ती तिच्या निश्चयावर आणि ध्येयावर ठाम होती. अखेर तिने भारतीय वायुसेनेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. मुलगी म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहेच. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर ती भारतीय वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे, ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठीही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे.
हे ही वाचा