Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Feb 2024 02:44 PM
WashimUposhan News : रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण

Washim Hunger Strike : वाशिमच्या  मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई  करण्याच्या मागणी करीता  काल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले.


१) मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची भ्रष्टाचार, निमयबाह्य कामे आणि अनियमितता करणाऱ्या सहाय्यक कार्यक्रम फौजदारी गुन्ही दाखल करणे.


२) मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायतीने सन २०२०-२०२१ मध्ये दिलेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरीचे प्रस्ताव मंजुरी न देता पंचायत समितीमध्ये प्रलंबीत ठेवणाऱ्या APO आणि प्रभारी गटविकास अधिकारी यांनी २०२३ पर्यंत २०२०-२०२१ च्या प्रस्तावित सिंचन विहीरीना आर्थिक देवान-घेवान करुन दिलेल्या निम्यबाह्य मंजुरीची चौकशी करुन दोषीवर कारवाई करणे


३) सन २०२३-२०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या मंगरुळपीर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कडून प्राप्त झालेल्या सिंचन विहीरीच्या प्रस्तावना त्वरीत मंजुरी द्यावी.


या मागण्या घेऊन उपोषण सुरु करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 

Beed Ganja : 10 किलो गांजा जप्त करत, एका आरोपीला अटक
Beed Crime News : बीडच्या नेकनूर पोलिसांनी एका स्कार्पिओ गाडीमधून 10 किलो गांजा जप्त करून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये एका स्कार्पिओ गाडीमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही गाडी थांबून गाडीची तपासणी केली असता यामध्ये दहा किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सव्वा लाख रुपये असून याप्रकरणी तिघा जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता बीडहून मांजरसुंबा मार्गे ही स्कार्पियो गांजा घेऊन जामखेडला जात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली..

 

रात्रीच्या वेळी चौसाळा येथील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना स्कार्पिओ गाडीवर त्यांना संशय आला आणि त्यांनी या गाडीची तपासणी केल्यावर यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी गाडीसह एका आरोपीला अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत ते सध्या फरार असून नेकनूर पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
Thane Water Issue : ठाण्यातील काही भागात पाणी नाही

Thane News : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये काही भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शळी टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरूवार दि. 22/02/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दि. 23/02/2024 रात्री 12.00 वाजेपर्यत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.



या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.26 व 31 चा काही भागवगळता) आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये उद्यापासून महासंस्कृती महोत्सव

Ahmednagar News : अहमदनगर येथे सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहमदनगर शहरात चार दिवसाच्या महासंस्कृती महोत्सवाचा आयोजन करण्यात आल आहे. शहरातील भिस्तबाग परिसरात या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत, याबरोबरच नगरकरांसाठी व्यावसायिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

Nanded Drone for HSC Exam : नांदेड जिल्हात 12 वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर

Nanded News : नांदेड जिल्हात 12 वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. कंधार तालुक्यातील पानभोसी गावातील सुभाषचंद्र बोस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ड्रोनचा वावर करण्यात आला. परीक्षा केंद्रात बाहेरून कोणी कॉप्या देण्यासाठी येऊ नये आणि आला तर तो कॅमेरात कैद व्हावा, या उद्देशाने हा ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.

HSC Exam Dhule : धुळे जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
Dhule News : महाराष्ट्राच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात या परीक्षेसाठी 24 हजार 309 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून जिल्ह्यातील 46 केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. यात धुळे शहरात 7 धुळे ग्रामीणमध्ये 15 साक्री तालुक्यात 10 शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी सात सात अशा एकूण 46 केंद्रांवर परीक्षा होणार आहे, जिल्ह्यात एकूण 11 अति संवेदनशील केंद्र असून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोबाईल स्मार्टवॉच आणि अन्य उपकरणे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे जिल्ह्यातील अति संवेदनशील केंद्रांमध्ये धुळे शहरात एक धुळे ग्रामीण मध्ये पाच शिरपूर शिंदखेडा तालुक्यात एक आणि साक्री तालुक्यामध्ये तीन केंद्रांचा समावेश आहे.
Malegaon News : मालेगावला मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत, पालकमंत्री भुसेंच्या कार्यालयासमोर जल्लोष
Nashik News : राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्याबद्दल नाशिकच्या मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसेना आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आणि पेढे वाटप करून जल्लोष साजरा कारण्यात आला. आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह राज्य शासन आणि मराठा आरक्षणाला पाठींबा देणाऱ्या विधानसभा सदस्यांचे आभार मानण्यात आले.
Chandrapur PSI Daughter's Suicide : जेईई परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
Chandrapur News : जेईई परीक्षेच्या तणावातून एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागातील ही घटना असून अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. तर तिचे वडील चंद्रपूर पोलीस दलातील वायरलेस विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. आजोबांच्या फ्लॅटवर नियमितपणे अभ्यासासाठी जाणारी अनिशा परत न आल्याने काल रात्री आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारल्यावर ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असे लिहिलेले आढळले आहे. 
Onion News : निर्यातबंदी निर्णयाचा कांदा दराला फटका

Nashil Onion News : निर्यातबंदी निर्णयाचा कांदा दराला फटका


- लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1533 भाव

- निर्यातबंदीच्या 'हुलकावणी' देणाऱ्या निर्णयाने भाव पुन्हा कोसळले

- भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

- लासलगाव बाजार समितीत आज 205 वाहनांची आवक

- 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार
Yavatmal PM Modi Daura पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याची पुन्हा चर्चा 
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याची पुन्हा चर्चा 

 

28 फेब्रुवारीला यवतमाळच्या भारी गावाजवळ होणार सभा 

 

मोदींच्या सभेसाठी 30 समित्याचे गठन जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

 

या आधी 2 वेळा दौरा झाला होता स्थगित  

 

राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती
HSC Exam : भंडाऱ्यात 18 हजार 36 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

Bhandara News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीनं आजपासून बारावीची परीक्षा सुरू होतं आहे. यासाठी भंडारा जिल्ह्यात 64 परीक्षा केंद्रे राहणार आहेत. या केंद्रांवरून 18 हजार 36 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी, पोलीस बंदोबस्तासह भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे. यंदा 12 वी परीक्षेसाठी 'कॉपीमुक्त अभियान' राबविण्यात येत आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षांचं संचालन सुयोग्य प्रकारे व्हावं यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. परीक्षेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हास्तरीय दक्षता समिती करणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावर पालकांसोबत पोहचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह बघायला मिळाला.

Nashik Water Problem : जिल्ह्यातील 559 गावांमध्ये 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Nashik News : नाशिक जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ जाणवत असून फेब्रुवारीतच 559 गावे आणि वाड्यांना 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यांत म्हणजे निम्म्या जिल्ह्यात गंभीर पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात तालुक्यांचीही संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली असून रास्ता-रोको सारखे आंदोलन देखील होत आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यात 170 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांसाठी 358 टँकर फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून 52 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, अल निनोचे वर्ष असल्याने पर्जन्यमान यंदाही विलंबाने होण्याची शक्यता गृहीत धरून पाणी नियोजन करावे लागणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा आज दुपारी 3 वाजता टंचाई आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीसाठी गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.


तालुक्यातील टँकर संख्या...

•  बागलाण - 18

• चांदवड - 22

• देवळा - 14

• मालेगाव - 23

• नांदगाव - 49

• सिन्नर - 09

• येवला - 35
Sangli Krishna River Issue : कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड

Sangli News :  सांगली शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटी रुपयांचा दंड करण्यात आलाय. ही रक्कम पंधरा दिवसांत भरावी, अशी नोटीस बजावली आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात ती आली. याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीने जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी लवादासमोर म्हणणे सादर केले आहे. कृष्णा नदीमध्ये सन 2022 च्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येने मासे मृत नदीमध्ये आढळून आले होते. या प्रकरणी नदी प्रदुषणाची सखोल चौकशी करून दोषीविरूध्द कारवाई करण्यासाठी श्री. फराटे यांच्यावतीने हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागवला होता.


दंडाची रक्कम येत्या 15 दिवसात भरण्याचे निर्देश


चौकशी समितीच्या अहवालानुसार काही कारखाने आणि सांगली महापालिका यांना नदी प्रदुषणास जबाबदार ठरविण्यात आले होते. यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला. प्रदुषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदुषित केल्याबद्दल महापालिकेला 90 कोटींच्या दंडाची नोटीस 17 फेब्रुवारी रोजी बजावली आहे. दंडाची रक्कम येत्या 15 दिवसात भरण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांवतीने अ‍ॅड. वांगीकर यांनी वारंवार महापालिकेवर दंडाची कारवाई केली जात असतानाही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर या प्रकरणी उचित कारवाईचे निर्देश प्रदुषण मंडळाला न्यायालयाने दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


 

 
Sangli News : वाहिवटीचा वाद! गर्भवती महिलेला रस्ता नाकारला; ग्रामस्थांनी झोळी करून गर्भवतीला रुग्णालयात नेले
Sangli Road Problem : मिरज तालुक्यातील आरग येथे वहिवाटीच्या वादातून गर्भवतीला रुग्णवाहिकापर्यंत येण्यास रस्ता न मिळाल्याने तिला चक्क झोळीतून नेण्याची वेळ नातेवाईकावर आल्याची घटना मिरज तालुक्यातील आरगमध्ये घडली आहे. या प्रकरणाचा ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित गर्भवतीचे कुटुंब आणि शेजारील शेतकऱ्यांसोबत रस्ता वहिवटीचा वाद सुरू आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने पीडित महिलेच्या नातेवाईकांना वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. रस्ता वहिवाटीचा वाद तालुका दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे. यादरम्यान पीडित महिलेला तीव्र वेदना सुरू झाल्या, तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली.  शेजारील शेतकऱ्याला रस्ता देण्याची विनंती केली, परंतु तालुका दंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला सुरू असल्याने संबंधित शेतकरी याने रस्ता देण्यास नकार दिला. यामुळे त्या गर्भवती महिलेला चक्क झोळीत घालून झाडाझुडपातून वाट काढत रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आलं. रस्ता नसल्याने सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत महिलेला झोळीतून नेण्यात आले. त्यानंतर तिला बाळंतपणासाठी मिरजेच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
Malegaon News : 42 गावातील 30 हजार मालमत्ताधारकांची कागदपत्रे झाली डिजिटल

मालेगाव : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऑनलाइन सातबारा उताऱ्या पाठोपाठ आता नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील 42 गावातील 30 हजार मालमत्ताधारकांच्या कागदपत्रे डिजिटल प्रणालीत अपडेट झाली आहेत. त्यामुळे आता एका क्लिकवर पॉपर्टीकार्ड मिळू शकणार आहे. या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तक्रारीसाठी देखील कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही, घरी बसूनच तक्रार करता येणार आहे. त्यामुळे बनावट नोंदीदेखील आळा बसणार आहे. बनावट  फेरफार रोखण्यासाठी तसेच, नोंदींचा होणारा विलंब लक्षात घेता, ई-प्रॉपर्टी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाने सुरू केलेल्या या डिजिटल प्रणालीचा खऱ्या अर्थाने नागरिकांना फायदा होणार आहे.

Heena Gavit on Lok Sabha Election 2024 : पक्षश्रेष्ठी मलाच उमेदवारी देतील, डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला विश्वास

Nandurbar News : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीचे वारे जोरदार होण्यास सुरुवात झाली असून भाजपातही उमेदवारीसाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत. निवडणूक आली की, अनेक इच्छुक तयार होत असतात. मात्र, पक्षश्रेष्ठी मतदारसंघात केलेली विकास काम आणि संसदेत केलेल्या कामाचा आढावा घेतात. त्यासोबत पक्षाचा हितासाठी आणि पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांची मोजमाप उमेदवारी देताना करत असतात. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात आपण अनेक विकास काम केले असून केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून माझ्या कामाचा नेहमीच गौरव केला गेला असून गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांमुळे पुन्हा उमेदवारी मलाच मिळेल असा आत्मविश्वास खासदार हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.


भाजप चांगलं काम करणाऱ्यांना संधी देतं : हिना गावीत


भाजपामध्ये उमेदवारी देत असताना चांगलं काम करणाऱ्या लोकांना नेहमीच संधी दिली जात असते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागाच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होती आणि त्यातूनच या भागात अनेक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळणार आहे मात्र निवडणूक आले तर अनेक इच्छुक तयार होत असतात, हे फक्त भाजपात नाही तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार निवडणूक आल्यावर तयार होतात. मात्र योग्यच उमेदवाराला पक्षाकडून संधी दिली जात असते आपल्याला पुन्हा संधी मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Sangli Jat Water Andolan : जत तालुक्यातील 65 गावच्या पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी कॅण्डल मार्च काढत दिला संघर्षाचा इशारा
Sangli News :  सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पाण्याच्या मागणीवरून नागरिकांनी संख मध्ये कॅण्डल मार्च काढला. जत तालुक्यातल्या संख या ठिकाणी 65 गावांच्या पाण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनेचा पाणी देण्यात यावं,तसेच विस्तारित माहिती टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी हा कॅण्डल मार्च करण्यात आला आहे. पाणी संघर्ष चळवळ समितीचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये दुष्काळग्रस्तांनी कॅण्डल मार्च काढत सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. तातडीने दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा कर्नाटकमध्ये जाण्यासाठी पुन्हा भूमिका घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा देखील यावेळी संतप्त दुष्काळग्रस्तांनी दिला आहे.
Buldhana News : बुलढाण्याच्या मातीत वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद
Buldhana News : बदलत्या काळाच्या ओघात राज्यातील अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या आहेत. जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.. तोच घुंगरांचा नाद मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे  वाघ्या - मुरळीची राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत गुंजला. यामध्ये परभणी ,औरंगाबाद , बुलढाणा, जालना , नाशिक ,जळगावासह इतर जिल्ह्यातील वाघ्या मुरळी पार्टीने सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमात महिलांच्या वेशभूषेत पुरुष मंडळी आणि कलावंत आपल्या कला सादर करतात.या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमांमधून स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा, लेक शिकवा, व्यसनाधीनता, ग्रामस्वच्छता, स्वच्छ भारत मिशन, बालविवाह, अशा अनेक समाजप्रबोधनाच्या गीताच्या माध्यमातून समाज जागृती करत ही भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शिव मल्हार वाघ्या मंडळ, धोञा नंदई या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक ठरली असून तब्बल साडेआठ तास प्रेक्षक एकाच जागेवर बसून होते. या स्पर्धेचा परिसरातील  गावकऱ्यांनी उपस्थित राहुन या स्पर्धेचा आनंद घेतला.
Ajit Pawar Nephew in Sharad Pawar Group : अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्तेत सामील झाले असून,राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. मात्र, अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. दोनच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की, माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटूंबातील माझा प्रचार करणार नाही. त्यानंतर काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या  शहर कार्यालयाला आज सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केली आहे.  एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय.

Kokan Weather : तळकोकणात कडाक्याची थंडी आणि दाट धुकं, आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत

Maharashtra Weather News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याची थंडी आणि दाट धुकं पसरल आहे. दाट धुकं पडत असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून येजा करणाऱ्या वाहनचालकांना आपली वाहन सावकाश हाकावी लागत आहेत. तर या दाट धुक्यामुळे आंबा, काजू पिकावर मात्र रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून आता जिल्ह्यात पडत असलेल्या दाट धुक्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. तर थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांचा आणि शेकोटीचा आधार घेत आहेत.

Rohit Pawar Banner : "वादा तोच, पण दादा नवा" रोहित पवारांच्या फोटोसह फ्लेक्स झळकला.

Ambegaon Pune : "वादा तोच, पण दादा नवा" या आशयाचे फ्लेक्स पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली. असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे.

"वादा तोच, पण दादा नवा" रोहित पवारांच्या फोटोसह फ्लेक्स झळकला.

 


"वादा तोच, पण दादा नवा" या आशयाचे फ्लेक्स पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली. असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे.

Sunil Kedar News : कार्यालयातील सुनील केदार यांचा फोटो काढण्याची भाजपची

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळ्या प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर आता जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री सुनील केदार आणि भाजप यांच्यातील  संघर्ष अजून थांबण्याचे नाही. नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यालयात असलेला सुनील केदार यांचा फोटो काढण्याची भाजपची मागणी होती. त्यानंतर वाढता दबाव बघता नागपूर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी एक पत्र काढून स्वीय सहाय्यकांना फोटो काढण्याचे आदेश दिले. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो हात न लावण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने सुनील केदार यांचा जिल्हा परिषदमधील फोटो काढण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र, भाजप आपल्या मागणीवर ठाम असल्याने तणावाची परिस्थिती कायम आहे. 

Nandurbar News : मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा उघड्यावर फेकला

नंदुरबार : जिल्ह्यात औषधसाठा उघड्यावर फेकून दिल्याच्या घटना नवीन नाहीत. नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याचदा उघड्यावरच औषधसाठा फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारी दवाखान्यातील औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचा कांगावा आरोग्य विभागाकडून करण्यात येतो तर दुसऱ्या बाजूला औषधसाठा बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतो. तालुक्यातील भालेर शिवारात MIDC जवळ मोठ्या प्रमाणावर काही मुदतीत तर काही मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा उघड्यावर फेकलेला आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. भालेर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सदरचा औषधसाठा खासगी असल्याचा दावा करण्यात आला आहे. धोकादायक पद्धतीने औषधसाठा फेकल्याने संबंधिताची बेफिकीरी समोर आली असून याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News Latest LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.