बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही तीन आरोपी फरार असून संबधित आरोपींचे पोस्टर्स पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच, या आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. दुसरीकडे पीडित देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी जनता रस्त्यावर उतरुन त्यांना धीर देत आहे. तर, अनेकांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यातच, बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी फंड गोळा करुन एकत्रितपणे 43 लाख रुपयांची रक्कम देशमुख कुटुबीयांकडे सुपूर्द केली. माजलगावकरांनी मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये तालुक्याचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यामार्फत देशमुख कुटुंबीयांना देण्यात आले. 


सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. माजलगाव तालुक्यातून जमा झालेला निधी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आलाय. 9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येमुळे देशमुख कुटुंबातील कर्ता-धर्ता गेल्याने कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. या कुटुंबीयांस आधार देण्यासाठी जिल्ह्यातून, समाजातून लोकं पुढे येत आहेत. त्यातूनच, माजलगाव शहरात मदत फेरी काढून शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वासामान्य जनतेनं आपल्या खिशातून मदतीचा हात दिला. या मदत फेरीतून तब्बल 43 लाख रुपये जमा झाले होते. माजलगावकरांनी दाखवलेला मनाचो मोठेपणा आणि मततीचा हात, यातून जमा झालेला हाच निधी आज मस्साजोग गावात जाऊन आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह माजलगावातील नागरिकांनी सुपूर्द केला आहे.


प्रकाश सोळंके मुख्यमंत्र्यांची भेट घेणार


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणाचा तपास अद्याप पाहिजे तेवढ्या सतर्कतेने होत नाही. हीच बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं सोळंके यांनी म्हटलं आहे. सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावकरांनी 43 लाख रुपयांची मदत दिली. हीच मदत देण्यासाठी प्रकाश सोळंके यांची विशेष उपस्थिती होती. यादरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. यासंबंधी उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. 


हेही वाचा


रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन