Maharashtra News Updates 30th March 2023 : मुंबईतील मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी; तणाव वाढल्याने पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2023 10:31 PM
Mumbai News : मुंबईतील मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी; तणाव वाढल्याने पोलिसांचा लाठीचार्ज

Mumbai News : मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी झाली. या घोषणाबाजीमुळे तणाव वाढल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.  

Pune News: इंदापूर पोलिसांची गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 18 लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

Pune News: तब्बल 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाखांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे. अकलूज कडून पुण्याच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर कारवाई करून बंदी असलेल्या गुटख्या सहित मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

Gondia News: गोंदियात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार; घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला लावली आग

Gondia News:  गोंदिया शहरातील बाजपेयी चौक परिसरामध्ये एका ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली वेळीच घटनास्थळी अग्निशमन दल पोचल्याने ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. घटनास्थळावरून चालक फरार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी गोंदिया शहर पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Beed News : बारा वर्षानंतर पहिल्यांदाच जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष होणार!

Beed News : परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या जव्हार एज्युकेशन सोसायटीमध्ये बारा वर्षानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहा मे रोजी निवडणूक होणार आहे. या जवाहर एज्युकेशन सोसायटीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही सभासदत्व नव्हते. मात्र आता हे सभासदत्व मिळाल्यामुळे पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. सध्या या महाविद्यालयावर पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य अभ्यासक्रमाच्या हॉल तिकीट संदर्भात स्पष्टीकरण; सध्याची ही हॉल तिकिटे ही तात्पुरती, वेळापत्रकासह हॉलतिकीट देणार

Mumbai University Exam :  मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य अभ्यासक्रमाच्या हॉल तिकीट संदर्भात स्पष्टीकरण; सध्याची ही हॉल तिकिटे ही तात्पुरती, वेळापत्रकासह हॉलतिकीट देणार असल्याची विद्यापीठाची माहिती

Beed News : नाम फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाचं जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

Beed News: बीड तालुक्यातल्या केतुरा गावामध्ये नाम फाउंडेशन च्या वतीने जलसंधारणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून या कामाच उद्घाटन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या योजनेअंतर्गत नाम फाउंडेशनच्यावतीने सध्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जलसंधारणाची काम करण्यात येत आहेत त्यापैकीच कीच केतुरा गावामध्ये देखील नदीच्या खोलीकरणाच  आणि रुंदीकरणाचं  काम सुरू करण्यात आला आहे..

सोलापूर बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले, किलोला मिळतोय 1 ते 5 रुपयांचा दर

Onion Price : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले आहेत. प्रति क्विंटल 100 ते 500 रुपयांवर कांद्याचे दर आले आहेत. 


अनुदान मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी 31 मार्च आधी कांदा बाजारात आणल्याने कांद्याचे भाव पडले


मागील आठवड्यात याच कांद्याला साधारण 8 ते 12 रुपये इतका दर होता 


मात्र आता 1 ते 5 रुपये प्रति किलो दर आणि अनुदानचे साडेतीन रुपये जरी मिळाले तरी शेतकऱ्यांना फटकाच बसणार आहे. 

इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी अपघात, विहिरीचं छत कोसळल्यानं 25 हून अधिक भाविक विहिरीत कोसळले

इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी अपघात झाला आहे. विहिरीचं छत कोसळल्यानं 25 हून अधिक भाविक विहिरीत कोसळले. 

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होण्याआधीच गोंधळ, हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख, ना आसन व्यवस्थेचे योग्य नियोजन

Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होण्याआधीच गोंधळ


हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख, ना आसन व्यवस्थेचे योग्य नियोजन


विद्यापीठाने परीक्षेची तातडीने योग्य नियोजन करण्याची युवा सेना ठाकरे गटाची मागणी


मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या सहाव्या सेमिस्टर परीक्षा पाच एप्रिलपासून सुरु होत आहे


परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरित करण्यात आले मात्र ते हॉल तिकीट वर ना परीक्षेची वेळ आहे ना तारीख त्यामुळे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा विद्यार्थी संभ्रमात आहेत


दुसरीकडे गोरेगाव पश्चिमेला असलेल्या यशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 300 विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्यासाठी आसन क्षमता असताना 2000 विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे


युवासेनेने आता ही बाब निदर्शनास आणल्यानंतर 1700 विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे

नांदेडमध्ये ऑटोरिक्षा आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी

Nanded Accident : नांदेडमध्ये ऑटोरिक्षा आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मुदखेड तालुक्यातील मुगट गावाजवळ ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. दरम्यान, जखमी आणि मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

नवाझऊद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरण, नवाझुद्दीन सिद्दिकी आणि कुटुंबियांना 3 एप्रिलला हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश

नवाझऊद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरण


नवाझुद्दीन सिद्दिकी आणि कुटुंबियांना 3 एप्रिलला हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश


नवाझ त्याची पत्नी झैनब, दोन्ही मुलं आणि भाऊ शमशुद्दीन यांना कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश


न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या दालनात होणार सुनावणी


पत्नीने मुलांना जबदरस्तीने दुबईहून इथे नेऊन आपल्याला भेटण्यास मनाई केल्याचा आरोप


तर पत्नी झैनब आणि भाऊ शमशुद्दीन यांचे नवाझवर प्रतिआरोप

मुंबई-गोवा हायवेचं शुल्ककाष्ट कमी होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 64 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन

Mumbai-Goa Highway : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पनवेल ते कासू आणि राजेवाडी ते पुणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचं भूमीपूजन करण्यात आलं. एकूण 64 किलो मीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटने रस्ता तयार करण्यात येणार असून यासाठी एकूण 414.68 कोटी खर्च होणार आहेत. या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याने याचा फायदा मुंबई-गोवा हायवे आणि रायगड ते पुण्याला जोडणाऱ्या हायवेला होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई-गोवा हायवे रखडल्याने कोकणवासियांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने लोकांचे जीवही जात होते. मात्र आता या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्याने गोव्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत मिळणार आहे.

पत्रकाराला मारहाण प्रकरणात अभिनेता सलमान खानला दिलासा, हायकोर्टाकडून प्रकरण रद्द, अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेलं समन्सही रद्द

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा


साल 2019 मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडन रद्द


अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेलं समन्स हायकोर्टाकडून रद्द

Ram Navami 2023: नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं?

Ram Navami 2023: धार्मिक ऐतिहासिक, पौराणिक नागरी म्हणून नाशिकची ओळख आहे. अनेक मंदिरे असून गोदातीरी वसलेली आहेत. यातलच एक म्हणजे काळाराम मंदिर (Kalaram Temple) होय. आज रामनवमी निमित्त काळाराम मंदिर सजले असून मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज जाणून घेऊयात नाशिकच्या काळाराम मंदिराविषयी...


Yavatmal Crime News: दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक; देशी कट्ट्यासह चौघे गजाआड, एक पसार
Yavatmal Crime News: यवतमाळ येथे सशस्त्र दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या  एका गंभीर गुन्हेगारी घटनेला मूर्तरुप देण्यासाठी कारमधून आलेल्या चौघांना शिताफिने पकडण्यात आले. तसेच त्यांच्याकडून देशीकट्टा, जीवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक, स्विफ्ट कार, दुचाकी  असा घातक शस्त्रांसह मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई अवधूतवाडी पोलिसांनी  येथील जाजू चौक परिसरात केली. मात्र, यावेळी शस्त्रसज्ज टोळक्याचा एक साथिदार पसार होण्यात यशस्वी झाला.

 

जगदीश रावल, गजानन राठोड दोघेही राहणार पुसद, बाबू बडोदे, रोहन गरवारे दोघेही राहणार नवीन पुसद अशी अटकेतील शस्त्रसज्ज टोळक्यातील चौघांची तर देवा वाघमारे असे त्यांच्या पसार साथिदाराचे नाव आहे. हे पाचजण स्विफ्ट कार ने यवतमाळात एका गंभीर गुन्हेगारी घटनेला मुर्तरुप देण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस कर्मचारी बलराम शुक्ला याला मिळाली होती. त्यावरून त्याने ही माहिती अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांना दिली. त्यांनी तत्काळ पथकासह सापळा रचून जाजू चौकात ते वाहन पकडले. तसेच संबंधित चौघांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर त्या चौघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे देशीकट्टा, जीवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक असा घातक शस्त्रांसह मुद्देमाल आढळून आला. शिवाय, त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार आणि दुचाकीही जप्त करण्यात आली. मात्र, यावेळी देवा वाघमारे हा टोळक्याचा साथिदार पसार होण्यात यशस्वी झाला. त्या चौघांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला
Bhiwandi Crime: चोरीचा उद्देशाने घरात घुसून कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला; 4 ते 5 जण कामगार जखमी

Bhiwandi Crime: भिवंडीतील खाडीपार येथील मच्छाह कंपाउंड परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांच्या टोळक्याने कामगारांच्या घरात घुसून दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र कामगारांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने हल्ला केला आणि या हल्ल्यात चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत. कामगारांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर अज्ञात चोरट्यांचा टोळका घटनास्थळावरून पसार झाले आहे. या परिसरात घडलेली ही पहिली घटना नाहीये, याआधी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत कधी घरात घुसून दमदाटी करून चोरी करणे, तसेच मोबाईल हिसकवणे स्केचिंग करणे, असे अनेक प्रकारच्या घटना या परिसरात घडत असतात. त्यामुळे येथील कामगारांच्या मनात या चोरट्यांची दहशत पसरली आहे. चोरट्यांच्या या हल्ल्यामुळे चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कळवा येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत असून या परिसरात निजामपूर पोलिसांचा गस्त होत नसल्याने चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच आज सलमान खान, अनुष्का शर्मा आणि नवाझुद्दीन सिद्दिकेच्या याचिकेवर सुनावणी आहे. तसेच किशोरी पेडणेकरांच्याही याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


आज देशभरात राम नवमीचा उत्साह


आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून ही नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. 


सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाचा आज निर्णय. त्याने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. एका पादचाऱ्यावर हल्ला करून त्याला धमकावल्या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे. ते समन्स रद्द करण्याची सलमाननं मागणी केली आहे.


अनुष्का शर्माच्या याचिकेवर सुनावणी


अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर उत्तर देत प्राप्तीकर विभगानं आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे, त्यावर आज सुनावणी होईल.


नवाझुद्दीन सिद्दिकीच्या याचिकेवर सुनावणी


बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची आपला भाऊ आणि पत्नी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव. या दोघांवर दाखल केला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा. भाऊ शमशुद्दिन सिद्दीकी आणि पत्नी झैनब सिद्दीकी यांनी नवाझबाबत दिशाभूल करणारी वक्तव्यं केल्याचा याचिकेतून आरोप. त्याच्या विरोधातील पोस्ट आणि आर्टिकल बदनामीकारक असून नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा मलिन केल्याचा याचिकेतूना दावा.


किशोरी पेडणेकर यांच्या याचिकेवर सुनावणी


माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा आज संपणार. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना दिले होते निर्देश. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकरांवी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.