मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे (ND Studio) परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या पाहणी दौऱ्याकरीता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते. 


राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (NCLT) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या Resolution plan ला 14 नोव्हेंबर 2024 रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी. स्टुडीओचे दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्यावतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. त्यामुळे हे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडीओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली. 


विशेष कृती पथकाची स्थापना 


प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य  प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच वित्तीय, विधी,  आयटी, मनुष्यबळ आदि क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश आहे. सध्यस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत.


दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर कर्जत येथील एनडी स्टुडिओ या भव्य वास्तू आणि फिल्म सिटीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घेतला असून आता मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीअंतर्गत याची देखरेख आणि देखभाल होणार आहे. यासंदर्भातील सर्व निर्णय हे शासनाधीन असणार आहेत.


हेही वाचा


वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला