Maharashtra News Live Updates दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची मोकळ्या जागी धाव
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी तातडीने मोकळ्या जागी धाव घेतली. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Solapur News : सांगोला तालुक्यातील घेरडी शाळेतील पोषण आहारात तांदळात प्लास्टिक सदृश्य पदार्थाची भेसळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. किलोभर तांदळात जवळपास मूठभर हा पदार्थ सापडत असल्याची तक्रार , पोषण आहारात भेसळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमृता फडणवीसांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी
अनिक्षा जयसिंघानीला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी तर अनिल आणि निर्मल जयसिंघानीला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अनिक्षा जयसिंघानी, तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि चुलत काका निर्मल जयसिंघानी यांना याप्रकरणी अटक
अनिक्षा तपासांत सहकार्य करत नाही म्हणून कोठडी वाढवली, तर अन्य दोघांना पहिलीच पोलीस कोठडी
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दौंड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दौंड तालुक्यातील गलांडवाडी, खुटबाव, एकेरीवाडी या भागात धुमाकूळ घातला होता. मागील काही दिवसापासून एकेरी वाडी भागात पशुधन पशुधनावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढलेले होते. ग्रामस्थांकडून सतत पिंजरा लावण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने वन विभागाने गलांडवाडी येथील कदम वस्तीवर पिंजरा लावून बिबट्यास अखेर जेरबंद केले आहे. बिबट्यास जेरबंद केल्यानंतर पुणे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या ठिकाणी नेऊन सदर वन्य प्राण्यांची तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
खान्देशात अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र शासकीय कर्मचारी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत तीन दिवसापासून नुकसान झालेले पीक पाहत शेतकऱ्यांच्या अश्रूंचे बांध फुटत आहेत. सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देते बांधावर खत देऊ शेतीला हमीभाव देऊ मात्र व्यापाराच्या हातात हात घालून शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम सरकार करत आहे कांद्याला भाव भेटला तर मोठमोठ्या बातम्या येतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठका होतात मात्र शेतकऱ्यांसाठी काय विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे त्या गोष्टींचा पाऊस झाला मात्र आमच्या बांधावर अजून पंचनामे नाहीत निवडणुका आल्या की हमीभाव बांधावर खत अनेक घोषणा होतात पण आमच्याकडे पाहणारा कोण आहे शेतकऱ्याचा पोटी जन्म घेतला हाच आमचा गुन्हा का असा संतप्त प्रश्न शहादा तालुक्यातील भालेराव वाघ या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट मध्ये त्यांचा तीन एकर गहू मातीमोल झाल्यानंतर गुरांसाठी चारा घरासाठीचा अन्नधान्य आणि उरलेल्या पैशातून कर्जाची परतफेड अनेक योजना आखल्या होत्या त्या आता मातीत मिसळले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना राजकीय सभा घेण्यासाठी वेळ आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी सरकारकडे वेळ आहे का असा प्रश्न ते आपल्या तीन मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत.
भंडारा जिल्ह्यात 17 आणि 19 मार्चला विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर, सात पाळीव शेळ्यांचा ही मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील 42 गावातील 529 शेतकरी प्रभावित झाले असून 227 हेक्टर शेतीला याचा फटका बसला आहे. या अवकाळी पावसानं शेतातील गहू, मका, पालेभाजी आणि फळांच्या बागायतीला चांगलाच फटका बसला असून जिल्हा प्रशासनानं पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे. पंचनामा झाल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गोंदिया कोहमारा महामार्गावर सलग 2 दिवसात 2 ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला मुरूम ऐवजी माती मिश्रीत मुरूम टाकल्याने हे अपघात घडले आहेत. गोंदिया कोहमारा महामार्ग क्रमांक 753 वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम ऐवजी माती मिश्रीत मुरूम टाकण्यात आली आहे. अवकाळी पाऊस आल्याने ही माती मिश्रीत मुरूम ओली झाली आहे. या महामार्गावर जड वाहने चालत असतात. मात्र रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांना साईड देण्याकरिता ट्रक चालक आपले ट्रक बाजूला घेत असताना हे दोन्ही अपघात घडल्याची माहिती आहे. सुदैवाने या दोन्ही अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
Nagpur :आमगाव नगर परिषदेच्या शासनाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे नागरिक अनेक आंदोलने करीत आहेत. आज नागरिकांनी मागणी पूर्ण होत नसल्याने अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे. आठ वर्षांपासून नागरिक विकासापासून वंचित पडले आहेत. नगरपरिषदेत समाविष्ट आठ गावातील नागरिकांना केंद्र व राज्यसरकारने नागरिक लाभाच्या योजना बंद करून वेठीस धरले आहे. नागरिकांना घरकुले,राष्ट्रीय रोजगार हमीचे कामापासून वंचित व्हावे लागले,आर्थिक अडचणीत रोजागर उपलब्ध नसल्याने नागरिक हताश होऊन गेली आहेत.
नगर परिषद संघर्ष समितीने मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरणाची मागणी नंतर मुंडन मोर्चा, जण आक्रोश मोर्चा यापूर्वी करून शासनाचे लक्ष वेधले होते, परंतु या आंदोनलची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिक आता संतप्त होऊन मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अनिश्चित कालीन उपोषण तहसील कार्यालय समोर २१ मार्च पासून सुरू केले आहे.
दापोली पाठोपाठ गुहागर आणि रत्नागिरी मध्ये देखील मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गुहागर तालुक्यातल्या किनारपट्टी भागात तर रत्नागिरीच्या जयगड परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे आंबा काजू पीक धोक्यात आले आहे.
अवकाळी पावसाने कोकणातला शेतकरी चिंतेत पडला आहे. हाता तोंडाशी आलेलं पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.
आंबा आणि काजूवर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
Dhule News: धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चर्चा करत असताना अपशब्द वापरल्याने व्यवस्थापकावर शाई फेकण्यात आली. तसेच यावेळेस संतप्त कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाला देखील चोप दिला. कचरा संकलक ठेकेदार मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आरोप करण्यात आला.
Dada Bhuse: संजय राऊतांच्या आरोपांवर मंत्री दादा भुसे सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.. आमच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार आहेत. माझ्यावर कलेले आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या, असं थेट आव्हान भुसेंनी राऊतांना दिलं. दरम्यान संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असा घणाघातही त्यांनी केला
Nitesh Rane: धर्मांतर विरोधी कायद्यावरून आज भाजप आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक झाले.. कुणाचा धर्म बळजबरीनं बदलायचा कुणालाही अधिकार नाही.. राज्यात लवकरात लवकर धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं नितेश म्हणाले. लव्ह जिहादची प्रकरणं खरंच घडतात हे पटवून देण्यासाठी त्यांनी दोन व्हिडीओ देखील दाखवले.
Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा म्हणजेच सिनेटच्या पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. अधिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागासाठी 51 उमेदवार रिंगणात होते. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी ही त्यांचे प्रतिनिधी उभे केले होते. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळातील या निवडणुकीत भाजप समर्थित अभाविप बाजी मारते की महाविकास आघाडीला कौल मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
Matheran: माथेरानमध्ये सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत असल्याने विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. नव्याने करण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते धुवून निघाल्याने बाजारपेठ भागात स्वच्छ रस्ते दिसत आहेत. आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने काळोख झाला होता. तर अवकाळी पाऊस पडत असल्याने जून महिना आला आहे की काय अशी चर्चा केली जात आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा म्हणजेच सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या जन्मालाल बजाज प्रशासकीय भवनात सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला मतपेट्या उघडून सर्व मतपत्रिकांचं मिश्रण केलं जात आहे. त्यानंतर वैध मते बाजूला करुन त्यापैकी विजयासाठीचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात होते. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी ही त्यांच्या विद्यार्थी संघटनेचे उमेदवार उभे केले होते. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळातील या निवडणुकीत भाजप समर्थित अभाविप बाजी मारते की महाविकास आघाडीला कौल मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mumbai Local Update: अवकाळी पावसाने लोकलचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण आणि हार्बर मार्गावर रे रोड, सेंडहर्स्ट रोड स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे इतर लोकलच्या वेळापत्रकात उशीर झाला आहे. सध्या मेन लाईनवरील लोकल 15 ते 20 मिनिटे धावत आहे. हार्बर लाईन वरील 20 मिनिटे उशिराने धावत आहेत तर पश्चिम रेल्वेवरील लोकल देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत
Mumbai Local Update: पावसामुळे हार्बर रेल्वे मार्गांवर परिणाम झाला आहे. पनवेल - सीएसटी गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्ग सुरू असले तरी गाड्या अर्धा तास उशीरा येत आहेत
Sangamner News : जुन्या पेन्शनचे आंदोलन आटोपून घराकडे निघालेल्या शिक्षकांच्या मोटार सायकलला दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्याने शिक्षकासह टँकर चालक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना काल (20 मार्च) सायंकाळी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ घडली. या अपघातात शिक्षक अजय चंद्रभान नन्नवरे (वय 36, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) आणि विलास रविंद्र ठोंबरे (वय 23, रा. शिवलवाडी, ता. मंचर) या दोघांचा मृत्यू झाला. सायखिंडी फाट्यावर असताना नाशिक इथून एक दुधाचा छोटा टँकर पुण्याकडे चालला होता. वाहनाचा इतका वेग होता की त्याने दुभाजक तोडून विरुद्ध बाजूने चाललेल्या नन्नवरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली आणि धडकेनंतर हा टँकर पलटी झाला. संगमनेरमध्ये गेल्या आठ दिवसात सात जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Pune Watercut : पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
Sanjay Raut: संजय राऊतांचा दादा भुसेंवर गंभीर आरोप केले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने भुसेंनी शेतकऱ्यांकडून लाखो पैसे गोळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आङे. दादा भुसेंनी शेतकऱ्यांची लूट केली, लवकरच स्फोट होईल, असे राऊतांनी ट्विट केली आहे.
Nagpur News : नागपुरात सुरू असलेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे रस्ते नीटनेटके दिसावे, रस्त्यावर अतिक्रमण दिसू नये यासाठी महानगरपालिकेकडून गेले काही दिवस फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई करताना सर्व मर्यादा ओलांडत अतिशय संतापजनक कारवाई केली. अतिक्रमण विरोधी पथकानं या फेरीवाल्यांचं साहित्य चक्क जमिनीत पुरून टाकल्याचा आरोप करण्यात येतोय.. एकढंच नाही तर त्यावर माती टाकून जेसीबी देखील फिरवण्यात आला. यामुळे या फेरीवाल्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय.
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल, असं आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप काल मागे घेण्यात आला. परंतु राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केल
Mumbai Rain: पावसामुळं मुंबईच्या नायगावमध्ये होणारी पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली. मैदानात चिखल झाल्यानं आता भरती प्रक्रिया 25 मार्चला होणार आहे.
Nanded News: नांदेडच्या बारड आणि परिसरातल्या काही भागांमध्ये गेल्या ७२ तासांपासून वीज पुरवठा खंडीत झालाय. बारडमधल्या काही भागांत फक्त रात्रीच्या वेळीच वीज येत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातंय. वीज नसल्यानं गावात पाणीपुरवठा देखील होत नाहीय. वीज नाही त्यात पिण्यासाठी पाणीही नाही अशा दुहेरी संकटात आता हे ग्रामस्थ सापडलेत.. पाणी नसल्यानं काही भागांत टँकरने पाणीपुवठा केला जातोय. अशा परिस्थितीमुळे आता जगायचं कसं असा सवाल गावकरी प्रशासनाला विचारु लागलेत.
Pandhapur News: पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केव्हाही आलात तरी तुम्हाला देवाच्या चरणावर तुळशी वाहून तुळशी अर्चन पूजा करता येणार आहे. गुढीपाडव्यापासून तुळशी अर्चन पूजेला पुन्हा सुरुवात होणार आहे... देशभरातील भाविक पंढरपुरात आल्यानंतर अनेकांना देवाची पूजा करण्याची इच्छा असते. मात्र मोजक्याच होणाऱ्या पुजा आणि आणि वर्षभरापासून करावं लागणारं बुकिंग यामुळे भाविकांना तुळशी अर्चन पूजा करण्याची इच्छा पूर्ण करता येत नव्हती... आता मात्र दिवसभरात तीन वेळा या पूजा होणार असून प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कुटुंबं या पूजेत सहभागी होतील.
Satara News: साताऱ्यात एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन युवकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.कोरेगाव शहरातील एका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या ऋषिकेश ताटे याने पेटवून घेत तर उत्तर प्रदेश येथील सुभाष कुमार प्रसाद यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
Mumbai Rain: मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय.. मुंबई शहर, उपनगरं, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस पडतोय.. यामुळे कामावर जाणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे.
पार्श्वभूमी
राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आजपासून कार्यालयात लोकांची गर्दी होणार आहे. तर, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात वेग येण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात ओशोंच्या आश्रमासमोर ओशो अनुयायांकडून ओशो कम्युन विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
दिल्ली
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून ही सुनावणी विविध कारणांनी लांबणीवर गेली आहे.
- संसदेत मध्ये कॉग्रेस आदानी प्रकरणावरून आणि भाजप राहुल गांधीनी माफी मागावी म्हणुन आक्रमक असल्यामुळे सभागृहाच कामकाज होत नाहीये. यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. अशातच अधिवेशन मुदतपुर्वी गुंडाळलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
मुंबई
विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासाच्या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. विधान परिषदेत मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.
- वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना आज सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी काल अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे.
- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा झालेला अतोनात नुकसान त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी विधानसभेला घेराव आंदोलन होणार आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बी. व्ही. श्रीनिवास, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी मिथेंद्र सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.
- हसन मुश्रीफ यांची तिन्ही मुलं आणि त्यांचा सीए यांनी ईडीच्या केसमध्ये अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत.
- भाजपा आमदार नितेश राणे यांची लव्ह जिहादवर पत्रकार परिषद घेणार आहेत.
- परप्रांतीय मासेविक्री करणाऱ्यांच्या विरोधात भांडुपमध्ये स्थानिक मासे विक्रेत्यांचे आंदोलन होणार आहे. महापालिकेच्या एस विभागासमोर मासेविक्री करुन करणार निषेध आंदोलन करणार आहेत.
पुणे
- ओशोंच्या अनुयायांचे ओशो कम्युन समोर आंदोलन करणार आहेत. ओशो कम्युनची मालकी कोणाची यावरुन वाद सुरु आहे. ओशो कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवलाय, असा अनुयायांचा आरोप आरोप आहे. न्यायालयात देखील हा वाद सुरु आहे. आज ओशोंचा संबोधी दिवस आहे.
नाशिक
- सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू होणार आहेत. अधिकारी कर्मचारी आजपासून बांधावर जाणार आहेत.
- गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आनंदाच्या शिधाचे वाटप केले जाणार असून पुरवठा विभागाने दिलेल्या सूचनेनूसार आनंद शिधाचे स्टिकर रेशन दुकांनामध्ये आज लावले जाणार आहेत.
अहमदनगर
सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आज सरकारी कार्यालयात नागरिकांची विविध कामांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
जळगाव
महापालिकेची आज महासभा होणार आहे. पालिकेत सध्या महापौर ठाकरे गटाचे आहे तर बहुमत भाजप शिंदे गटाचे असल्याने काही ठरावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
- जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.
धाराशिव
- उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. सकाळी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -