Maharashtra News Live Updates : प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Feb 2023 09:43 PM
साहित्य संमेलनातील ठरावातून बोलीभाषेसह मराठी शाळांच्या अनुदानाला दिले प्राधान्य

वर्ध्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सायंकाळी सूप वाजले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनात दहा ठराव घेण्यात आलेय. यातील बोलीभाषेच्या विकासासाठी ' बोलीभाषा विकास अकादमी' स्थापन करावी असा ठराव घेण्यात आलाय. तर बृहन महाराष्ट्र तिल मराठी माध्यमांच्या अनेक शाळा आणि हैद्राबाद मधील मराठी साहित्य परिषदेतर्फे चालविण्यात येणारे मराठी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. या शिक्षण संस्थांना अनुदान देउन सहकार्य करावे, गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचा प्रवाह प्रकल्पासाठी वळवू नये. नदी वाळविल्यास तीव्र पाणी टंचाईची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याचा ठराव देखील यात घेण्यात आला आहेय. पुस्तकाच्या किमती नितंत्रित ठेवण्यासाठी प्रकाशकांना छपाई व कागद खर्चात सबसिडी द्यावी याशिवाय जीएसटी मधूनही वगळण्यात यावे असा ठराव घेण्यात आला आहेय.

चिपळूण मध्ये वाशिष्टी दूध डेअरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन..
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना प्रशांत यादव या दाम्पत्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे.वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि.या दुग्धप्रकल्पाची उभारणी केली आहे.या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज व्हीसी द्वारे पार पडलं.त्यानंतर प्रत्यक्ष उदघाटन सोहळा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप नेते,आमदार प्रसाद लाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार शेखर निकम,माजी आमदार सदानंद चव्हाण,चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार 

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार सात फेब्रुवारी रोजी होणार आहे.स 


 कोळी बांधवांकडून केला जाणार सत्कार 


वरळी कोळीवाडा येथील क्लीव्हलँड बंदर भागात मच्छीमार बांधवांच्या बोटांना ये-जा करण्यासाठी १२० मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल 


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कार 


वरळीत शिंदे आणि भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार

कोकणात लोककलेची समृध्द परंपरा आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..
चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारी दरम्यान पर्यटन,लोककला,सास्कृतिक,खाद्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे.लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल,गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोंकण भूमीतील गडकिल्ले,सागरी किनारे,निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे.मुंबई ते गोवा जुना महामार्ग देखील वेगाने तयार होत आहे. कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन,लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाईल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणुका न झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना मोकळ्या झाल्या नाहीत- सुजय विखे
अहमदनगर जिल्हा परिषद, पंचायतीच्या निवडणुका झाल्या असत्या तर कार्यकर्त्यांच्या भावना भाषणातून मोकळ्या झाल्या असत्या...पण निवडणूक न झाल्याने त्यांच्या भावना मोकळा झाल्या नाहीत म्हणून उद्घाटन कार्यक्रमातून अशा भावना व्यक्त होतात असं भाजप खासदार सुजय विखे यांनी म्हंटलं आहे...लोणी व्यंकनाथ येथे खासदार सुजय विखे यांच्या कार्यक्रमात त्यांच्या समोरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी भिडले...3.5 कोटी रुपयांच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लोणी व्यंकनाथ येथे सुरू होता...दरम्यान या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला...भाजप खासदारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे काय काम? असा सवाल उपस्थित करत बाचाबाची झाली त्याचे रूपांतर पुढे धक्काबुक्कीत झाले...मात्र दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला...मात्र याबाबत बोलताना आम्ही स्थानिक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन काम करतो, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका न झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना मोकळ्या झाल्या नाहीत...एकदा निवडणूका झाल्या की कार्यकर्त्यांच्या भावना मोकळ्या होतील...पुढचे एक वर्ष कार्यकर्ते म्यूट मोडवर जातील...निवडणुका झाल्या की श्रीगोंदयात तुम्हाला बदल दिसेल असं खासदार सुजय विखे यांनी म्हंटलंय.
प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व एसबीआय व एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीच्या कार्यालयासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यातील आंदोलनात सहभागी होत आहेत तर सातारामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार, नागपूरमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, चंद्ररपूरमध्ये माजी मंत्री सुनिल केदार, गोंदिया मध्ये माजी मंत्री नितीन राऊत, औरंगाबादमध्ये माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान ठाणे, चंद्रकांत हंडोरे नवी मुंबई, आ. कुणाल पाटील जळगाव, आ. प्रणिती शिंदे लातूर, बसवराज पाटील सोलापूर, माजी मंत्री विश्वजीत कदम पिंपरी चिंचवड यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालयी होत असलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते पदाधिकारी सहभागी होत आहेत.


अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे. संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. काँग्रेस पक्ष एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने जनतेच्या हितासाठी मोदी सरकारला जाब विचारत आहे.

जालना-जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास दहा लाखाचे बक्षीस.

जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलना दरम्यान आव्हाड यांनी जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी केलीय, जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध केला यावेळी या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आवाडांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षिसाची घोषणा केलीय.

Latur Illegal Liquor : कुमठा गावातील अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धडकल्या महिला

Latur Illegal Liquor : लातूर जिल्ह्यातील कुमठा गावातील अवैध दारू विक्रेत्याच्या मनमानी कारभारामुळे गावात रोजच दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे गावातील महिला त्रस्त होत्या. प्रत्येक घरातील अनेक पुरुष दारूच्या व्यसनात गुरफटले गेले होते. याबाबत वेळोवेळी पोलिसांना अर्ज विनंती करण्यात आल्या होत्या. मात्र कसलेही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर गावातील महिलांनी एकत्र येत काम संध्याकाळी दारू विक्रेता याच्या घराकडे मोर्चा वळवत तेथे तुफान राडा घातला. या घरातील प्रत्येक भागात लपवून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या शोधून काढल्या. त्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडण्यात आल्या. महिलांच्या या आदोलनाला गावातील तरुणांनीही साथ दिली होती. या बाबत आता पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Yavatmal Police Mock Drill : यवतमाळ पोलिसांच्या मॉकड्रिलने वेधले यवतमाळकरांचे लक्ष 

Yavatmal Police Mock Drill : पोलिसांच्या मॉकड्रिलने वेधले यवतमाळकरांचे लक्ष वेधलं आहे. यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरात वेस्टर्न मॉल येथे आज अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली. दरम्यान जिल्हा पोलीस दलाने घटनास्थळ गाठून सर्व दहशतवाद्यांना अटक केली. या प्रकाराने काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र दहशतवादी हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी नेमकं काय करायचं याच्या कार्यपद्धतीची ही मॉक ड्रील असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास घेतला.

Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन

Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील यांना फोन केला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

Pune Police : गुन्हेगारांची आता काही खैर नाही; पुण्यात पोलिसांचं आता 'पायी पेट्रोलिंग'

Pune Police : पुण्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पुण पोलिसांकडून अनेक उपाययोजन राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पुणे पोलिसांनी गाड्यांमधून नाही तर पायी पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे.

Dhule Marathon : धुळ्यात पार पडली भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Dhule Marathon : धुळे जिल्हा पोलीस दल जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा धुळे शहरात उत्साहात पार पडली. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे क्रीडा मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन. नाशिक परिषदचे विशेष, पोलीस महानिरीक्षक यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पहाटे पाच वाजेपासून पोलीस कवायत मैदान येथे धुळेकर नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी धुळ्याच्या नागरिकांनी पूजेच्या तालावर ठेका धरत उत्साह पूर्ण वातावरण निर्मिती केली. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी ढोल ताशांसह लेझीम पथक सहभागी झाले होते. चार विभागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात 21 किलोमीटर 10 किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर इतके अंतर ठेवण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह जळगाव नाशिक नंदुरबार नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवळपास 30 हजाराहून अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलन स्थळी सुरक्षा व्यवस्थेत वाढ, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पोहोचणार
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्ध्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. VIP सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेची तालीम देखील संमेलन स्थळीं घेण्यात आली. कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. प्रवेशद्वारावरच मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. उद्घाटनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी घातलेला गोंधळ पुन्हा होऊ नये, यासाठी देखील पोलीस यंत्रणा सजग झाली आहे.
Thane Malang Gad Yatra : मलंग गड यात्रेसाठी अंबादास दानवे, राजन विचारे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते रवाना

Thane Malang Gad Yatra : मलंग गड यात्रेसाठी अंबादास दानवे, राजन विचारे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते कळव्यातून रवाना


मलंगड यात्रेसाठी आज ठाण्यातील कळवा परिसरातून राजन विचारे यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते मलंगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. 


-दरम्यान यावेळी 30 ते 34 बसेस भरून कार्यकर्ते आणि खासगी गाड्या देखील मोठ्या प्रमाणात होत्या.

Beed Child Pornography : चाइल्ड पॉर्नग्राफीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

Beed Crime News : पुण्यातून चाईल्ड पॉर्नग्राफीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या एका व्यक्तिवर बीडच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या नांदूर घाट येथील या व्यक्तीने पुण्यातून आपल्या फेसबुकवर चाइल्ड पॉर्नग्राफीचा व्हिडीओ 2 फेब्रुवारीला शेअर केला होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ राजाच्या सायबर विभागाने बीड पोलिसांना या व्यक्तीवरचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर या व्यक्तीवर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Bhandara Crime News : धान पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, मेंगापूर येथील प्रकार तिघांना अटक

Bhandara Crime News : मळणीनंतर शेतात ठेवलेल्या धान पोत्यांची चोरी करून तणस जळणाऱ्या तीन चोरट्यांना पालांदूर पोलिसांनी अटक केली. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मेंगापूर शेतशिवारात रात्रीला चोरीचा प्रकार घडला होता. गुरुदेव गाढवे (27), राजेश सेलोकर (45), सूरज संयाम (27) सर्व रा. कोलारी, ता. लाखनी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. डोलीराम राघोर्ते यांच्या शेतातील धान पोत्यांची चोरून करून तणस जाळल्याने शेतकऱ्याचे 90 हजारांचे नुकसान झाले.

Bhandara Tiger : राष्ट्रीय महामार्गावर वाघाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Bhandara Tiger : भंडारा ते रायपुर या राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते साकोली दरम्यान असलेल्या मोहघाटा जंगल परिसरात वाघांचे कॅरिडॉर आहे. वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका होऊ नये, म्हणून इथं अंडरपासचे काम निर्माणाधीन आहे. या कामाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व आढळून आले आहे. या निर्माणाधीन कामाच्या परिसरात आईपासून दूर झालेल्या सुमारे दोन वर्ष वयाच्या एका वाघाचे दर्शन या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना झाले. हा परिसर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पा लगत असल्याने हा वाघांचा कॅरिडॉर म्हणून ओळखल्या जाते. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकाला वाघाचे दर्शन झाले आणि त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला, सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Nanded MNS Protest : नांदेडमध्ये मनसेच्या वतीने BRS पक्षाच्या विरोधात आंदोलन
आज नांदेड येथे  तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मनसेने BRS ला सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. ज्यात महाराष्ट्रातील बाभळी पाणी प्रश्न सोडवा आणि नंतरच सभा घ्या असा सूचक इशारा दिला होता. अन्यथा सभास्थळी आंदोलन करत सभा उधळणार असा गर्भित इशारा दिला होता.
Beed News : अमृत अटल योजनेचे काम अपूर्ण
Beed News : बीड करासाठी महत्त्वाच्या असलेल्या अमृत अटल योजनेचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने शहराला आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.. तर दुसरीकडे अनेक विस्तारित भागांमध्ये नळाची जोडणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा या दोन धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे दोनही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन, कारगिल युद्धात आगळीक करण्यात मोठा हात

Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्राध्यक्ष (Former President of Pakistan) परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. 2016 पासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरु होते.

Srinath Mhaskoba Mata Jogeshwari : श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न

Pune : पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला. पुणे आणि सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक गावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पुढील दहा दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू असणार आहे. या यात्रेनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री मानकरी, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त मागील दोन दिवसपासूनच अनेक भाविक वीरमध्ये दाखल झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील कोडित, राजेवाडी त्याचा बरोबर बारामती तालुक्यातील सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतील मानाच्या पालख्या वीर येथे आल्या आहेत. रात्री देवाचीकाठी आणि पालखी यांची मदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. 'नाथा साहेबाचं चांगभलं' असा जयघोष करीत अनेक भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग ढोल  लेझीमच्या तालावर नृत्य केले.

NISAR Satellite : ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार सॅटेलाईट भारतात पोहोचणार

NISAR Satellite Ready To Launch : भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या नासाकडून हे सॅटेलाईट तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कामासाठी हे सॅटेलाईट भारतात दाखल होईल. नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निसार सॅटेलाईट भारतात दाखल होईल.

Aurangabad Crime News: महिलेसोबत 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; औरंगाबादेतील घटना

Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या बालाजीनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारा तरुण एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दातील बालाजीनगर भागांत त्याने आत्महत्या केली आहे. मुकेश नागोराव गव्हांदे (वय 30 वर्षे, रा. चौंढी टाकळेश्वर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) असे या युवकाचे नाव आहे.

Aurangabad Abortion News : औरंगाबाद गर्भपात प्रकरणात मोठा खुलासा

Aurangabad Abortion News: औरंगाबाद गर्भपात प्रकरणात (Aurangabad Abortion Case) आता आणखी नवीन खुलासा झाला असून, आरोपी डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव या दाम्पत्याकडे रुग्णालय चालवण्याचा परवानाच नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तर गेल्या तीन-चार वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महिलेचा गर्भपात केल्यावर तिची प्रकृती बिघडल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. 

Chinese Spy Balloon : चीनचा स्पाय बलून फोडला, F-22 फायटर जेटनं क्षेपणास्त्राचा मारा

America Shot Down Chinese Spy Balloon : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात दिसणाऱ्या चीनच्या स्पाय बलूनवर (China Spy Balloon) अमेरिकेने (America) मोठी कारवाई केली आहे. चीनचा स्पाय बलून अमेरिकेनं पाडला आहे. अमेरिकेने F-22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला आहे. यासोबतच अमेरिकेने चीनचा हेरगिरीचा डाव हाणून पाडला आहे. अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या स्पाय बलूनबाबत चीनने सांगितले होते की, याचा वापर हवामाना संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येईल.

Agriculture News : हवामान बदलाचा शेती पिकांना फटका, बुलढाण्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार

Agriculture News : हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत असल्याचं चित्र दिसत आहे. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातही हरभरा पिकावर (Gram Crop) या हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

Indian Cricketer Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने (Vinod Kambli Wife Andrea) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विनोद कांबळीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो प्रवासाचं नियोजन करुनच घरातून निघा; आज लोकलच्या या मार्गांवर आहे मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block:  रविवार म्हणजे, मुंबईकरांच्या (Mumbai News) हक्काचा सुट्टीचा दिवस. आज जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल, त्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचं असेल तर त्याआधी तुमच्या प्रवासाचं नियोजन करा. या रविवारी मध्य रेल्वेवर (Central Railway) हार्बर (Harbor)  मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रविवार 5 फेब्रुवारी रोजी  मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार आहे. यामुळं मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर

CM Eknath Shinde Chiplun Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळून दौऱ्यावर आहेत.  सकाळी अकरा वाजता ते लोककला महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याबरोबरच  नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे. शिवाय अमेरीकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. 


 नांदेड येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा


 नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळून दौऱ्यावर आहेत.  सकाळी अकरा वाजता ते लोककला महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. 


अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर


राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी साडे नऊ वाजता पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे  प्रादेशिक पाणी योजनेचे भूमिपुजन ते करणार आहेत. विशेष म्हणजे याच कामाचे शनिवारी भाजप खासदार सुजय विखे यांनी भूमिपूजन केले आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती. 


सासवडमध्ये सत्यशोधक परिषद


पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक परिषदेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित राहणार आहेत. 


 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ 


अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ सकाळी 10 वाजता आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील. तर प्रमुख अतिथी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार असतील. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी शिक्षण उपमहासंचालक नरेंद्रसिंह राठौर हे मुख्य दीक्षांत भाषण करतील.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.