Devyani Pharande Meets Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दारूण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पहिल्यांदाच तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा ते आढावा घेणार आहेत. मात्र राज ठाकरे नाशिकमध्ये (Nashik News) दाखल होताच भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या (Nashik Central Vidhan Sabha Constituency) आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी त्यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. भाजपकडून देवयानी फरांदे, शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत गीते (Vasant Gite) आणि मनसेकडून अंकुश पवार (Ankush Pawar) यांना तिकीट देण्यात आले होते. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसेच्या एन्ट्रीने भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अंकुश पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. यामुळे देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. अंकुश पवार यांच्या माघारीनंतर या मतदारसंघात देवयानी फरांदे विरुद्ध वसंत गीते असा दुहेरी सामना रंगला. यात देवयानी फरांदे यांचा विजय झाला होता.
राज ठाकरेंच्या भेटीवर देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच देवयानी फरांदे यांनी त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी पत्रकारांशी बोलताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आगामी कुंभमेळा, नाशिकचा विकास या विषयांवर राज ठाकरे यांची भेटीदरम्यान चर्चा झाली. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेतला, त्याचा निश्चितच मला फायदा झाला. मात्र, त्या संदर्भात आज कुठलीही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आढावा
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांनी आढावा घायला सुरुवात केली आहे. पक्षातील निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत. पक्षातील काही नाराज, जुन्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील राज ठाकरे चर्चा करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा राज ठाकरे घेत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेत काही बदल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?