Maharashtra News Updates 24 January 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jan 2023 07:08 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर आडवा; वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर आडवा झाला आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस आणि आय आर बी कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचे पत्रच नाही. राजभवनाचे माहिती अधिकारात उत्तर

शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजपा बरोबर सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र या दोघांना शपथविधीसाठी आमंत्रित केलेले पत्रच नसल्याचे माहिती आधिकारात पुढे आले आहे. नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राजभवन मध्ये अर्ज केला होता. भाजपा - शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना पत्र दिले होते का. दिले असेल तर त्यांची प्रत देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर राजभवनाकडून उत्तर आले असून सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र दिलेले नसल्याने त्याची प्रत उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे सरकार चुकीच्या पध्दतीने आले असून याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासले. 

पीकविम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड करुन टाळे ठोकले. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तसेच पीकविम्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला.


शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा आठ दिवसांपूर्वीच दिला होता. आज दुपारी आक्रमक शिवसैनिकांसह जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत शेतकरी बँक कॉलनी भागातील पीकविमा कार्यालयासमोर धडकले. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या प्रती उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. हजर असलेल्या दोन अधिकार्‍यांच्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात गोंधळ उडाला. शिवसेनेसह जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत शेतकर्‍यांना हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे अशी मागणी केली.

करुणा मुंडे यांच्या विरोधात परळी मध्ये गुन्हा दाखल..

धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडेंविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांनी फोन करुन आपल्याला शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार परळीतील एकाने केली आहे.

 


करुणा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी फेसबुक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर कमेंट का केली म्हणून करुणा मुंडेंनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार परळी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तक्रारीनंतर करुणा मुंडेंसह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

परळी शहरातील पंचवटीनगर येथील रहिवासी बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी करुणा मुंडेंविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत दहिफळे यांनी सांगितले आहे की, काही दिवसांपुर्वी फेसबुकवर करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर मी कमेंट केली होती. त्यानंतर 22 जानेवारी रोजी रात्री 9.40 वाजता करुणा मुंडे यांनी फोन करत तु माझ्या फेसबुक पोस्टवर कमेंट का केली म्हणुन शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.



 

 
उद्धव ठाकरे यांची अजित पवार घेणार भेट

जयंत पाटील आणि अजित पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बीडमध्ये राहणार पाचशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Beed Teacher Constituency Election : 30 जानेवारीला होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी बीडमध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बीड जिल्ह्यात 34 केंद्रावर मतदान होणार असून यासाठी 15 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून बीड जिल्ह्यात 9 हजार 739 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे

सिंधुदुर्गच्या कणकवलीमधल्या कनेडी बाजारपेठेत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा

Sindhudurg News : कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारपेठेत भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांत जोरदार राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या कनेडी येथील संपर्क कार्यालयासमोर ही घटना घडली. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय, पराभवाचे पडसाद आजच्या घटनेतून उमटले असून कनेडीत वातावरण तंग आहे. या घटनेनंतर कणकवली पोलीस कनेडीत तात्काळ दाखल होत इथे छावणीचे स्वरुप आलं आहे.

चिपळूणमधील डेरवण महाविद्यालयात कोकणातील पहिली स्पेस लॅब

Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आज कोकणातील पहिल्या स्पेस लॅबचे उद्घाटन कोकणचे सुपुत्र निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या हस्ते पार पडले. या स्पेस लॅबमध्ये अंतराळवीरांसाठी आवश्यक साधने, प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून इथे शिकणाऱ्या मुलांना अंतराळ संशोधनात वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची परिपूर्ण माहिती याठिकाणी मिळणार आहे. 

MNS Politics News : कथित कोविड काळातील भ्रष्टाचारा विरोधात मनसे आक्रमक

MNS Politics News : युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे. तसेच, चौकशीसाठी महापालिका आयुक्तांकडे देखील तक्रार करणार आहे. कथित भ्रष्टाचार विरोधातील सर्व पुरावे पेनड्राईवमध्ये देणार आहेत. आज युवासेनेचे पदाधिकारी वैभव थोरात आणि स्थानिक वॉर्ड ऑफिसर विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी मनसेकडून अँटी करप्शन ब्युरो वरळी येथे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे दाखल झाले आहेत. सॅनिटायझर, खाण्याची पॅकेट, लॉन्ड्री या टेंडर प्रक्रियेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. युवासेना पदाधिकारी वैभव थोरात आणि वॉर्ड अधिकारी यांच्या संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

Pune Kasba Politics : कसबा विधानसभेची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी; माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची मागणी

Pune Kasba Politics : कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. दोन दिवसांत सचिन आहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. शिंदे गटाविरोधात असलेल्या रागाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा अशी मागणी विशाल धनवडे यांनी केली. 2019 ला विशाल धनवडे यांनी युती असल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती.

Nagpur News : दोन तरुण डॉक्टरांनी आपापसांत लावलेल्या कार रेसला भीषण अपघात

Nagpur News : नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारच्या मध्यरात्री वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दोन तरुण डॉक्टरांनी आपापसांत कारची रेस लावली होती. त्याच्या कारचा वेग इतका जास्त होता की डॉ. अभिनव अहुजा आणि डॉ. वरून दहिया डॉक्टरांच्या कार अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळल्या आणि भीषण अपघात झाला. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाले आहे. अपघात इतका भीषण होता की कारने रस्त्यालगचे सुरक्षा कठडे तोडले. अपघातानंतर कारचे दृश्य बघितल्यानंतर त्या अपघाताची तीव्रता लक्षात येते. सुदैवाने एअरबलून उघडल्याने दोन्ही डॉक्टरला गंभीर इजा झाली नाही. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे अपघात इतका भीषण असताना नागपूर पोलिसांनी कारवाई संदर्भात साधी दखलही घेतली नाही. 

Maharashtra Nashik crime News : आधी लिफ्ट मागितली, नंतर दारूसाठी पैसेही मागितले, नाशिकच्या पंचवटीतील खुनाचा उलगडा
Pune News : पुण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; पठाण चित्रपटाचा बॅनर काढून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या

Pune News : राहुल चित्रपटाबाहेर बेकायदा जमाव जमून पठाण चित्रपटाचा बॅनर काढून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि शाहरुख खानच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे नितीन महाजन यांच्यासह 15 ते 19 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल चित्रपटाबाहेर बजरंग दलाकडून पठाण चित्रपट विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.

Palghar News: पालघर रेल्वे स्थानकावरील लिफ्टमध्ये चार महिला तब्बल दीड तास अडकून पडल्या

Palghar News: पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या लिफ्टमध्ये चार महिला तब्बल दीड तास अडकून पडल्याची घटना समोर आली आहे . तांत्रिक बिघाडामुळे ही लिफ्ट बंद पडल्याची माहिती समोर आली असून तब्बल दीड तासांच्या प्रवाशांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर या महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर झालेल्या सुटकेमुळे या महिलांना अश्रू अनावर झाले असून रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप यावेळी या महिलांकडून करण्यात आला.

साताऱ्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एकाची गोळी झाडून हत्या

Satara Firing : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एकावर रात्री गोळीबार करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमित भोसले असे खून झालेल्या व्याक्तीचे नाव असून याची पत्नी  सातारा पोलीस खात्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घडलेल्या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमित हा त्याचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत गाडीत बसला होता. त्याचावेळी मोटरसायाकलवर आलेल्या दोघांनी त्याला गाडीतून खाली उतरवून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि खून केला. 

Pune Covid Center: ई़डीने आता पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेकडून ईडीने कंत्राटासंदर्भात मागवली माहिती

Pune Covid Center: मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोव्हिड काळात लाइफलाइन या कंपनीला जंबो कोवीड सेंटर चालवण्यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं. दरम्यान यासंदर्भात ईडीने आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेकडून या कंत्राटासंदर्भातली माहिती मागवलीये. पी.एम.आर.डी. ए.मार्फत हे कंत्राट देण्यात आलं होतं आणि यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

Patra Chawl Scam Case: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज आरोप निश्चितीची प्रक्रिया

Patra Chawl Scam Case: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सर्व आरोपींवर आज आरोप निश्चितीची प्रक्रिया  होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे.  मुंबई सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस जारी केलीय.  

Nanded News: नांदेड वाघळा महापालिकेतील 150 कोटींच्या कामांवरील स्थगिती रद्द

Nanded News: नांदेड वाघाळा महानगरपालिकेला शहरातील विकासकामांचा निधी वितरित करण्यावर विद्यमान सरकारने आणलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. नांदेडच्या तत्कालीन महापौर जयश्री नीलेश पावडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आणि नगरसेवक उमेश पवळे यांनी अँड. महेश देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दोन याचिकांद्वारे या निर्णयास आव्हान दिले होते. ज्यात मागील शासनाने शहरातील दीडशे कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. मात्र,विद्यमान सरकारने त्यावर स्थगिती आणल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी शासनाचा हा निर्णय सोमवारी रद्द केलाय.


महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास खात्याने 22 जून 2021च्या शासन निर्णयाद्वारे नांदेड शहरातील रस्ते आणि गटारी या मूलभूत गरजांच्या कामांकरिता 150 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर निविदा प्रसिद्ध करून कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले होते. कामे प्रगतिपथावर असताना हा 150 कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, सत्तांतर झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने 48 तासांच्या आत 1 जुलै 2022 च्या शासन निर्णयाद्वारे या निधीस स्थगिती दिली होती.

Cricketer Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाचा धक्का

Cricketer Mohammed Shami: कोलकाता न्यायालयानं भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित 80 हजार रुपये तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मुलीच्या देखभालीसाठी असतील, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 


2018 मध्ये, हसीन जहाँने 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करत कोर्टात दावा दाखल केला होता. त्यापैकी 7 लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित 3,00,000 रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील, असं तिनं आपल्या वतीनं कोर्टात सांगितलं होतं. 

राज्यात 75 हजार पदांच्या नोकरीची जाहिराती कधी प्रसिद्ध होणार?

75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा म्हणजे नुसते गाजर दाखवल्याचा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा आरोप


जानेवारी महिन्यात जाहिराती प्रसिद्ध न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा


राज्यात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.


त्यामुळे 75 हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.


जानेवारीमध्ये जर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही, जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाल्या नाहीत... संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे.


स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पोलीस शिपाई भरती सोडल्यास वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेला नाहीत.
महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे.


75 हजार पदभरतीची घोषणा करून तीन ते चार महिने उलटून गेले मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाहीये या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरू केली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. याबरोबरच गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. शिवाय अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  दिल्ली दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे.  


मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया


गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे.  मुंबई सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस जारी केलीय.  


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नशिक दौऱ्यावर


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता हात से हात जोडो कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर पदवीधर मतदारसंघच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची बैठक होणार आहे.  


अर्णब गोस्वामींविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी 


अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 


 राखी सावंतच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी


अभिनेत्री राखी सावंत हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार राखीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 


राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी साधणार संवाद   


राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार बीडच्या राजुरी येथील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला मिळालाय.  


केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक


आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक होआर आहे. 


राहुल गांधी यांची पत्रकार परिषद


भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होआर आहे. आज दुपारी 1 वाजता जम्मू-काश्मीरमधील इज्जर कोटलीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. 


इंदौरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटाचा सामना


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज दुपारी 1.30 वाजता इंदौरच्या होळकर स्टेडीयमवर होणार आहे. याबरोबरच आजच रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.