Maharashtra News Updates 15 December 2022 : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ट्वीटसंबंधी खुलासा करण्यासाठी एवढा वेळ का लागला; उद्धव ठाकरे यांचा सवाल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Dec 2022 11:27 PM
मराठी बोलणाऱ्या लोकांनी दगडफेक करून वाहनाची काच फोडली म्हणून पोलिसात तक्रार दिलेल्या वाहन चालकाचा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस
मराठी बोलणाऱ्या लोकांनी दगडफेक करून वाहनाची काच फोडली म्हणून पोलिसात तक्रार दिलेल्या वाहन चालकाचा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून स्वतः अपघात करून काच फोडल्याची कबुली वाहन चालकाने पोलिसांना दिली आहे. बंगलोर येथून चामराज पेठ येथून चेतन एन. व्हीं.हा वाहनचालक बेळगावला अधिवेशनासाठी बुधवारी सकाळी निघाला होता.बेळगावला येताना वाहनचालकाने तडस येथे थांबून बारमध्ये दारू ढोसली .नंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने स्टील बार भरून नेणाऱ्या ट्रकला वाहनाची धडक दिली आणि बोलेरो जीपची काच फुटली.आता आपल्याला वरिष्ठ ओरडतील म्हणून वाहन चालकाने सुवर्ण सौध येथे राष्ट्रीय महामार्गावर मराठी बोलणाऱ्या लोकांनी वाहनावर दगडफेक करून काच फोडली असा बनाव रचला.पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तक्रार देण्यासाठी चालकाला हिरे बागे वाडी पोलीस स्थानकात बोलवले.यावेळी हिरे बागे वाडी येथील टोल नाक्यावरील सी सी टी व्हि. फुटेाज पोलिसांनी तपासले असता अगोदरच काच फुटल्याचे समजले.नंतर वाहन चालकाने आपली चूक लपविण्यासाठी मराठी बोलणाऱ्या लोकांनी दगडफेक केल्याचे नाटक रचल्याचे कबूल केले.
'एकदा काय झालं!!'ची 'चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड 

प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित चित्रपट 'एकदा काय झालं!!' ची चेन्नईच्या प्रतिष्ठित 'चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये निवड झाली आहे. कथा सांगणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीची एक हळवी गोष्ट या चित्रपटाद्वारे मांडली आहे. चित्रपटाची इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड झाली आहे.

पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याची सुरेल गायकी

पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याची सुरेल गायकी आणि मैहर सेनी घराण्याच्या बहारदार सरोदवादनाचा आनंद लुटत रसिकांनी अनुभविली संगीतमय संध्याकाळ. दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे दिल्ली स्थित गायक अविनाश कुमार यांच्या गायनाने झाली. 


त्यानंतर मैहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांनी सरोदवादन झाले. कार्यक्रमात आलम खाँ यांचे वडील उस्ताद अली अकबर खाँ आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले, " माझे वडील आणि उस्तादजी यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांमधील समान दुवा म्हणजे दोघांनाही गाडी चालवण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्याप्रमाणे पुढील पुढील पिढीतही हा जिव्हाळा कायम राहील, असा मला विश्वास आहे." 


आलम खाँ म्हणाले, " कोविडनंतर हे माझे पहिलेच सादरीकरण आहे. या ठिकाणी माझी कला सादर करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यापुढील काळात भारतात आणखी काही कार्यक्रम सादर करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी मिळेल, अशी मला खात्री आहे."

वणीचे तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे सह 24 नगर सेवक विरुद्ध गुन्हे दाखल. 





यवतमाळच्या वनी नगरपरिषदेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या सूचनापत्रात पाच विषयावरचे ठराव पारित करण्यात याबाबत चर्चा करण्याचे नमूद केले होते. परंतु नंतर ही सभा रद्द करण्यात आली आणि तीन मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात सभा घेण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत पाच विषयावरील ठराव पारित होणार होते. परंतु  दोन अतिरिक्त ठराव टाकण्यात आल्याचा आरोप करत  सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या आधारे मिळविले. त्यानंतर याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी वणीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आज गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले. त्यावरून वनी पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी संदीप बोरकर, नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, यांच्यासह 24 नगरसेवकांविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये कोणी दाखल करण्यात आले.


 

 



 


लोकशाहीत मोर्चा काढणे अधिकार, यात कुठेही सरकार आडकाटी आणणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

लोकशाहीत मोर्चा काढणे अधिकार, यात कुठेही सरकार आडकाटी आणणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde: कोळी बांधवाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश, कोळीवाड्याचा विकास करणार: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे,


- आम्ही कोळीवाडा संदर्भात निर्णय घेतला आहे. कोस्टल रोडच्या समुद्रातील पिलरमधील अंतर वाढवावा अशी मागणी होती,आम्ही भुमीपुत्रांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे.
- यासाठी कमिटी स्थापन केली होती, डिझाईन तयार करण्यात आलं होतं. तरीही आम्ही त्यात बदल केला आहे. 
- काही मोठ्या संस्थांकडे जाऊन मार्गदर्शन घेता येईल का या संदर्भात ही चर्चा केली. यासाठी साडेसहाशे कोटी अधिकचा खर्च लागणार आहे.
- वेळेत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मच्छीमार यांना अडचण होऊ नये यासाठी हा निर्णय घेत आहोत. 
- हा प्रकल्प वेळेत पुर्ण करावा. कोळीवाडा सीमांकनचा प्रश्न आहे

Mahavikas Aghadi Mahamorcha: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ट्वीटसंबंधी खुलासा करण्यासाठी एवढा वेळ का लागला; उद्धव ठाकरे यांचा सवाल

महाराष्ट्र-कर्नाटकात तणाव वाढवणारे ते ट्वीट आपलं नसल्याचा खुलासा करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना एवढा उशीर का लागला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 15-20 दिवस प्रकरण चिघळलं, मग कालच्या बैठकीला काय अर्थ होता असंही त्यांनी विचारलं. 


 

Mahavikas Aghadi Mahamorcha: येत्या 17 तारखेला शांततेच्या मार्गाने महामोर्चा काढणार: अजित पवार

राज्यातील महापुरषांच्या विरोधात राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याला विरोध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं 17 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक झाली. सीमाप्रश्न, शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चासाठी अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नाही, पण ती परवानगी लवकरच मिळेल असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Nandurbar News : विद्यार्थ्यांनी भरलेल्या अमळनेर-पावागड बसचा अपघात; चार विद्यार्थी जखमी 

Nandurbar News : महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली.यामध्ये सुमारे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजता सुमारास अपघात झाल्याची माहिती निझर पोलीसानी दिली आहे.


जळगाव जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला.बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे.अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते.विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालकाने घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा, नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, महसूल व वन विभागाचा निर्णय जाहीर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा, नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, महसूल व वन विभागाचा निर्णय जाहीर


 


जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार


बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार


बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये


नुकसानीची मर्यादाही वाढवली


दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मिळणार मदत

बेळगावमध्ये अधिवेशनासाठी येणाऱ्या वाहनावर दगडफेक करुन काच फोडली
Belgaon News : बेळगावातील अधिवेशनासाठी येत असलेल्या सरकारी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करुन काच फोडल्याची घटना बुधवारी (14 डिसेंबर) रात्री साडे दहा वाजता घडली आहे. गेल्या काही दिवसापासून सीमा प्रश्नावरुन वातावरण तापले होते. आता कुठे वातावरण निवळले असून परिस्थिती पूर्ववत होत असतानाच अधिवेशनासाठी बेळगावला येत असलेल्या सरकारी बोलेरो वाहनावर दगडफेक करुन समोरील काच फोडण्यात आली आहे. सुवर्णसौध येथील राष्ट्रीय महामार्गावरुन बोलेरो जीप येत असताना काही जणांनी रस्ता अडवून जीप थांबवली आणि काच फोडली. ड्रायव्हरला मारा असे हल्लेखोर म्हणत असतानाच ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी पुढे नेली आणि तो बेळगावात दाखल झाला. रात्री त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गाडी लावून गाडीतच झोप घेतली. सकाळी ही घटना अधिकाऱ्यांना सांगतली. सोमवारपासून सुरु होणाऱ्या बेळगावातील अधिवेशनासाठी परगावाहून देखील सरकारी वाहने मागवण्यात आली आहेत.
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकरच्या हाडांचा डीएनए तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला; दिल्ली पोलिसांच्या तपासाला मिळणार गती

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकरच्या हाडांचा डीएनए तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. फॉरेन्सिक अहवालात ही बाब समोर आली आहे. यामुळे आता दिल्ली पोलिसांच्या तपासाला गती मिळणार आहे. 

Nashik Agriculture News : अवकाळी पावसामुळं द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढला, द्राक्ष पंढरीतील शेतकरी अडचणीत

Nashik Agriculture News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असाताना आता अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. याचा मोठा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष बागांना (Grapes crop) बसला आहे. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या बागांचे मनी गळत आहेत. तसेच पावसामुळं हे द्राक्षाचे मनी कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Trimbakeshwer Fogg : अवघं त्र्यंबकेश्वर शहर धुक्यात हरवलं

Trimbakeshwer Fogg : गुलाबी थंडी, दाट धुक्यात हरवलेलं शहर, पक्षांचा किलबिलाट, हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, त्यातून वाहणारा थंडगार वारा, असे गुलाबी वातावरण सध्या त्र्यंबकचा ब्रह्मगिरी पर्वत (Bramhgiri) बुडालाय. नाशिक पासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहर धुक्यात हरविल्याची चित्र आज अनुभवयाला मिळाले. सध्या या धुक्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील लालबाग परिसरातील टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला पुन्हा आग

Coastal Road Project : वरळीतील समुद्रात दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय

Coastal Road Project : मुंबईतील (Mumbai) कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील खांबांमधील अंतरावरुन महापालिका (BMC) आणि वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. मच्छिमार बोटींचे अपघात टाळण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी इथल्या समुद्रामधील 7 ते 9 या तीन खांबांमधील क्रमांक 8 हा खांब रद्द करुन दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Aurangabad Rain News: औरंगाबादच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Aurangabad Rain Update: आधी अतिवृष्टी (Heavy Rain) त्यानंतर परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केल्यावर, आता शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभं राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) कालपासून अनेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे औरंगाबाद ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील तब्बल तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 

India China Trade : भारत-चीन सीमेवर तणाव कायम! व्यापारी संबंध मात्र वाढतेच

India China Trade Relations : भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सर्वज्ञात आहे. ड्रॅगनकडून सातत्याने सीमेवर कुरापती सुरु असतात. याला भारत चोख प्रत्युत्तर देतो. भारत-चीन सीमेवर एकीकडे तणाव पाहायला मिळत असताना भारत-चीनमधील व्यापारामध्ये वाढ झाली आहे. नुकताच भारत आणि चीनममध्ये तवांग सेक्टरमध्ये संघर्ष झाला. यानंतर भारत-चीन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. भारताचे चीनसोबत व्यापारी संबंध आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने चीनसोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची भावना व्यक्त होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीच्या दर्यापूरमधल्या आठवडी बाजार परिसरात दोन तरुण मध्यरात्री हातात पिस्तूल घेऊन फिरत असल्याचं कॅमेऱ्यात कैद

Amravati News : अमरावतीच्या दर्यापूर शहरातील आठवडी बाजारात परिसरात मध्यरात्री दोन युवक हातात पिस्तूल घेऊन फिरत असताना कॅमेऱ्यात कैद झालं. दर्यापूर शहरांमध्ये दोन तरुण हे मंगळवारी मध्यरात्री आठवडी बाजार परिसरातून हातात पिस्तूल घेऊन फिरत असताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दर्यापूर शहरात मध्यरात्री संपूर्ण शुकशुकाट असल्यामुळे हे दोन तरुण बिनधास्तपणे तोंडाला कापड बांधून फिल्मी स्टाईलने हातात पिस्तूल घेऊन शहरातून फिरत असताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आता या व्हिडीओमधील युवकांचा दर्यापूर पोलीस तपास लावणार का याकडे लक्ष लागले आहे.

तीन महिन्यांपासून बंद घरातील स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह आढळला, औरंगाबादच्या वाळूजमधील धक्कादायक प्रकार

Aurangabad News : औरंगाबादच्या वाळूज भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा असल्याने मृतदेह महिलेचा आहे की पुरुष याबाबत खात्री होऊ शकलेली नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. तसंच नरबळीचाही प्रकार असू शकतो असाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरु

Mumbai Local : तब्बल एक तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरु झाली आहे. जुईनगर रेल्वे स्टेशनवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून ते सातच्या दरम्यान वाशी ते पनवेल दरम्यान ट्रेन बंद होती. मात्र आता हा बिघाड दुरुस्त झाल्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल सेवा सुरु झाली आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यलयाच्या गुंठेवारी विभागात आग, जिल्हाभरातील गुंठेवारीची कागदपत्रे जळून खाक
Nanded News : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल मध्यरात्री भीषण आग लागली, ज्यात गुंठेवारीची महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही आग जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागात लागली. या विभागातील जिल्ह्याभरातील गुंठेवारीची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
सिद्धिविनायक मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यातील दर्शन पाच दिवसांसाठी बंद, 14 ते 18 डिसेंबर दरम्यान गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार

Mumbai News : मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील गाभाऱ्यातील श्रींचे दर्शन कालपासून (14 डिसेंबर) पाच दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल. त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने दिली आहे. श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात. 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. 19 तारखेला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल. 

Mumbai News: मुंबई: हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प ;जुईनगरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

Mumbai Local Train Updates: हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर मुंबई ते वाशी दरम्यानची वाहतूक सुरळीत आहे. बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. 

Mumbai Worli Bandh: शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात आज वरळी बंदची हाक

Mumbai Worli Bandh: वरळीतील आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटना आणि छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत करणार आहे. महाविकास आघाडीचे 17 तारखेला आंदोलन आहे, त्या अगोदर वरळीत हा बंद असणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


सरकार विरोधात महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या मोर्च्याच्या आयोजनाबाबत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. 17 तारखेला होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होईल.


साताऱ्यात शाहू महाराज स्मृतिदिन कार्यक्रम


शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेत श्रीमंत कोकाटे, धनाजी मासाळ आणि आदिनाथ बिराजे यांचीही भाषणे होतील. हॉटेल मराठा पॅलेस, सातारा 


पोलिस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस 


उस्मानाबाद- पोलिस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत भरतीसाठी 11 लाख अर्ज आल्याची माहिती आहे. म्हणजे एका जागेसाठी साधारण 80 उमेदवार स्पर्धा करणार आहेत. 


आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे


मुंबई- वरळीतील आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटना आणि छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.


नागपूर ते शिर्डी मार्गावर आजपासून एसटी सेवेला सुरुवात


समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी मार्गावर आजपासून एसटी सेवेला सुरुवात होईल. दोन्ही बाजूनी रात्री 9 वाजता बस निघेल व पहाटे 5.30 वाजता पोहचेल. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.1300/- व मुलांसाठी रू.670/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात 100% मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50% सवलत असणार आहे.


राज ठाकरे यांचे कार्यक्रम


मुंबई- शिवाजी पार्कमध्ये आयोजित मनसेच्या जत्रा महाराष्ट्राची कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता


मुंबई- साकीनाका येथे मनसे आयोजित मनसे महोत्सवला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 5.30 वाजता


आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा कृषी अधिकारी कार्यालयावर आंदोलन 


अमरावती-  शेतकऱ्यांच्या पिक विमा आणि इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा कृषी अधिकारी कार्यालयावर आंदोलन होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.