मुंबई/ नागपूर : महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज राहिली नसून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी उदय येईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वडेट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा दिला. उदय सामंतांसोबत  20 आमदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे, यामुळं राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.


विजय वडेट्टीवार काय म्हणाले?


आता शिंदे साहेबांची गरज संपली का? आणि कदाचित ते बाजुला व्हावेत की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल, तो उदय कुठला असेल, त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न होईल, ही स्थिती महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत येईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 


संजय राऊत काय म्हणाले?


उदय सामंतांचं नाव घ्या, दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंत यांच्या बरोबर  20 आमदार आहेत ही माझी माहिती आहे. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रिपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, एकनाथ शिंदे सावध झाले अन् झाकली मूठ सव्वा लाखांची ठरली, असं संजय राऊत यांनी म्हटलं. 


सुषमा अंधारे काय म्हणाल्या?


तुम्ही जे पेरता तेच परत उगवून तुम्हाला परत मिळतं. विजय वडेट्टीवारांचं आताचं विधान की नव्या समीकरणाचा उदय होऊ शकतो का हे महत्त्वाचं आहे. कारण, ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करुन सरकार स्थापन केलं जात होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, जर उपमुख्यमंत्री पद शिंदे गटाकडे जाणार  तर शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत या चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हा उपमुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार होऊ शकतो, असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षेला धुमारे फुटले होते हे लपून राहिलेलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 


एकनाथ शिंदे यांचं दबावतंत्राचं राजकारण भाजपला फारसं पसंत पडलेलं नाही. उदय सामंतांसारखा फ्लेक्सिबल चेहरा मिळत असेल. उदय सामंत आधी राष्ट्रवादीत, नंतर शिवसेनेत पुढं शिंदे गटात, उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर शिंदे गटाशी चटकन फारकत घेऊन भाजपशी घरोबा करु शकतात. फ्लेक्सिबल चेहऱ्याला सोबत घेऊन भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.     


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजू वाघमारे यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. विरोधकांचं निवडणुकीतील पराभवामुळं आलेले फ्रस्टेशन यातून दिसून येत असल्याचं ते म्हणाले.



इतर बातम्या :


एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही, शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा 'उदय' होईल; विजय वडेट्टीवारांनी महायुतीला डिवचलं