Jalgaon Crime News : पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या मंडळींनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली होती. या घटनेने सैराट चित्रपटातील कथानकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मुकेश रमेश शिरसाठ (30) असे तरुणाचे नाव आहे. तर या घटनेत 7 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश याने पाच वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय व आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. काल सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचविण्याचा करणाऱ्या मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने तेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पिंप्राळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
जावयाचा बदला घेण्यासाठी पाच वर्ष बघितली वाट
दरम्यान, प्रेम विवाह केल्याने मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्याच्या सोबत वैर निर्माण झाले होते, असे मुलाच्या काकांनी म्हटले आहे. तसेच विवाह झाल्यापासूनच ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते. काल त्यांना मुकेश हा एकटा सापडला आणि त्यांनी कोयता, लाठ्या काठ्यांनी त्यांनी त्याला वार करत ठार केले, असेही मुलाच्या काकाने म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर अशा 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.
आणखी वाचा