Maharashtra News Live Updates :  अनिल देशमुखांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2023 10:09 PM
बीडमध्ये अपघात, तीन जणांचा मृत्यू

माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ स्विफ्ट गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना  घडली.

रेती माफियांचा महसुलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला

वर्ध्यात हिंगणघाट येथे वणा नदी पात्रात अवैध रेती वाहतूक करीत असणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुल प्रशासनाच्या पथकावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहेय. दगडफेक करीत लाथा बुक्क्यांनी तालाठ्याला मारहान करण्यात आलीय. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून रोष व्यक्त होत आहे. याबाबत हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून  हिंगणघाट पोलिसात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अन् पंकजा मुंडे अचानक पोहोचल्या पाव भाजी सेंटरवर
परळी शहरातील जिजामाता उद्यानातील पाव भाजीची मजा काही ओरच..इथली टेस्ट तशी लाजवाबचं....भले भले लोक इथली टेस्ट घेत असतात.  फार दिवसापासून मनात असलेली ही टेस्ट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज पूर्ण केली..ती ही  त्यांच्या वर्ग मित्रांनी केलेल्या आग्रहामुळं..संध्याकाळी पाव भाजी सेंटरवर  अचानक आलेल्या पंकजा मुंडे ना पाहून नागरिकही अचंबित झाले.

 
 मामाच्या ऐवजी मारेकर्‍यांनी भाचाची केली हत्या

मिरा रोड येथे सोमवारी ३० जानेवारीला एका डिलिवरी बॉयची ९ जणांनी चाकू भोसकून हत्या केली होती. याप्रकरणात काशी मिरा गुन्हे शाखा क्रमांक १ ने नउ जणांना अटक केलं आहे. मामाला मारण्याऐवजी मारेक-यांनी भाचाची हत्या केल्याच हत्येच कारण समोर आलं आहे. तर पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादावरुन ही हत्या झाल्याच ही उजेडात आलं आहे. 

Pune : फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावर राज्य सरकार ठाम, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाड्याचा प्रश्न सामोपचारानं मार्गी लावण्यास तयार असल्याची ग्वाही बुधवारी राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. मात्र, चर्चेतून प्रश्न न सुटल्यास त्या जागी स्मारक उभारण्याकरता न्यायालयीन लढा देण्याची तयारी राज्य सरकारनं दर्शवली आहे. बुधवारी यासंदर्भात हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जातीनं उपस्थित होते.








 






 











 अनिल देशमुखांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर झालाय. मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने हा जामीन मंजूर केलाय. एक लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र, सीबीआयच्या प्रकरणातही कुंदन शिंदे अटकेत असल्यामुळे त्यांची तूर्तास कारागृहातून सुटका होणार नाही.  

राष्ट्रीय महामार्गावरील पथ दिव्याचे लोखंडी खांबे चोरणाऱ्यांना दोघांना वाशीम ग्रामीण पोलिसांकडून अटक
Washim News : अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर लावण्यासाठी ठेवलेले पथ दिव्याचे लोखंडी खांबे चोरणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह वाशीम ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. वाशीम नांदेड महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या पथ दिव्यांचे लोखंडी खांबे गॅस कटरच्या साहाय्याने कापून एका वाहनातून नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह अटक केली. पथदिव्याचे लोखंडी खांबे माँट कार्लो कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले असून कंपनीच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahmednagar Fake Doctor : बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात महिलेचा मृत्यू

Ahmednagar Fake Doctor : अहमदनगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानदेव पवार असं बोगस डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी या डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Buldhana Suicide Attempt : स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील आत्मदहनाचा प्रयत्न, बुलढाण्यातील घटना

Buldhana Suicide Attempt : बुलढाण्याच्या खामगाव तहसीलदार यांच्या दालनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने कार्यालयात खळबळ उडाली. मागील वर्षात  झालेली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मध्ये खामगाव तालुका समाविष्ट करण्यात यावा. तसेच सन 2022 मध्ये शेतकऱ्यांनी काढलेला पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी या मागणी करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल पाटील यांनी आज खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालया च्या इमारतीत तहसीलदार  यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस वेळेवर त्या ठिकाणी पोहचल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणले असून पोलीस कारवाई सुरु आहे.

Beed News : अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात बोगसगिरी, 26 शिक्षकाचे निलंबन
Beed News : अपंगत्वाच्या सर्टिफिकेटमध्ये बोगसगिरी करणाऱ्या 52 शिक्षकांवर आधीच निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यातील 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 78 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांतर्गत शिक्षक, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाईकांनी त्यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रानुसार स्वारातीमध्ये अपंग मंडळापुढे वैद्यकीय पुनर्तपासणीनंतर अहवाल आला होता. ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैधकीय महाविधलंय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून पुनर्तपासणी होऊन आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तप आढळून आल्याने 52 शिक्षकांना निलंबित केल होते. आता पुन्हा 26 शिक्षकांच्या दिव्यांगत्वातही तफावत आढळल्याने आज निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; ऑइल गोदामाला भीषण आग

Bhiwandi Fire : भिवंडी शहरात आगीचे सत्र काही थांबताना दिसत नसून पुन्हा एकदा अग्नितांडआणि पाहायला मिळाले शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग इतकी भीषण होती की परिसरात आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते. तात्काळ आणिीज पुरआणिठा खंडित करण्यात आली आणि या आगी वर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी  दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवानांकडून सुरू केले आहे. मात्र. या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे तर सुदैवााने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खोका कंपाऊंड परिसरात अनेक भंगार गोडाऊन आणि कापडाचे कारखाने आहेत. त्यामुळे परिसरात इतर गोदामांना देखील आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

Solapur Ashtvinayak Darshan : माजी आमदार दिलीप माने यांच्या वतीने महिलांची अष्टविनायक दर्शन यात्रा

Solapur Ashtvinayak Darshan : माजी आमदार दिलीप माने यांच्या वतीने महिलांची अष्टविनायक दर्शन यात्रा काढण्यात आली. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास साडे सातशे महिला या दर्शन यात्रेत सहभागी झाल्या आहेत. अष्टविनायक, भीमाशंकर, जेजुरी, एकमुखी दत्त, केतकेश्वरचे बालाजी मंदिर इत्यादी ठिकाणी देवदर्शनासाठी यात्रा काढण्यात आली आहे. नुकताच उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुका देखील पार पडल्या. यामध्ये माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाला मोठे यश मिळाले आहे. तर येत्या काळात विधानसभा निवडणुका देखील आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दिलीप माने यांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसत आहेत. दरम्यान हे देवदर्शन यात्रा एकूण चार दिवसाची असून दिलीप माने यांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी देखील समाधान व्यक्त केला.

Solapur Christian Morcha : सोलापुरात ख्रिश्चन समाजाचा मूक मोर्चा, धर्मांतराचे खोटे आरोप होत असल्याचे निषेधार्थ आंदोलन
Solapur Christian Morcha : सोलापुरात ख्रिश्चन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो ख्रिस्ती बांधव या मोर्चात सहभागी झाले. ख्रिश्चन समाजावर वारंवार होत असलेले अन्याय अत्याचार, चर्चवरील हल्ले, ख्रिश्चन धर्मगुरूंना मारहाण, धर्मांतराचे खोटे आरोप होत असल्याचे निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या नेतृत्वात सोलापुरातील रंगभवन चौकातील चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. ख्रिस्ती बांधव पहिल्यांदाच अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले आहेत. येशू ख्रिस्ताने आम्हाला शांततेची शिकवण दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्रीयन मराठी ख्रिस्ती आहोत. काही मूठभर लोकांच्या वतीने हा अन्याय अत्याचार सुरू असून त्यांच्या निषेधार्थ आजचा मोर्चा आहे. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही अशी प्रतिक्रिया ख्रिस्ती धर्मगुरूंनी दिली.

 
Beed Andolan : प्रलंबित रेल्वे मार्गासाठी माजलगावात जनता विकास परिषदेचे मुक आंदोलन
मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे मार्ग आणि नगर बीड परळी या रेल्वे मार्गाच काम जलद गतीने व्हाव यासाठी माजलगाव मध्ये तहसील कार्यालयासमोर जनता विकास परिषदेच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आलं.. मराठवाड्यातील जे काही रखडलेले रेल्वे मार्ग आहेत त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर बीडच्या जिव्हाळ्याची असलेली नगर बीड रेल्वे या मार्गाचे काम देखील करण्यात यावं अशी मागणी ही आंदोलकांनी यावेळी केली आहे..

 
Dhule Crop Loss : अतिवृष्टीमुळे तब्बल 250 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामाच्या पिकांना फटका, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Dhule Crop Loss : धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसला आहे. कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीतून धुळे तालुक्यातील तब्बल 11 गावांमधील 353 शेतकऱ्यांच्या 250 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी पुन्हा 'नंबर वन' श्रीमंत, शेअर मार्केटची अदानींना 'धोबीपछाड'

Mukesh Ambani Richest Man Of India : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शेअर बाजारातील 'धोबीपछाड'मुळे अदानींना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे अंबानींना फायदा झाला असून ते पुन्हा 'नंबर वन'वर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक (Reliance Owner) मुकेश अंबानी (Mukesh Ambani Networth)आता गौतम अदानींना (Gautam Adani Networth) मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

Kolhapur Crime : एकाच गावात दीड महिन्यात चार तरुणांची आत्महत्या; टोकाच्या निर्णयाने गावकरी हबकले

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह (Kolhapur News) जिल्ह्यात तरुण आणि तरुणींच्या आत्महत्या (Kolhapur Crime) करण्याचे सत्र सुरुच आहे. करवीर तालुक्यातील वाकरे गावामध्ये (vakare, kolhapur) अवघ्या दीड महिन्यात चार उमद्या तरुणांनी आत्महत्या केल्याने गावकरी हबकून गेले आहेत. गावात समुपदेशन केल्यानंतरही विशाल रामचंद्र कांबळे (वय 26 वर्षे) या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. वाकरे गावात दीड महिन्यातील ही चौथी घटना आहे. 

Dhule Hire Medical College : धुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 112 पदे रिक्त

Dhule Hire Medical College : धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरात 34 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या हिरे रुग्णालयाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे मात्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नसून तब्बल 112 पद रिक्त आहेत याबाबत आत्तापर्यंत 70 वेळा शासनाकडे पत्रव्यवहार करून देखील अद्यापही ही पदे भरली गेली नाहीत. धुळे शहरासह जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिरे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली 50 बेडसाठी सुरू झालेल्या या रुग्णालयाचा विस्तार गेल्या 34 वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र एकीकडे रुग्णालयाचा विस्तार झाला असला तरी, दुसरीकडे रुग्णालयात चतुर्थ श्रेणी आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. सद्यस्थितीत 112 पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आठ वेळा जाहिरात प्रसिद्ध केली. ही पदे भरण्यासाठी शासनाकडे 70 वेळा पत्रव्यवहार करून देखील अद्यापही पदे भरण्यात आलेले नाहीत. यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण पडत असून ही पदे तात्काळ भरण्याची मागणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून होत आहे.

Beed Nagar Palika Corruption : माजलगाव नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती दाखल

Beed MNP Corruption : माजलगाव नगरपालिकेमध्ये गेल्या दोन वर्षापासून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती नगरपालिकेत दाखल झाले असून त्यांनी या काळात झालेल्या कामाची काही महत्त्वाची कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली आहेत. माजलगाव नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली होती.  आता हेच समिती माजलगावच्या नगरपालिकेत पोहोचली असून त्यांनी या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करायला सुरुवात केली आहे.

Washim Mahayadnya : वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथे अति महारुद्र यज्ञाचे आयोजन

Washim News :  वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान अति महारुद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उज्जैन येथील 100 ब्राम्हणासह करवीर पिठाचे शंकराचार्य ही उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील हा पहिलाच अति महारुद्र यज्ञ होणार आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शनात पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे देखील मार्गदर्शन करणार असल्याचे अति महारुद्र यज्ञ समितीचे  महंत गोपाल महाराज  आणि परमेश्वर शेळके यांनी माहिती दिली.

Chandrapur Theft : मॉर्निंग वॉकची वेळ साधून चोर साधताहेत डाव

Chandrapur Morning Theft : चंद्रपूर शहरात सध्या मॉर्निंग वॉकची वेळ साधून चोर डाव साधत असल्याचा एक वेगळा पॅटर्न बघायला मिळत आहे. विविध वसाहतीत नागरिक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घर उघडे असल्याचे पाहून एक चोर घरात प्रवेश करतो. हातात देणगी बुक ठेवत मूकबधिर असल्याचे भासवून एंट्री करताच घरात कुणी नसल्याचे पाहून लॅपटॉप- मोबाईल- रोख वस्तू -पैशाची पाकिटे आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करून साळसूदपणे पसार होतो. कोणाला शंका आलीच तर तो मूकबधिर असल्याचे नाटक करतो. आता पर्यंत गेल्या 20 दिवसात अशाप्रकारच्या ३ ठिकाणी चोरी झाल्या आहेत ज्यामध्ये दोन मध्ये गुन्हा दाखल झालाय. चंद्रपूर शहरातील राधिका सभागृहा जवळील संगीता अपार्टमेंट मध्ये 27 तारखेला सकाळच्या दरम्यान अश्याच प्रकारे झालेली चोरी ची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र या चोराबाबत चंद्रपूर पोलिसांकडे कुठलीही माहिती उपलब्ध नसून हा चोर अन्य राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना या चोराबाबत माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Bhiwandi Chemical Blast : बिडी ओढत काम करणे बेतले जीवावर; ठिणगीमुळे केमिकल ड्रमचा स्फोट; स्फोटात दोन जणांचा मृत्यू
Bhiwandi Chemical Blast : बिडी ओढत भंगार गोदामात काम करणे दोन जणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. मृतांमधील एक जण बिडी ओढत असतानाच बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच जबरदस्त स्फोट होऊन या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरालगत असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील घरत कंपाउंडमधील भंगार गोदामात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 
Union Budget 2023 Highlights:भारतात तयार होणारे मोबाईल स्वस्त होणार; अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख ठळक मुद्दे

Union Budget 2023 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे वाचा सविस्तर

Aurangabad Crime : दोघांच्या भांडणात कुत्री भुंकली म्हणून डोक्यात फावडे घातले अन् घेतला जीव

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) नारळीबाग परिसरात एका संतापजनक प्रकार समोर आला असून, किरकोळ कारणावरून झालेल्या दोन कुटुंबांतील वादात कुत्रीच्या डोक्यात फावडे मारत हत्या केली आहे. भांडण सुरु असताना कुत्री भुंकली त्यामुळे तिचा जीव घेतल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी भांडणासोबतच कुत्रीचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे मृत कुत्रीने चार दिवसांपूर्वी सात गोडस पिलांना जन्म दिला होता. तर संदीप भिसे, सचिन भिसे, आश्विनी भिसे, राणी भिसे (सर्व रा. नारळीबाग) अशी आरोपींची नावे आहेत. 

Aurangabad News: चीनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांची बस पोलिसांनी रोखली; पर्यटकांनी औरंगाबाद शहरात यायचे की नाही?

Aurangabad News: ऐतिहासिक शहर म्हणून असलेल्या औरंगाबाद शहरात रोज देश-विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र सध्या पोलिसांकडून टुरिस्ट बसवर होणाऱ्या कारवायांवरुन पर्यटकांनी औरंगाबाद शहरात यायचे की नाही? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. जालना रोडवर खासगी प्रवासी बसला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रतिबंध आहे. मात्र त्याअडून टुरिस्ट बसला 'नो एंट्री'च्या नावाखाली रोखण्याचा प्रकार होत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनच्या दूतावासातील अधिकारी असलेली बस रोखण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (31 जानेवारी) परदेशी पाहुणे असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याबाबत लोकमतने वृत्त दिले आहे. त्यामुळे अशा कारवाया केल्या जात असतील पर्यटक शहरात कसे येतील आणि त्यांना होणारा त्रास यावरुन जगभरात काय संदेश जाईल असा प्रश्न असा सवाल टुरिस्ट बसचालकांनी उपस्थित केला.

Nashik Mathadi Worket Strike : माथाडी कामगार बंदचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
माथाडी कामगारांच्या बंदचा परीणाम नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय. जिल्ह्यातील 17 बाजार समित्यामधील कोट्यवधी रुपयांची कांद्याची उलाढाल ठप्प झाली आहे. दिवसाकाठी जवळपास दीड ते दोन लाख क्विंटलं कांद्याची उलाढाल नशिकमध्ये होते, उद्या आवक वाढली तर भाव कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. आजच्या बंदची सरकारने दखल घेतली नाही तर बेमुदत आंदोलनचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे.
Nashik Breaking : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, भूमी अभिलेख विभागाच्या एसपीसह कनिष्ठ लिपीक ताब्यात

Nashik Anti-corruption Department Raid : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मंगळवारी रात्री मोठी कारवाई 


- भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकासह (एसपी) कनिष्ठ लिपीक ताब्यात


 - मोठा मासा एसीबीच्या गळाला 


- एक लाख रुपयांची मागणी करत तडजोडीअंती 50 हजार रुपये स्वीकारले


- तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमी अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिस्सा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची झालेली चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी मागितली होती लाच


- जिल्हा अधीक्षक महेश कुमार महादेव शिंदे आणि कनिष्ठ लिपिक अमोल भीमराव महाजन अडकले जाळ्यात

Bhiwandi Chemical Tanker : भिवंडी नदी नाका परिसरात ज्वलनशील केमिकलचा टँकर पलटला

Bhiwandi Chemical Tanker Accident : भिवंडी शहरातील नदी नाका परिसरात एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलावरून खाली उतरताना मुंबईहून वाड्याच्या दिशेने जात असताना ज्वलन सिल केमिकलने भरलेला टँकर दुभाजकाला आदळून पलटी झालाय. यादरम्यान रस्त्या किनारी उभे असलेल्या पाच ते सहा दुचाकी आणि एका रिक्षाला टँकरची धडक लागल्याने नुकसान झाले आहे. शिवाय टँकरमधून ज्वलनशील केमिकल याची गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed Teacher Salary Issue : बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून थकलं

Beed Teacher Salary Issue : मागील काही महिन्यापासून जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं वेतन सतत उशिरा होत असल्याने स्थानिक शिक्षकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जानेवारी महिना संपला तरी बीडमधील शिक्षकांच्या डिसेंबर मधील वेतन अजून मिळालेलं नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांचे कर्जाच्या हप्त थकले आहेत तर, दुसरीकडे या शिक्षकांना लाखो रुपयांचा आयकर भरावा लागणार असल्याने त्यासाठी देखील विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळेत वेतन मिळाल्यास या शिक्षकांना रिटर्न सादर करताना उशीर झाल्यास वेगळा दंड भरावा लागणार असल्याने तात्काळ वेतन देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

Adani Shares : अदानी समूहातील कंपन्यांना फटका, 10 टक्क्यांनी शेअर्स कोसळले

अर्थसंकल्प सादर होण्याआधी देखील अदानी समूहातील कंपन्यांना फटका 


सर्व सातही कंपन्यांच्या समभागात घसरण, अदानी टोटल गॅसला लागलं लोअर सर्किट, 10 टक्क्यांनी समभाग कोसळले 


बाजार उघडताच अदानींच्या तीन कंपन्यांच्या समभागात दिसली होती तेजी मात्र पुन्हा एकदा समभागात घसरण 


अदानी एन्टरप्रायझेज, अदानी विलमार, अदानी पावर, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशनमध्ये देखील 2 ते 4 टक्क्यांची घसरण

Bhiwandi Chemicla Blast : भिवंडीत केमिकल ड्रमचा मोठा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू

Bhiwandi Chemicla Blast : भिवंडीतील घरात कंपाउंड परिसरात केमिकल ड्रमचा मोठा स्फोट


स्फोट झालेल्या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू


स्पोर्ट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काच देखील फुटल्या


उघड्या भंगार गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम सुरू होते


एका कामगाराकडून बिडी पीत असताना झाला स्फोट


रमजान कुरेशी वय 46 आणि ईशराईल शेख वय 35 असे मायतांची नावे आहेत 


अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

Pune Accident : खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यी तर 20 जखमी

पुणे - सोलापूर महामार्गावर चौफुल्याजवळ खाजगी बस आणि ट्रकच्या अपघातात चार ठार आणि वीस जखमी झाले आहेत. अपघातात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांचा समावेश आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणारी खाजगी बस टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.

Beed Sand Smuggling : वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी आयपीएस अधिकाऱ्यांवर
बीडमध्ये होत असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन बीडमधील वाळू तस्करी  रोखण्याची जबाबदारी आयपीएस अधिकाऱ्यांवर सोपवली असून वाळू वाक्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून गेवराई माजलगाव परळी या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून त्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाळू वाक्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आयपीएस अधिकारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवली आहे..

 
Ahmednagar Amartithi : 54वा अमरतिथी सोहळा संपन्न, मेहेरबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी 55 हजार भाविकांची उपस्थिती
Ahmednagar News : अहमदनगरच्या अरणगाव येथे मेहेरबाबाच्या समाधीस्थळी मंगळवारी आयोजित 54व्या अमरतिथी सोहळ्यानिमित्त देशविदेशातील सुमारे 55 हजार भाविकांनी समाधीचं दर्शन घेतलं. मेहेरबाबांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एक करून मानवतेचा प्रचार केला. मेहेरबाबांनी जातीधर्माचा भेद न बाळगता गरीब, मानसिक आणि आजारी रुग्णांसाठी शाळा, दवाखाने आणि रुग्णालयं या सुविधा विनामूल्य सुरु केल्या होत्या. गूढवादी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे 74 देशात अनुयायी असून, हे सारे अनुयायी दरवर्षी 31 जानेवारीला त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नगरच्या अरणगावमध्ये येत असतात. तीन दिवसांच्या या अमरतिथी सोहळ्यात मेहेरप्रेमींनी भजनं, गजल, नृत्यं, कव्वाली, गाणी आणि नाटिका सादर केल्या. 
Thane Kalwa Vitawa Bridge : कळवा-विटावा ते ठाणे- स्टेशन कोळीवाड्यापर्यंत पदाचारी पूल श्रेयवाद

Kalwa Vitawa Bridge : ठाणे रेल्वे स्थानक जवळ आलेल्या कळवा-विटावा पूल ते ठाणे- स्टेशन कोळीवाड्यापर्यंतची पाहणी आज राष्ट्रवादीचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यावर असताना त्यामध्ये श्रेय वादाची लढाई दिसतआहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'मला श्रेय नको मेरा काम बोलता है...'. दरम्यान, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी पत्रकारांची संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

Pandharpur Vitthal Temple : माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप

Pandharpur Vitthal Temple : माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे. माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे.


पाहा सुंदर सजावटीचे फोटो





 




 

 


 

Wardha Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला ग्रंथ दालनाचे उदघाटन
Wardha News: वर्ध्यामध्ये 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बऱ्याच नाविन्यपूर्ण बाबी पाहायला मिळताहेत. पहिल्यांदा साहित्य संमेलनात सहा सभामंडपाची उभारणी झाली आहे. तर याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी 1 फेब्रुवारीच्या संध्याकाळी रसिकांना प्रबोधनासोबतच मनोरंजनाची  पर्वणी मिळणार आहेय. याशिवाय 2 फेब्रुवारी रोजी म्हणजेसंमेलन  उद्घाटनाच्या आदल्या दिवशी पहिल्यांदा ग्रंथ दालनाचे उदघाटन केले जात आहेय. पुस्तक विक्रीला अधिक वेळ मिळावा हाच यामागचा हेतू आहे.
Jalna News: घटस्फोट होताच महिलेने सासऱ्याच्या आणि पतीच्या कानशिलात लगावली; फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

Jalna News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेने काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेने सासऱ्याच्या आणि पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर झालेल्या वादामुळे न्यायालयाच्या आवारात दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे पोलिसांना (Police) अक्षरशः लाठीमार करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी न्यालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

Share Market Opening : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सेन्सेक्‍ससह निफ्टी तेजीत

Share Market Opening Bell : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असताना शेअर बाजारात चांगली सुरुवात आहे. आज बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड पाहायला मिळत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. तसेच, निफ्टीची उसळी पाहायला मिळाली आजच्या सत्रात निफ्टीने 17,811.60 अंकांवर व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 81.78 वर पोहोचला आहे.

Shivai Bus: मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 शिवाई बस; एसटीच्या ताफ्यात दोन महिन्यात दाखल होणार 150 इलेक्ट्रिक बस

Shivneri-Shivai Bus News: मुंबई : मुंबई-पुणे  (Mumbai - Pune) मार्गावर पुढील दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या 100 शिवाई बसेस धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस (Shivneri Bus)  हळूहळू थांबवण्यात येतील. ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus)  या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

Buldhana Accident : लघुशंकेसाठी गेला अन् थेट विहिरीत पडला, रात्रभर विहिरीत कुडकुडला..!

बुलढाणा येथील अनंत गायकवाड हे काही कामानिमित्त रात्री जिल्ह्यातील मोताळा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. मात्र रस्त्यातील राजूर घाटा नजिक एका निर्जनस्थळी मार्गाच्या बाजूला दुचाकी उभी करून ते लघुशंकेसाठी गेले. मात्र अंधार असल्याने त्यांना विहीर न दिसल्याने ते थेट विहिरीत जाऊन पडले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत न मिळाल्याने कशीबशी रात्र त्यांनी विहितील पाण्यात काढली. सकाळी मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही घटना दिसताच पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी रेस्क्यू करत अनंत गायकवाड यांना बाहेर काढून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

Solapur Accident : बसची ट्रकला धडक, 4 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये भीषण अपघात


सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं जाणारी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली


अपघातात 4 जण ठार झाले असून 20 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे 


बसमधून 50 प्रवासी प्रवास करीत होते. 


पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात

Nandurbar Leopeard: धुमाकूळ घालणाऱ्या चार बिबट्यांपैकी एका बिबट्याला पकडण्यात यश













Nandurbar Leopeard: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आहे. सीमावर्ती भागातील दुर्गम असलेल्या गुलीअंबर, चाटूवड, परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या वावर असल्याच्या समोर आलो होतो. एकूण चार बिबटे या परिसरात धुमाकूळ घालत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले होते. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र वन विभागाच्या पथकाने या परिसरात पिंजरे लावून सापळा लावला होता. त्यात एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. या बिबट्यांनी परिसरात शेळ्या गाई अनेक जनावरांवर हल्ला करत त्यांची शिकार केली होती, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण आहे.













Mathadi Kamgar Strike : आज माथाडी कामगारांचं एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारलंय. या काम बंद आंदोलनाला नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत असून नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेत. नवीन सरकार स्थापन होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप माथाडी कामगारांच्या प्रश्नावर एकही बैठक झाली नसून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलाय. येत्या महिनाभरात  सरकार ने सकारात्मक भूमिका न घेतल्यास अधिवेशनात माथाडी विधानभवनात घुसतील असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिलाय.

Dhirendra Maharaj: माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजातील लोक दुखावले गेलेत; धीरेंद्र शास्त्री यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

संत तुकाराम महाराजांबद्दल (Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Maharaj) यांना आता उपरती झालीय. तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.

Puri Shankaracharya : मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदूच; शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांचा दावा

Shankaracharya Swami Nischalananda : शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी दावा केला आहे की, मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते. त्यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये विपक्ष सदस्यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) आणि येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांचे पूर्वज सनातनी हिंदू (Sanatani Hindu) असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा स्वामी निश्चलानंद यांनी केला आहे. त्यांनी भुवनेश्वरमध्ये मंगळवारी 31 जानेवारी रोजी एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं आहे.

Nagpur Crime : नागपूरात गोमांस तस्करांवर पोलिसांची कारवाई 

नागपूरात गोमांस तस्करांवर पोलिसांची कारवाई 


297 किलो गोमांस पोलीसांनी केलं जप्त 


या कारवाईत 5 जनावरांची सुटका ही करण्यात आली 


 तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा चुडी गल्ली रोड परिसरात झाली कारवाई 


गोवंश आणि गोमांस तस्करांवर गुन्हे दाखल 


गोमांस कुठुण आलं, या तस्करीच्या रॅकेटचा पोलीस शोध घेत आहेत

Mumbai CNG Rate : मुंबईतील नागरिकांना दिलासा, सीएनजीच्या दरात घट

मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. सीएनजीच्या दरामध्ये आजपासून 2.50 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेटने घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात वाहनचालकांना एक किलो सीएनजीसाठी 87 रुपये दर असेल, याआधी वाहन चालकांना 89.50 रूपये मोजावे लागत होते. सीएनजीचे दर अडीच रुपयांनी कमी झाल्याने मुंबईकरांना या महागाईच्या दिवसात मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र वाहनचालकांनी याबाबत आणखी सीएनजीचे दर कमी व्हावे अशी मागणी केली आहे. 

Shivai Bus : मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 शिवाई बस; एसटीच्या ताफ्यात दोन महिन्यात दाखल होणार 150 इलेक्ट्रिक बस

Shivneri-Shivai Bus News: मुंबई : मुंबई-पुणे  (Mumbai - Pune) मार्गावर पुढील दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या 100 शिवाई बसेस धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस (Shivneri Bus)  हळूहळू थांबवण्यात येतील. ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus)  या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. 

Mathadi Workers On Strike : माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप, नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद

Mathadi Workers On Strike : माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रतील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे.  या लाक्षणिक संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार देखील सहभागी होणार आहेत. माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी बंदमुळे नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद आहेत. पहाटे सुरु होणाऱ्या भाजीपाला मार्केटमधेही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

दोन कुटुंबातील वादात कुत्रीची निर्दयीपणे हत्या, औरंगाबादमधील धक्कादायक घटना

Aurangabad News : औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दोन कुटुंबातील वादात चक्क एका कुत्रीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. कुत्री भुंकत असल्याने लाकडी दांडा असलेले फावडे कुत्रीच्या डोक्यावर मारुन तिची हत्या करण्यात आली. शहरातील नारळीबाग परिसरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या कुत्रीने चार दिवसांपूर्वीच सात पिलांना जन्म दिला होता. कुत्रीच्या मालक प्रीती सत्यप्रेम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संदीप भिसे, सचिन भिसे, आश्विनी भिसे, राणी भिसे यांच्यावर सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhiwandi Fire : भिवंडी शहरात ऑइल गोडाऊनला भीषण आग

Bhiwandi Fire : भिवंडी शहरात आगीचे सत्र काही थांबताना दिसत नसून पुन्हा एकदा अग्नीतांडव पाहायला मिळालं. शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग इतकी भीषण होती की परिसरात आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते. तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी  दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवानाने सुरू केले आहे. मात्र या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खोका कंपाऊंड परिसरात अनेक भंगार गोडाऊन आणि कापडाचे कारखाने आहेत. त्यामुळे परिसरात इतर गोदामांना देखील आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.

Union Budget 2023 : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. 


 

Mumbai Water Issue : दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत नाहीच

भांडुपमधील जलशुद्धीकरण प्रकल्पमधील विविध दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा अजूनही सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घाटकोपरमध्ये नागरिकांनी पाणी नसल्याने थेट उपजलाभियंता यांच्या कार्यालयातून पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. मुंबई मनपाने आज सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती दिली होती. त्यानंतर आज आणखी आठ तास लागतील असे सांगितले. मात्र अकरा तास उलटून गेल्यानंतरही अजून पाणी आलेले नाही. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. घाटकोपरमध्ये दोन-तीन किलोमीटर पायपीट करून, रिक्षाने, दुचाकीवर नागरिक पाण्याच्या शोधत फिरत आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार


आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.


राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद


राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन आहे. या आंदोलनात 10 हजार डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.  त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता असून, रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे. शासकीय रुग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवदेन दिले आहे. सोबतच यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. मात्र तरीही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. 


महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप


महाराष्ट्र शासनाकडे माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. या लाक्षणिक संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार देखील सहभागी होणार आहेत. 


राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी


राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाने मुंबई पोलिसांना निर्देश दिले होते. मूळ तक्रारदार शर्लिन चोप्रा या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. शर्लिनच्या तक्रारीवरूनच आंबोली पोलीस ठाण्यात राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





व्हॉटसअपच्या याचिकेवर सुनावणी


व्हॉटसअपच्या प्रायव्हेट पॉलिसी विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. युजर्सची माहिती फेसबुकसह अन्य माध्यमांध्ये शेअर करण्याविरोधात ही याचिका आहे. 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.