Maharashtra News Updates 04 February 2023 : वडील आमदार आहेत असं सांगून पक्षाने सातत्याने डावललं, सत्यजीत तांबे यांची खंत 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Feb 2023 08:51 PM
Mumbai Fire: मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटलला लागलेली आग आटोक्यात

मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटलला आग लागली होती, ती आता आटोक्यात आल्याची माहिती आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत ही आग लागली. त्यामध्ये कोणतंही नुकसान झालं नाही. 

Hingoli: पुजाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद, एक पिस्तूल, तीन जिवंत काडतूसांसह 3 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त 

हिंगोली शहरालगत असलेल्या खटकाळी मंदिराच्या पुजाऱ्यावर 25 जानेवारी रोजी दरोडा टाकत पिस्तूलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून या प्रकरणातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. या आरोपींकडून एक पिस्टल, तीन जिवंत काडतूस आणि सोन्याच्या दागिण्यासह तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Satyajeet Tambe: वडील आमदार आहेत असं सांगून पक्षाने सातत्याने डावललं, सत्यजीत तांबे यांची खंत 

मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कामं केली, त्यावेळी माझ्यावर 50 केसेस लावण्यात आल्या, तरीही मी काँग्रेससाठी काम केलं, पण वडील आमदार आहेत हे कारण सांगत मला नेहमी डावलण्यात आल्याची खंत नवनियुक्त आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. 

बीडमध्ये गुटखा माफियावर कारवाई, 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Beed News : बीडमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गुटखा माफियावर कारवाई केली. या कारवाईत 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे. सोलापूरहून बीडकडे एका टेम्पोमधून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पंकज कुमावत यांनी बीड चौसाळा रोडवर या टेम्पोवर कारवाई केली. यामध्ये यामध्ये 160 पोते गुटखा आढळून आला असता हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन जणांना अटक केली आहे.

अजित पवारांनी घेतला विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज  बारामती दौऱ्यावर आहेत.  त्यांनी आज कन्हेरी येथील वनविभागाच्या जागेत होत असलेल्या पर्यटन स्थळाची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. शहरातील विद्या प्रतिष्ठान,  कृषी उत्पन्न बाजार समिती येथे होत असलेल्या इमारतींची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेतला

अजित पवारांनी घेतला विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज  बारामती दौऱ्यावर आहेत.  त्यांनी आज कन्हेरी येथील वनविभागाच्या जागेत होत असलेल्या पर्यटन स्थळाची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. शहरातील विद्या प्रतिष्ठान,  कृषी उत्पन्न बाजार समिती येथे होत असलेल्या इमारतींची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेतला

अश्विनी जगताप यांच्या फ्लेक्सवर वरिष्ठ नेत्यांसह दीर शंकर जगतापांना ही स्थान

चिंचवड विधानसभेसाठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच त्याच्या सोशल मीडियाच्या फ्लेक्सवर वरिष्ठ नेत्यांसह दीर शंकर जगतापांना ही स्थान दिलेलं आहे. वाद मिटविण्याच्या दिशेने अश्विनी जगतापांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी अश्विनी जगताप यांची भेट

भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी जाहीर होताच, मंत्री गिरीश महाजन हे अश्विनी जगताप यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत

आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या

Nadurbar News : आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये समोर आला आहे. नंदुरबार शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरालगत काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. बहिणीला पळवून नेत विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावाने तिच्या पतीची हत्या केली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व पोलीस दलाने शांततेचे आवाहन केल्याचं पाहावयास मिळाले. दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज अतिरिक्त कुमकीसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Pune Bypoll Election : कसबा काँग्रेसला तर चिंचवड राष्ट्रवादीला? सुत्रांची माहिती 

Pune Bypoll Election :  कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना उमेदवारी देण्याची आल्याती माहिती सुत्रांनी दिली आहे. 

BMC Budget 2023 : मुंबई पालिकेचं यंदाचं बजेट 52 हजार 619 कोटी रुपयांचं

BMC Budget 2023 : मुंबई पालिकेचं यंदाचं बजेट 52 हजार 619 कोटी रुपयांचं...


थोड्याच वेळात बजेट सादर होणार...


बजेटमध्ये 6 हजार 670 कोटींची वाढ





Sanjay Raut : कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रीत लढणार : संजय राऊत 

Sanjay Raut : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रीत लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रेला भाविकांची गर्दी

कोकणातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रेला सुरुवात झाली असून भाविकांची गर्दी उसळली आहे. आकर्षक फुलांनी मंदिर परिसर सजवण्यात आला आहे. आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रेला लाखो भाविक श्रद्धने येतात. नवसाला पावणारी देवी भराडी देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अर्ध्या पेक्षा जास्त मंत्रिमडळ भराडी देवीच दर्शन घेण्यासाठी येणार आहे. 

Railway Budget For Mumbai : रेल्वे अर्थसंकल्पात मोदी सरकारचे 'मिशन मुंबई'

Railway Budget For Mumbai :  नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2023) रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली. मुंबईकर प्रवाशांसाठी (Mumbai Local Train Commuter) केंद्र सरकारने भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक प्रकल्पांना वेग येणार आहे. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन मुंबई रेल विकास प्राधिकरण (Mumbai Railway Vikas Corporation) करत असलेल्या सर्वच प्रकल्पांना प्रचंड निधी मिळाल्याने सर्वच प्रकल्प अधिक वेगाने होण्यास होणार मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. वर्ष 2013 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीने वाढ करण्यात आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भुसावळ विभागासाठी 1470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


Thane News: कोपरी पुलाच्या उद्घाटनासाठी कोणता मुहूर्त?

Thane News: मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या दुसर्‍या टप्प्यातील काम आठवडाभरापूर्वी पूर्ण झाले आहे. प्रशासनाने कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशेकडील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली होती. मात्र अचानक पुलाचे काम अपूर्ण असल्याचे सांगत एमएमआरडीए प्रशासनाकडून ही मार्गिका पुन्हा एकदा बंद करण्यात आली. अचानक हा निर्णय घेतल्याने येथील कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे कोपरी पूल तयार असूनही उद्घाटनाच्या श्रेयवादासाठी ही मार्गिका बंद केली का, असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जात आहे. दररोज तासाभराच्या टॅ्रफिकमध्ये जीव घालवायचा का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. 2018 पासून कोपरीचा जुना पुल पडून त्याजागी नवीन 8 पदरी पुल उभारण्याचे काम सुरू आहे. या वर्षांमध्ये दररोज वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकर आणि मुंबईकरांनी सहन केला आहे. पण पुल बांधून पूर्ण झाला असूनही तो वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्याने एम एम आर डी ए कोणत्या मुहूर्ताची वाट बघतेय असा प्रश्न विचारला जात आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे.  या यात्रेनिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ आंगणेवाडीत असणार आहे. तसेच सत्यजीत तांबे आज आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकूया.


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प


आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिकेवर प्रशासक असल्यानं आयुक्तच प्रशासक म्हणून यंदाचा अर्थसंकल्प  मांडणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शिक्षण खात्याचं बजेट आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. तर सकाळली 11.30 वाजता पालिका मुख्यालयात आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद होईल.


अर्थसंकल्पातील अंदाजित तरतुदी काय असतील? 


- आरोग्य, पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे संकेत; आस्थापना खर्चाला कात्री लागणार
- कोरोनाने तब्बल अडीच वर्षांच्या काळात आरोग्याबाबत चांगलाच 'धडा' शिकवल्याने पालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पातही आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 
- गेल्या वर्षीच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पात 1800 कोटींची वाढ केल्याने एकूण अर्थसंकल्प 6624.41 कोटींवर गेला होता. या वर्षीही यात वाढ होण्याची शक्यता आहे. 
- मुंबईकरांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी देखील भरीव तरतूद, मात्र आस्थापना खर्चावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे गतवर्षीच्या 45949.21 कोटींच्या अर्थसंकल्पात या वर्षीही वाढ होण्याची शक्यता आहे. 
- मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बजेटमधे स्पेशल तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश.
- यंदाच्या पालिका बजेटमध्ये मुंबईतल्या रस्तांवर विशेष भर दिला जाऊ शकतो.
 
एप्रिल 1984 मध्ये द.म. सुखटणकर यांची पहिल्यांदा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यानंतर 12 नोव्हेंबर 1984 ते 9 मे 1985 या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. मात्र पुन्हा एकदा 8 मार्च 2022 पासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासक म्हणून चहल कामकाज पाहत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत तब्बल 36 वर्षांनी प्रशासकाच्या हाती कारभार असताना बजेट मांडले जाणार आहे.


कसबा आणि चिंचवडच्या जागेवर मविआचा उमेदवार ठरणार


कसबा आणि चिंचवडची जागा कुणाला याबाबत महाविकास आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. तो निर्णय महाविकास आघाडी संयुक्तपणे जाहीर करणार आहे. कसबा आणि चिंचवडची जागा लढवण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, परंतु शुक्रवारी या बैठकीत अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती नेत्यांनी दिलीय. पण आपण हा निर्णय मित्रपक्षांना विचारात घेऊन जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कोण कोणती जागा घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. 


सत्यजीत तांबे आज आपली भूमिका जाहीर करणार


नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर आज आमदार सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन दुपारी आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत.  जे बोललं जातंय ते अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य मी सांगणार आहे अस वक्तव्य यापूर्वी सत्यजित तांबे यांनी केलं होत. त्यामुळं सत्यिजत तांबे नेमकी काय भूमिका घेणार? सत्यजित तांबे काय बोलणार? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आज सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तर संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, किशोर कदम "सौमित्र" यांचा मुक्त संवाद असा कार्यक्रम आहे.


कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा


कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे.  या यात्रेनिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ आंगणेवाडीत असणार आहे. शनिवार आणि रविवारी यात्रा असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तर यात्रेनंतर संध्याकाळी 4 वाजता भाजपची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थिती सभा होणार आहे. सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा आज 73 वा स्थापना दिवस


सुप्रिम कोर्टाचा आज 73 वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. सिंगापूरचे चीफ जस्टिस सुंदरेश मेनन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.