(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Updates 09 February 2023 : मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा, सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आज युवासेना नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात ते सभा घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात अनेक कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या कोपरी पुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम :
- आज दुपारी 1.30 वाजता एमएमआरडीएनं बांधलेल्या कोपरी ब्रिजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
- टेंभी नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या साहित्याचं वाटप केल जाणार आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या लिगल सेलचे उद्घाटन.
- त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री वर्षावर जातील, तिथेही वाढदिवस साजरा केला जाणार.
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा चौथा आणि शेवटचा दिवस आहे. आज आदित्य ठाकरेंची तोफ मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात धडाडणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.
बुलेट ट्रेनला मिळणार का हिरवा कंदील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत आज हायकोर्ट फैसला सुनावणार आहे. गोदरेजनं विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाला आव्हान देत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट आज आपला अंतिम निकाल देणार आहे. गोदरजेच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. केवळ गोदरेजच्या आडमुठे भूमिकेमुळंच हा बहुउद्देशीय लोकोपयोगी प्रकल्प रखडल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
यवतमाळमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला प्रति क्विंटल 10,000 हमीभाव जाहीर करून त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये हमीभाव जाहीर करावा, हरभरा आणि तुरीची नाफेडमार्फत ऑनलाईन नोंदणी करून खरेदी त्वरित सुरु करावी अशा मागण्यासाठी आज दुपारी 12 वाजता जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी यांची रथयात्रा
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे ही मागणी घेऊन आजपासून चौंडी येथून एक रथयात्रा सुरू होणार आहे. रथयात्रेची सुरूवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सुरू होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता यात्रेला सुरूवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने या यात्रेचे नियोजन करण्यात आलंय. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर असा प्रवास करीत सोमवारी 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चेने समारोप होणार आहे. या रथयात्रेमुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय वेटलिफ्टर संकेत सरगरला सांगली जिल्हा परिषदेकडून 5 लाखांची मदत
नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत गिरवताहेत, सेंद्रिय शेतीचे धडे
सेंद्रिय शेतीतील उत्पादने विषमुक्त असल्याने अशा पद्धतीच्या शेतीचे प्रयोग ठिकठिकाणी होत आहेत. नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, आता सेंद्रीय शेतीचे धडे गिरवत आहेत.ज्यात शाळेच्या आवारात या विद्यार्थ्यांनी सांडपाण्यापासून परसबाग फुलवलीय. शाळेतील या परसबागेतून उगवलेल्या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात उपयोग होतोय. दरम्यान, ही परसबाग सांडपाण्याचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन फुलवली आहे.
मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा, सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी
भाजप नेते मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे. कंबोज यांच्या सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंजूर आराखड्यानुसार, बांधकाम नसल्यानं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे. खास बाब म्हणून निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण म्हणून मानलं जाऊ नये, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
भंडाऱ्याच्या मोहाडीत विद्यार्थ्यांचं एसटी बस स्थानकात आंदोलन, प्रवासी वाहतूक थांबवणाऱ्या आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Bhandara News : शिक्षणासाठी वेळेवर एसटी बस येत नसल्याने भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बस संदर्भातील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी विभागीय नियंत्रकांना निवेदनाद्वारे बसवर 'अंडा फेको' आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई महामंडळाडून करण्यात आली नाही, त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बस स्थानकावर आंदोलन करुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस अडवून धरल्याचा प्रकार भंडाराच्या मोहाडी इथ घडला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड वैभव चोपकर यांना ताब्यात घेतल्यानंरत एसटी बसेस पुढील प्रवासासाठी निघाल्या.