Maharashtra News Updates 07 February 2023 : राष्ट्रीय महामार्गावर रुबाबदार वाघोबाचे दर्शन; भंडाऱ्यातील मोहघटा जंगल परिसरातील प्रकार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Feb 2023 11:23 PM
मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व हरपलं - विरोधी पक्षनेते अजित पवार

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारा  नेता हरपला आहे,  अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत गोंधळ

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरु झाल्यानं गोंधळ झाल्याचा सांगण्यात येत आहे.

भिवंडी कल्याण रस्त्यावरील राजनोली गावात फर्निचर गोदामाला भीषण आग, दोन गोदाम जळून खाक 

भिवंडी कल्याण रस्त्यावरील राजनोली गावात एता फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत फर्निचरची दोन गोदामं जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे भिवंडी कल्याण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.  

Gondiya News :  आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केलेले धान उघड्यावर; कोट्यवधीच्या धानाला जागेवरच फुटले अंकुर

Gondiya News :  आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत दल्ली गावातील आदिवासी विकास विविध कार्यकारी संस्थेला धान्य खरेदी केंद्र देण्यात आले असून खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल आदिवासी विकास मंडळाने केली नाही तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पाऊसाने खरेदी करण्यात आलेला धान्य पाऊसाने भिजला असल्याने खरेदी करण्यात आलेल्या १८ हजार क्विंटल धान्या पैकी जवळपास १० हजार क्विंटल धान्याला अंकुर फुटल्याने धानाची नासाडी झाली आहे.

Bhandara News : राष्ट्रीय महामार्गावर रुबाबदार वाघोबाचे दर्शन; भंडाऱ्यातील मोहघटा जंगल परिसरातील प्रकार

भंडारा ते रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरात एका रुबाबदार आणि एटीत रस्ता ओलांडणाऱ्या वाघोबाचे दिवसाढवळ्या दर्शन झाले. साकोलीकडून लाखनीकडे जाणाऱ्या एका वाहनधारकाने रुबाबात रस्ता ओलांडणाऱ्या या वाघोबाला आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका दोन वर्षीय बछड्याचे दर्शन झाले होते. या परिसरात वन्यजीवांचा मोठा अधिवास असून

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रिम कोर्टात आजही सुनावणी झाली नाही. नुकतंच कोर्टाचं कामकाज संपलं, पण प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही. त्यामुळे या प्रकरणावर आज सुनावणी होऊ शकली नाही.  

Rapido News : बाईक टॅक्सी कंपनी रॅपिडोला कोणताही दिलासा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Rapido News : बाईक टॅक्सी कंपनी रॅपिडोला कोणताही दिलासा नाही. सध्याच्या नियमांनुसार रॅपिडोला महाराष्ट्रात काम करण्याचा परवाना मिळू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे परत पाठवले. तसेच, राज्य सरकारने नवीन नियम बनवताना त्यांच्या आधारे रॅपिडोने परवाना घ्यावा, असेही ते म्हणाले.

Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा विंचूर गवळीत शिवसंवाद, शिवसैनिकांची गर्दी 

Nashik Aditya Thackeray :  आदित्य ठाकरे यांचा सातवा शिवसंवाद यात्रेचा टप्पा सुरु असून सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिकचा दुसरा दिवस असून आज त्यांनी चांदोरी येथे जनतेसोबत संवाद साधला. त्यानंतर ते विंचूर गवळी येथे संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. 
 

अंबरनाथमध्ये उभं राहतंय भव्य नाट्यगृह

अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवरील आरक्षित भूखंडावर पालिकेकडून नाट्यगृह उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या ठिकाणी तब्बल 23 हजार चौरस फुटांचं बांधकाम या नाट्यगृहासाठी केलं जातंय. 23 कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून उभारल्या जात असलेल्या या नाट्यगृहात एकावेळी 516 प्रेक्षक बसून नाटक बघू शकणार आहेत. सोबतच नाट्यगृहाच्या आतमध्ये कॉन्फरन्स हॉल, एक्झिबिशन सेंटर, कॅफेटेरिया, व्हीआयपी कक्ष, किचन, कार्यालय, बुकिंग सेंटर आणि स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत. नाट्यगृहाच्या तळमजल्यावर पार्किंगसाठी सुद्धा मुबलक व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी 200 ते 250 दुचाकी आणि 80 पेक्षा जास्त चारचाकी गाड्या एका वेळी उभ्या राहू शकतील. हे नाट्यगृह निवडणुकीपूर्वी पूर्ण करून त्याचं लोकार्पण करण्याचा पालिकेचा मानस आहे. मे 2023 अखेरपर्यंत या नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेलं हे नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण होईल आणि लोकांना अंबरनाथ शहरात चांगल्या नाटकांचा आनंद घेता येईल, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.

सुनील शेळके बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राहुल कलाटे यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राहुल कलाटे यांची समजूत काढायला पोहचले. जनता माझ्या पाठीशी, माझ्याबाजूने जनतेची सहानुभूती आहे. माझ्यासारख्या उमेदवाराला संधी मिळावी म्हणून जनता मला संधी देईल. असा विश्वास बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Political News: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार?

Maharashtra Political News: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी 2009 पासून केल्याला कामाचा तपशील मागवला आहे. खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आलीये. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार असलेले उदय बने यांना देखील एसीबीने नोटीस पाठवल्याचा दावा आमदार राजन साळवी यांनी केलाय.

Maharashtra Hingoli Accident News: ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Maharashtra Hingoli Accident News: वसमत औंढा नागनाथ महामार्गावर आंबा चोंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील राहोली येथील रहिवासी राघोजी डोरले यांना उपचारासाठी नांदेड कडे नेत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कलावती डोरले यांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि  राघोजी डोरले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर  रुग्णवाहिकेच्या चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 
Beed News: बीड जिल्ह्यात एकाच वेळी 17 ठाणेप्रमुखासह 51 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Beed News: बीड जिल्हा पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून यामध्ये तब्बल 17 ठाणे प्रमुखासह 51 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या होत्या आणि आचारसंहिता समताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 24 सहाय्यक निरीक्षक 12 पोलीस निरीक्षक आणि 15 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 


 
Maharashtra News: अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाला अधिक गती मिळावी, बीडच्या व्यापाऱ्यांकडून शासनाला एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार

Maharashtra News: अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाला अधिक गती मिळावी यासाठी बीडच्या व्यापाऱ्यांकडून शासनाला एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार आहेत. सध्या अहमदनगर ते परळी या रेल्वेचे काम पूर्ण झाला असून अद्यापही बीड आणि परळी रेल्वे मार्गाचे काम झालेलं नाही त्यामुळे शासनाकडून या कामासाठी अधिकचा निधी मिळावा आणि हे काम तातडीने पूर्ण करण्यात याव यासाठी बीडमधील व्यापाऱ्यांनी शासनाला एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Solapur News: वंदे भारत गाडीच्या वेळेत बदल करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींची मागणी

Solapur News: सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या, मुंबई ते सोलापूर दरम्यान लवकरच धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेच्या मुंबई येथुन सुटण्याच्या वेळेत बदल करावा असे निवेदन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. 


सोलापूरातील समस्त जनतेच्यावतीने मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केल्याबद्दल खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे  आभार मानले. वंदे भारत ट्रेनमुळे या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई येथुन सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी 4 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापुरहून आलेल्या व्यापारी आणि इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल. असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजींनी रेल्वेमंत्र्यांना सांगीतले. मुंबई येथून रेल्वे गाडी सुटण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. याप्रसंगी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित होते. 



Palghar News: पालघरचे जिल्हाधीकारी गोविंद बोडके यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, आमदार सुनील भुसारा यांची मागणी

Palghar News: पालघर जिल्ह्याचे जिल्हाधीकारी गोविंद बोडके यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार सुनील भूसारा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांनी काल मंत्रालयात आदिवासी विकास विभागाच्या  आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित बैठकीत  आमदार सुनील भुसारा यांचा पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी अपमान केल्याचा आरोप आमदार यांनी केला असून माझी मानहानी केली असल्याचं पत्र त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त मुंबई यांनी लिहिले आहे.त्यात त्यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यावर अनेक आरोप करत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Maharashtra Mumbai Worli News: ठाकरेंच्या वरळीत आज शिंदेंची सभा, शिंदे काय बोलणार? याकडे लक्ष

Maharashtra Mumbai Worli News: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार आहे. कोळी बांधवांकडून होणार शिंदे आणि फडणवीसांचा सत्कार. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Maharashtra Congress: काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक

Maharashtra Congress: काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेणार आहेत. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत बेबनावावर चर्चा होण्याची शक्यता. एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत 13 फेब्रुवारीला काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. 

Maharashtra Political News: कोकणातील ठाकरे गटाचे नेते एसीबीच्या रडारवर? उदय बने यांना एसीबीने नोटीस पाठवल्याचा राजन साळवींचा दावा

Maharashtra Political News: ठाकरे गटाचे नेते आणि आगामी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार असलेले उदय बने यांना देखील एसीबीने नोटीस पाठवल्याचा दावा आमदार राजन साळवी यांनी केला आहे. दरम्यान माझ्यावर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलीये.. 

Jalgoun News: जळगावात केळीच्या दरांमध्ये विक्रमी वाढ

Jalgoun News: केळी आणि सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात सोन्याच्या दरासह केळीचे दरही विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचलेत. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर आलेल्या सी एम वी रोगामुळे आणि वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालं आणि त्याचा मोठा परिणाम केळी उत्पादनावर झालाय... जळगाव बाजार पेठेत सत्तर रुपये डझन देऊन सुध्दा दर्जेदार केळी मिळत नसल्याचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळतंय.

Parbhani News: शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी गावकऱ्यांचे रात्रभर पाण्यात आंदोलन

Parbhani News: परभणीच्या मानवत तालुक्यातील इरळद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या बदल्या गरज नसताना करण्यात आल्या या बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून गावकरी विविध आंदोलन करताहेत काल सकाळी गावातील विद्यार्थी गावकरी,पालक यांनी दुधना नदी पात्रात उतरून अर्ध जलसमाधी आंदोलन केले होते काल रात्रभर गावकरी या पाण्यात बसून होते आणि ज्या शिक्षकांनी गावातील शाळा आदर्श केली विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली त्या शिक्षकांच्या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी या गावकऱ्यांनी लावून धरली आहे.

Dhule News: धुळे जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 474 जणांची ऑनलाईन फसवणूक
Dhule News: समाज माध्यमांवर लिंक पाठवून अमिष दाखवत आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून याबाबत आतापर्यंत सायबर सेलकडे तब्बल 474 तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत यापैकी सात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

समाज माध्यमात लिंक पाठवून आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या फसवणुकीला अनेक जण बळी पडले आहेत, धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल 474 जणांची ऑनलाईन फसवणूक झाली असून याबाबत सायबर विभागाकडे अर्ज दाखल झाले आहेत तर आत्तापर्यंत सात गुन्हे नोंदविण्यात आले असून यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत दाखल गुन्ह्यातील तब्बल 17 लाख वीस हजारांची रक्कम मिळविण्यास यश आले आहे.
Latur Crime News: शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना सहायक अभियंता जाळ्यात

Latur Crime News: शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना  सहायक अभियंता जाळ्यात. विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे वीस दिवसापासून होता बंद होता, नागझरी येथील पाणीपुरवठा शेतकऱ्यांचा विद्युतपंप सुरू ठेवण्यासाठी 25 हजारांची मागणी करून तडजाेडीअंती 10 हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या हरंगुळ येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गावातील पाणी पुरवठा विजे अभावी खंडित होता. 15 पेक्षा जास्त शेतकऱ्याचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी त्यांनी हि लाच मागितली होती.या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अभियंता माधवराव बिराजदार यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

Maharashtra News: किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्षी उतरले भिवंडी कल्याण सीमेवरील खाडीवर...
Maharashtra News: भिवंडी, कल्याण सीमेवरील खाडीवर सध्या परदेशी सीगल पक्षी या पाहुण्यांचे आगमन झालंय.अमेरिका,युरोप येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी या ठिकाणी आले आहेत .अथांग पसरलेल्या खाडी पात्रात मनसोक्त विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र सीगल पक्षांचा थवा हे विलोभनीय दृश्य सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे हे पक्षी पाहण्यासाठी,त्यांना खायला घालण्यासाठी असंख्य येथील खाडी पुला वर गर्दी करीत आहेत. या पक्षांच मुख्य खाद्य छोटे मासे पण येथील खाडी पुला वर स्थानिकां कडून या सिगल पक्षांना शेव, चिवडा, ब्रेड, पाव तर लहान बालकांकडून चक्क कुरकुरे खायला घातले जातात.
Beed News: अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सख्या आणि मावस दिरांचा भावजईवर बलात्कार

Beed News : सख्या भावजयीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सख्ख्या दिराने 24 वर्षीय भावजयीवर बलात्कार केल्याची घटना गेवराईत उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर सख्ख्या दिराने त्याच्या मावस भावाला घरी बोलावले, त्याने मला मोटार सायकल घेवून दिली आहे. नेहमी पैसेही देतो, असे म्हणून त्याच्यासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडले. सख्ख्या आणि मावस दिराने भावजयीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गेवराई पोलीसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुणेव्यतिथी निमित्त स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशोक हांडे यांच्या चौरंग संस्थेमार्फेत विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांची पेरणी करण्यात आली. त्याच बरोबर लतादीदी यांच्या आयुष्यातील प्रमुख आठवणींना उजाळा देण्यात आला.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज सुप्रीम कोर्टात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात प्रकरण चौथ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे. शिवाय चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 


महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी
 
आज सुप्रीम कोर्टात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात प्रकरण चौथ्या क्रमांकावर आहे.


आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम
 
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मच्छीमारांच्या वतीने भव्य सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.


चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस


चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनाही अडून बसली होती. सेनेच्या नाराजीमुळंच अद्याप हे नाव जाहीर केलं नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चिंचवडची जागा घड्याळाच्या चिन्हावर लढली जाणार असून अर्ज भरण्यासाठी मी स्वत: उपस्थित रहाणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे.  राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. पण उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळं सस्पेंन्स आजूनही कायम आहे.


अमरावतीत विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन 
 
अमरावतीत आज विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांचे दुपारी 12 वाजता अमरावती येथे आगमन होणार असून ते विविध ठिकाणी भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस


आज माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने संगमनेरमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे निफाड ते औरंगाबाद असा प्रवास करणार  आहेत. या प्रवासात ते शिवसैनिक आणि नागरिकांशी साधणार संवाद साधणार आहेत. 
 
कृषी पदवीधरांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस


राज्यातील कृषी विद्यापीठातील कृषी पदवीधरांच्या आंदोलनाचा आजचा 14 दिवस आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे कृषी अभियंत्याच हे आंदोलन सुरू आहे. आमच्या ताटातील घास काढून घेतला गेला आहे अशी एक भावना पदविधारकांनी व्यक्त केलीय. 


 चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद      


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात  ही पत्रकार परिषद होणार  आहे. 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज विवाहबंधनात अडकणार 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थान येथील जैसलमेरच्या सूर्यगढं पॅलेसमध्ये दोघांच लग्न होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.