Latur News: तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या (Hyderabad) गोशामहाल मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंग (T. Raja Singh) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी लातूर पोलिसांकडून (Latur Police) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (28 फेब्रुवारी) पहाटे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीवेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. विशेष म्हणजे, सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालयाचा अभिप्राय आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
टी. राजासिंग यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "19 फेब्रुवारी रोजी लातुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. तर याच समारोप कार्यक्रमात तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील गोशामहाल मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंग यांनी भाषण केले होते. मात्र त्यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले होते आमदार टी. राजासिंग
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमदार टी. राजासिंग यांनी भाषण केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, "हिंदू आणि मुस्लीम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे भाऊ भाऊ-होऊ शकतात का? महाराणा प्रताप आणि अकबर भाऊ-भाऊ होऊ शकतात का? गायीची पूजा करणारा आणि गायीची हत्या करणारे भाऊ-भाऊ होऊ शकतात का? वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का?" त्यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
सामाजिक संघटना, राजकीय पक्षांकडून आक्रमक भूमिका
दरम्यान आमदार टी. राजासिंग यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप करत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर आमदार टी. राजासिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणाची पडताळणी करण्यात आली. तसेच याबाबत सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता संचालनालयाचा अभिप्राय सोमवारी प्राप्त झाला. जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल, असे वक्तव्य केल्याचे अभिप्रायात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आमदार टी. राजासिंग लोध यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर गु.र.नं. 90 / 2023 कलम 153 (अ), 153 (ब), 295(अ), 505 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे करत आहेत.
संबंधित बातमी:
हिंदू मुस्लिम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत; भाजप आमदार टी राजा सिंह यांचं वक्तव्य