लातूर : "हिंदू आणि मुस्लिम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे भाऊ भाऊ-होऊ शकतात का? महाराणा प्रताप आणि अकबर भाऊ-भाऊ होऊ शकतात का? गाईची पूजा करणारा आणि गाईची हत्या करणारे भाऊ-भाऊ होऊ शकतात का? वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का? असं वक्तव्य भाजप आमदार टी राजा सिहं यांनी केलं आहे. त्याचं भाषण व्हायरल होत आहे. दरम्यान, टी. राजा सिंह यांना चिथावणीखोर भाषण न करण्यासंदर्भात प्रशासनाकडून बजावण्यात आलं होत. तरीदेखील त्यांनी प्रशासनाच्या सूचना न जुमानता प्रक्षोभक भाषण केलं. टी राजा सिह यांनी आज लातूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शिवजन्ममहोत्सव समितीने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीला टी राज सिंह यांनी संबोधित केले. यावेळी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरही उपस्थित होते.
"ज्या भूमीत छत्रपती संभाजी महाराज यांचे रक्त सांडले आहे ते आज औरंगाबाद आहे. औरंगाबाजचे नाव बदलून आता संभाजीनगर करण्यात आले. आता ज्या ज्या ठिकाणी औरंगाबादचा उल्लेख आहे तो मिटवा. महाराष्ट्रात तेच राज्य करू शकतात, जे हिंदू विचार पुढे नेतात. ज्यांनी धर्म सोडला त्यांची अवस्था काय झाली ते पीहा. बाळासाहेबांच्या विचारावर चालणारं हे राज्य आहे. त्यांच्या विचारानुसार काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. बाळासाहेबांना मंदिरात घंटा वाजणारा नव्हे तर लव्ह जिहाद करणाऱ्या आणि धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीस ठोकणारा हिंदू पाहिजे होता. याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करणारा तरुण नकोय तर रस्त्यावर उतरणार तरुण त्यांना हवा आहे, असे टी राजा सिंह यांनी म्हटले.
टी राजा सिंह हे लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्या समोर रॅलीतील लोकांना अभिवादन करणार होते. मात्र शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणीच टी राजा सिंह यांनी भाषणाला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना भाषण करू नका असे सांगितले होते. मात्र मी ते केले असे जाहीर भाषणात टी राजा सिंह यांनी म्हटले.
भाजपातून हकालपट्टी
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामळे आमदार टी राजा सिंह यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना भाजपातून निलंबितही करण्यात आले आहे.