Beed News: बीड जिल्ह्यात (Beed District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, शासकीय अधिकाऱ्याने थेट गावकऱ्यांना जेसीबीच्या (JCB) खाली घेण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथे रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान काम चांगलं करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र यावेळी शाखाअभियंता असलेल्या मुजाहिद सय्यद यांनी गावकऱ्यांनाच दम दिला. तसेच कामाच्या ठिकाणी आडवा येणाऱ्याला जेसीबी खाली घेऊ अशी धमकी दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर यावरुन गावकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथील धनगर वस्तीवर रस्त्याचे काम सुरु आहे. दरम्यान पुन्हा-पुन्हा रस्त्याचे काम होत नाही, त्यामुळे काम चांगले व्हावे यासाठी गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम चांगले करण्याची मागणी केली. मात्र गावकऱ्यांच्या मागणीनंतर शाखाअभियंता असलेल्या मुजाहिद सय्यद यांचा पारा चढला. त्यांनी आपला राग थेट गावकऱ्यांवर काढायला सुरुवात केली. चांगलं करावं अशी मागणी करणाऱ्या गावकऱ्यांना त्यांनी थेट धमकीच देऊन टाकली. कामाच्या ठिकाणी आडवं येणाऱ्याला जेसीबी खाली घेऊन टाका असे आदेशच त्यांनी आपल्या कामगारांना दिले. त्यांच्या या वर्तनाने गावकऱ्यांना देखील धक्का बसला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. 


गावकऱ्यांची पोलिसात तक्रार! 


रस्त्याचे काम चांगले करावे अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना जेसीबीच्या खाली घेण्याची भाषा करणाऱ्या मुजोर अभियंत्याविरोधात गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर ग्रामस्थांना जेसीबीच्या खोऱ्याखाली घे खड्डा खोदून त्यांना पुरुन टाका अशी धमकी देणारा व्हिडीओ देखील समोर आल्याने आता गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी धारुर पोलीस ठाण्यात या मुजोर अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर या तक्रारीत अभियंताकडे पिस्तूल असून तो पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे म्हटले आहे. 


व्हिडीओ व्हायरल! 


दरम्यान गावकऱ्यांना जेसीबी खाली घेण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात हा अधिकारी गावकऱ्यांना धमकी देताना पाहायला मिळत आहे. सोबतच जो कोणी कामाच्या ठिकाणी आडवा येईल त्यांना जेसीबीच्या खाली घ्या असे म्हणताना पाहायला मिळत आहे. गावकरी यावेळी कामाबाबत विचारत असताना हा अधिकारी त्यांना समजून सांगण्यापेक्षा त्यांना दम देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घटनेने आता गावकरी आक्रमक झाले असून, कारवाईची मागणी करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीडमध्ये शोभेची दारू बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट, कारखाना जळून खाक