Shiv Sena Yatra : ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) अभियान यात्रा सुरु केली आहे. ठाकरे गटाच्या या  शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला शिवसेनेने शिवधनुष्य यात्रेने उत्तर देणार आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा सुरु होणार आहे. 


'महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण'  


शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. मार्च अखेरीस अयोध्यावारी करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाची आखणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. 'महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण' असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे.  


राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर


शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्यात आला आहे. अभियानाची जबाबदारी निष्ठावान नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेते या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. आम्हीच खरी शिवसेना असल्याचे या यात्रेच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे.


शिवसेनेचा अयोध्या दौरा


मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde ) एक मास्टरप्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील महंत धनुष्यबाण भेट देणार आहेत. हे धनुष्यबाण शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरवलं जाणार आहे. 


ठाकरे गटाची शिवसंवाद यात्रा


ठाकरे गटाची 25 फेब्रुवारीपासून राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) अभियान सुरु झाले आहे. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार ओमराजे निंबळाकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, अनंत गीते, चंद्राकांत खैरे, नितीन बानगुडे पाटील या नेत्यांसह काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.