नागपूर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल आता 9 फेब्रुवारीला लागणार आहे. सहाय्यक सरकारी वकील दीपक वैद्य यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीय. त्यानंतर हिंगणघाट पीडितेच्या आई - वडिलांची प्रतिक्रिया आली आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहे. हे व्यक्त करू शकत नाही, अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. आम्ही आमच्या मुलीला विसरू शकत नाही. आमच्यासाठी एक एक दिवस काढणं कठीण झालंय. कुठेच बाहेर जायची इच्छा होत नाही. त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे मागणी अशी हिंगणघाट जळीत हत्या प्रकरणातील पीडित शिक्षिकेच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या, "आमच्या मुलीची नेट-सेटची परीक्षा देऊन पीएचडी करण्याची इच्छा होती. तिला वनस्पतीशास्त्राचं प्राध्यापक बनायचं होतं. तिच्यावर अशा पद्धतीने अन्याय झाले, धोक्याने तिची हत्या करण्यात आली. मनात भरपूर काही आहे, मात्र व्यक्त करता येत नाही, शब्द सुद्धा आठवत नाही. हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहे अशी भावना पीडित शिक्षिकेच्या आईने व्यक्त केली आहे. माझ्या मुलीचा तडफडतच जीव गेला. त्यामुळे तिची जाळून हत्या करणार्यांना नराधमाला ही कठोरातील कठोर शिक्षा न्यायालयाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेली दोन वर्षे आम्ही निकालाची वाट पाहत आहे. अपेक्षा होती की आज त्याला कठोर शिक्षा मिळेल. मात्र काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र, आमच्या मुलीला ज्या क्रुरतेने मारण्यात आले. त्याच पद्धतीने आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी आमच्या कुटुंबाची आणि सर्व जनतेची मागणी असल्याचे पीडित शिक्षिकेचे वडील म्हणाले.
समाजात आज मुलींच्या, तरुणीच्या सुरक्षिततेसाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. बेटी बचाव बेटी पढाओ हे वाक्य जेव्हा आपण वापरतो. तेव्हा अशा हिंगणघाटसारख्या घटना व्हायला नको. मुलींनी शिकायचं कसं, एकट्याने बाहेर कसं जायचं. आमच्या मुलीच्या प्रकरणात न्यायालयातून येणाऱ्या निर्णयाने समाजकंटकांमध्ये धाक निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा ही शिक्षिकेच्या आईवडिलांनी एबीपी माझा सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
BLOG : कायदे बदलून महिलांवरील अत्याचार थांबतील का?