अकोला : शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसणं हे आपल्या शेतकऱ्यांच्या समस्येचं मुळ आहे. मात्र, याच दुर्दैवी फेऱ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढू पाहणारं एक आश्वासक मॉडेल राज्य सरकारच्या मदतीनं अकोल्यात उभं राहत आहे. 'कापूस ते कापड' अशा संपुर्ण प्रक्रियेचा  प्रवास एकाच ठिकाणी असणारं हे 'क्लस्टर' आहे. कापूस ते दर्जेदार कापड निर्मितीचा हा उद्योग यात कार्यरत 27 युनिट्स एकत्रिकरणातून उभा राहिला. 'दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला' असं या 'क्लस्टर'चं नाव आहे. आता अकोल्यातून टी शर्ट्स आणि होजीयरीचा माल देशभरातील बाजारपेठेत निर्यात होऊ लागला आहे.


एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान लहान उद्योग युनिट्सला एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ (Fiber to Fashion) या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या 27 उद्योग युनिट्सचे एकत्रिकरण (Cluster) ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या नावाने तयार करण्यात आले आहे. आता त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. उद्योगाचे धागे अखंड विणत, आर्थिक समृद्धीची वस्त्र- प्रावरणे आता अकोल्यात दृष्टीपथात आहेत. 


काय आहेय 'कापूस ते कापड' निर्मितीचं हे 'अकोला मॉडेल' :


 अकोला... कापूस उत्पादक जिल्हा अशी अकोल्याची ओळख... अकोला शहराची तर देशात ओळख आहे ती 'कॉटन सिटी' म्हणून... देशाला कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र बोटावर मोजण्याइतकेच. यातही कापड निर्मितीचा उद्योग अकोला जिल्ह्यात कुठेच नव्हता. मात्र, हिच ओळख पुसण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एका आश्वासक प्रयत्न जिल्ह्यात केला आहे. जिल्ह्यातील बोरगावमंजू आणि शेलापूर येथे 'कापूस ते कापड' निर्मितीचं एक 'मॉडेल क्लस्टर' सरकारच्या मदतीनं तयार झालं आहे. कापड निर्मितीच्या विविध टप्प्यातील निर्मिती करणारे 27 उद्योग एकत्र आलेत. अन् तयार झालंय 'दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला' हे कापड निर्मिती उद्योगाचं मॉडेल 'क्लस्टर'.


या उद्योगात कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे  आणि कापडाचे परिधाने बनविणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात.  साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते. कापसाची एक गाठ ही  165 किलोची असतेय. सध्या येथे दररोज 10 हजार परिधानांचे उत्पादन होतेय. त्यात शेलापूर येथे धाग्याचे कापड बनविणे, रंगविणे याप्रकारची युनिट्स आहेत. तर बोरगाव मंजू येथे कापसापासून धागे बनविणे व कापडापासून परिधाने बनविणे ही कामे होतायेत. येथे बसविण्यात आलेली सर्व यंत्रे ही अत्याधुनिक आहेत.



उद्योगात 27 जणांचा सहभाग : 


या उपक्रमाची सुरुवात 'सम्यक जिनिंग', चिखलगाव येथून झाली. यासंदर्भात बोलतांना 'यश कॉटयार्न प्रायव्हेट लिमिटेड उद्योगाचे संचालक कश्यप जगताप म्हणाले की, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे आणि कापड ते थेट वस्त्र तयार करेपर्यंत प्रक्रिया येथेच कराव्यात. यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी त्यास चालना दिली. यात एकूण 30 जणांना एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण दिले, तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्यात. त्यातून 27 जणांनी यात सहभाग घेतला. हे सर्व उद्योजक हे अनुसूचित जातीतील आहेत, हे विशेष.


सरकारच्या मदतीनं स्वप्नांच्या पंखांना बळ : 


प्रत्येक उद्योजकास 50 लक्ष रुपये भांडवल; असे साडे तेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा  उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार, युनियन बॅंकेने दिले आहे. या शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 10 कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत. तसेच साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते पाणी आणि विज या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत. मधल्या कोरोना काळातही मोठ्या जिकरीने ह्या उद्योजकांनी आपला उद्योग उभारण्याचे काम  सुरु ठेवले होते.दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार, या कामाला आणखी गती आली.


सरकारकडून ही झाली मदत :



  •  कापूस ते कापड’ या संकल्पनेला पालकमंत्री बच्चू कडूंची 'एक गाव, एक उत्पादन' संकल्पनेची दिली जोड

  •  या संकल्पनेतून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत  कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या उद्योग समुहाचे एकत्रिकरण

  • सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून 27 युनिट कार्यरत

  • सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात हे क्लस्टर विकसित करण्यात आले

  • प्रत्येकी 50 लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत


उद्योग ठरणार स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीचं केंद्र :


 या प्रकल्पासाठी आतापर्यंत 600 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बोरगावमंजू आणि शेलापूर येथे  110 कामगार येथे काम करीत. यातील 90 टक्के कामगार हे स्थानिक आहेत. भविष्यात दररोज 3 हजार कामगारांची आवश्यकता या प्रकल्पाला लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाल्याने ते सध्या फार आनंदित आहेत. 


भविष्यात अकोला बनू शकेल टी शर्ट्स आणि होजीयरी कपडा निर्मितीचं 'हब' : 


याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून टी शर्ट, लोअर, लेगिन्स तसेच अन्य होजिअरी उत्पादने उत्पादित होत आहेत. आतापर्यंत हा माल स्थानिक अकोला, अमरावती येथील व्यापाऱ्यांना विकण्यात येत होताय. नुकतेच बंगलोर येथील एजन्सी मार्फत ‘मॅक्स’ या इंटरनॅशनल ब्रॅंडचे दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहेय. भविष्यात अकोल्याला देशातील टी शर्ट आणि होजियरी उत्पादनांचं केंद्र बनविण्याचं या लोकांचं लक्ष्य आहे. येथून दररोज दहा हजार टी शर्ट्स निर्मितीचं लक्ष्य या उद्योगानं ठेवलं आहे. प्रक्रियेसाठी लागणारा कापसाचा कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतूनच मिळत असल्याने यावरचा दळणवळणाचा खर्च वाचला आहे. त्यामुळे इतर उत्पादनांच्या तुलनेत येथील कापड स्वस्त असणार आहे. 


   शेतमालावर प्रक्रिया उद्योग हे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवरचा रामबाण इलाज आहे. अकोल्यातील हा प्रयत्न तेव्हढाच आश्वासक आणि सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना समृद्धी प्रधान करू पाहणाऱ्या या 'कापूस ते कापड' संकल्पनेला 'एबीपी माझा'च्या आभाळभर शुभेच्छा...