Ambadas Danve On CM Eknath Shinde : शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येत्या रविवारी आपल्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असून, अनेक कार्यकर्ते अयोध्यामध्ये पोहोचले देखील आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. अयोध्या दौरा फक्त दिखावा असून, रामाचे विचार यांना कधीच झेपणार नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, "जो धनुष्यबाण त्यांना भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कृपेने मिळालेला आहे. जो धनुष्यबाण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देवाऱ्यातून चोरला आहे. तो धनुष्यबाण यांच्या हाती कधीच शोभणार नाही. हा धनुष्यबाण कधी रामाचा होऊ शकत नाही, श्री कृष्णाचा होऊ शकत नाही. हा धनुष्यबाण रावणाचाच आहे. हा जनतेचा कल्याण कधीच करु शकत नाही. तर ज्यावेळी राम मंदिर नव्हतं, बाबरीचा ढाचा होता आणि त्यावेळी शिवसेनेने लढा लढला.
राम मंदिर व्हावं म्हणून 'पहिले मंदिर फिर सरकार' अशी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. पण आता न्यायालयाने निकाल दिला, राम मंदिर पण होत आहे. अशावेळी आयोध्येला जाणं मर्दुमकी आहे. हा तर फक्त दिखावा आहे. ही रावणी प्रवृत्ती आहे. राम एकवचनी होता, एक बाण होता, मात्र याचं कोणता बाण आहे. आधी यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे होते. पण आता नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस झाले आहेत. त्यामुळे रामाचा विचार यांना झेपणार नाहीत, असे दानवे म्हणाले आहे.
नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर दौऱ्याची जबाबदारी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवारी (9 मार्च) रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. तर या दौऱ्याची धुरा नाशिकच्या (Nashik) शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची पूर्वतयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले होते. मात्र आता तेच पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले असून, त्यांच्याकडेच अयोध्या दौऱ्याच्या पूर्वतयारीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्तेही रेल्वेने रवाना होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ajit Pawar : 'नॉट रिचेबल' असल्याच्या वृत्तावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण, म्हणाले....