Ajit Pawar Clarification on Not Reachable : 'नॉट रिचेबल' (Not Reachable) असल्याच्या वृत्तावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टकरण दिलं आहे. "तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन घरीच विश्रांती घेत होतो," असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. "माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे," असं अजित पवार म्हणाले. तसंच "माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात," असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.


दरम्यान अजित पवार यांनी आज (8 एप्रिल) पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या शोरुमचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नॉट रिचेबलच्या वृत्तावर भाष्य केलं.


तब्येत बरी नसल्यामुळे घरीच विश्रांती घेत होतो, पण तेवढ्यात... : अजित पवार


अजित पवार म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो. माध्यमांनी 'नॉट रिचेबल'च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाण्याची सूचना त्यांनी माध्यमांना केली. 


'चुकीच्या बातम्या बघून व्यथित झालो'


"मी काल (7 एप्रिल) पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकूल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या 'जिजाई' या निवास्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी 'नॉट रिचेबल' असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालवणे योग्य नाही," अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त करत माध्यमांनी खात्रीकरुनच यापुढे बातम्या चालवण्याची सूचना केली. 


VIDEO : Ajit Pawar Full PC : ... म्हणून नॉट रिचेबल होतो, अजित पवारांकडून पुण्यात असल्याचं स्पष्टीकरण