Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान आज देखील अशीच कारवाई लिटिल फ्लावर शाळेच्या चौरस्त्यावर आणि लक्ष्मी कॉलनी येथील मोरे चौकात कारवाई करत, एकूण आठ अतिक्रमणे निष्काषित करण्यात आली. दरम्यान याचवेळी माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर यांच्या झुणका भाकर केंद्रावर देखील कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईसाठी पथक आल्यावर जमाव देखील जमा झाला होता. मात्र तरीही मनपाच्या पथकाने कारवाई करत,  झुणका भाकर केंद्र जमीनदोस्त केला. 


महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लिटिल फ्लावर हायस्कूल शाळेच्या चौररस्त्यावर मिलिंद कॉलेज लगत असलेले झुणका भाकर केंद्र आज नियमानुसार नोटीस देऊन काढण्यात आले. सदर झुणका भाकर केंद्र हे माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर यांचे होते. मागील अनेक दिवसांपासून न्यायालयाची स्थगिती आहे, असे ते नेहमी सांगत होते. दरम्यान 9 जानेवारी रोजी या भागातील अतिक्रमण काढण्यात आली होती. पण यावेळी पुरुषोत्तम ठाकूर यांनी स्वतःचे अतिक्रमित झुणका भाकर केंद्र काढले नव्हते. त्यामुळे त्यांना नियमानुसार महापालिकेनी नोटीस देण्यात आली होती.


माजी नगरसेवकाचा कारवाईला विरोध 


महानगरपालिकेने नोटीस देऊन खुलासा करण्याचे सांगितल्यावर पुरुषोत्तम ठाकूर यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक होते. त्यामुळे आज सकाळी सदर झुणका भाकर केंद्र जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचं पथक पुन्हा मोरे चौकात पोहोचले. यावेळी प्रथम माजी नगरसेवक यांनी विरोध केला. त्यानंतर मनपाचे अधिकारी रवींद्र निकम यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.  न्यायालयात काय स्थिती याबाबत सांगितले. तसेच सदर झुणका भाकर केंद्र शासनाने रद्द केले आहे, असे समजावून सांगितल्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढण्यास होकार दिला.


कारवाईला विरोध करण्यासाठी जमला जमाव...


महानगरपालिकेच्या पथकाने कारवाईला सुरवात करताच, यावेळी जमाव जमला होता. मात्र यावेळी मनपा अतिक्रमण पथकाच्या पोलीस बंदोबस्तात, पूर्ण झुणका भाकर केंद्र निष्कर्षित करण्यात आले. यानंतर लक्ष्मी कॉलनी लगत असलेले मोरे चौक या ठिकाणी एकूण दहा बाय पंधरा आकाराच्या सात टपऱ्याचे  अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. याठिकाणी टपऱ्याचे अतिक्रमण काढताना काही कार्यकर्त्यांनी विरोध केला, परंतु पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये यांनी सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे अतिक्रमण काढण्यात आले. एकूण या भागात दहा टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जी 20 च्या पाहुण्यांसाठी औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ते चकाचक, पण अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था! सोशल मीडियावर नागरिकांचा संताप