Aurangabad News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक धक्कादायक घटना समोर आली असून, ऑपरेशननंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. शहरातील एमजीएम रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र यात रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 


रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांच्या 20 वर्षीय मुलीला पोटात दुखत असल्याने गुरुवारी रात्री 11 वाजता इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली, परंतु काही तास उलटूनही मुलगी शुद्धीवर आली नाही. त्यामुळे सीटी स्कॅनसाठी इतर रुग्णालयात दोन डॉक्टरांसह तिला रात्री उशिरा हलवण्यात आले. मात्र मुलगी शुद्धीवर येत नसल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे डॉक्टर हजर नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयाची तोडफोड केली. 


डॉक्टरांनी पळ काढला...


रुग्णाच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की, आमच्या मुलीवर शस्त्रक्रिया केल्यावर सुद्धा ती शुद्धीवर आली नाही. त्यामुळे बाजूच्या रुग्णालयात तिचे सिटी स्कॅन करावे लागणार असल्याचे सांगत दोन डॉक्टर सोबत आले. मात्र दुसऱ्या रुग्णालयात पोहचताच दोन्ही डॉक्टर अक्षरशः पळून गेले. त्यामुळे त्याच परिस्थितीत कसेतरी आम्ही मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत आणि डॉक्टर पळून गेल्याचं सांगण्यासाठी पुन्हा त्या रुग्णालयात गेल्यावर तिथे कोणतेही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे समोर आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र याबाबत संबधीत रुग्णालयाकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त...


रुग्ण मुलीला डॉक्टर रुग्णालयात सोडून पळाल्याने संतप नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या, सोबतच रुग्णालयातील टेबल, खुर्च्याची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहता पोलिसांचा बंदोबस्त वाढवत घटनास्थळी असलेल्या गर्दीला पांगवण्यात आले. तसेच रुग्णालयाच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. तर रुग्णालयातील सीसीटीव्हीत प्रकार कैद झाला असून, गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 


ठरलं! येत्या सहा महिन्यात औरंगाबादच्या रस्त्यांवर धावणार 35 इलेक्ट्रिक बसेस; 'एसी'ची ही असणार सुविधा