Electric Bus In Aurangabad: एकीकडे औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सुरु करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असतानाच आता शहराच्या रस्त्यांवर 35 एसी इलेक्ट्रिक बसेस धावणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात 35 इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी एलओए म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे. तर नागरिकांच्या सेवेत येत्या 6 महिन्यात शहरात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शंभर डीझेल बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. दरम्यान केंद्र व राज्य शासनाचे इ वाहन धोरणानुसार पर्यावरण संवर्धनाचा दृष्टीने व डिझेलवर होणाऱ्या खर्च वाचवण्याचा दृष्टीने औरंगाबाद स्मार्ट सिटीने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता शहरात 35 एसी इलेक्ट्रिक बसेस धावणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गद्शनाखाली 30 दिवसाच्या आत इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत 35 इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी, बसेस चालवण्यासाठी व त्यांची देखरेख करण्यासाठी करार करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाने दिली आहे.
दहा वर्षांसाठी करार...
इलेक्ट्रिक बसेस घेण्याचे दृष्टीने औरंगाबाद स्मार्ट सिटीकडून मार्च 2022 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तांत्रिक मूल्यमापन अर्थात टेक्निकल इव्हॅल्युएशनचे भाग म्हणून शहरात इलेक्ट्रिक बसचे जुलै महिन्यात फील्ड ट्रायलस् घेण्यात आले. औरंगाबाद स्मार्ट सिटी इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत जीसीसी म्हणजेच, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर करार करणार आहे. यामध्ये बसेस खरेदी करण्याची, बस सेवा चालवण्याची, त्यांची देखरेख करण्याची जवाबदारी एजन्सीची असेल. तर प्रवासी भाडेमधून येणाऱ्या सर्व उत्पन्न स्मार्ट सिटीला मिळेल आणि स्मार्ट सिटी एजन्सीला प्रती किलोमीटर 59 रुपये हा दर देईल. हा करार मुळात दहा वर्षांसाठी आहे. त्यानंतर त्या वेळच्या परिस्थितीनुसार अजून 2 वर्ष वाढवता येऊ शकतो, असे डॉ चौधरी म्हणाले.
शहरात आता 135 बसेसचा ताफा...
2019 मध्ये औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे 100 डिझेल बसेस सोबत माझी स्मार्ट बस सेवा सुरू करण्यात आली होती. ह्या बस सेवेचा दीढ कोटी लोकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. त्यात आता आणखी 35 इलेक्ट्रिक बसची भर पडणार असल्याने, डिझेल व इलेक्ट्रिक बसेस मिळून एकूण 135 गाड्यांचा ताफा शहरात नागरिकांचा सेवेत असणार आहे.