Aurangabad News: शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात दिवाळीनिमित्त (Diwali 2022) स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक मठातील संत-महंतांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान यावेळी बोलतांना भुमरे यांनी महत्वाची घोषणा करतांना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक (Warkari Bank) सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात वारकऱ्यांसाठी ही पहिलीच स्वतंत्र बँक असणार असल्याचे बोलले जात आहे. 


राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भुमरे यांना पुन्हा एकदा रोहयो मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर आता आपल्या पैठणच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे याचवेळी अनेक मठातील संत-महंतांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. तर त्यांच्यासाठी भोजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरम्यान यावेळी बोलतांना भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु करण्याबाबत इच्छा बोलून दाखवली. सोबतच त्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी तयार असल्याचं देखील भुमरे म्हणाले. 


काय म्हणाले भुमरे....


यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक असायला हवी आहे.  तुम्ही जर पुढाकार घेतला तर माझी जी काही मदत असेल ती करायला तयार आहे. वारकऱ्यांसाठी जर स्वतंत्र बँक असेल तर वेळोवेळी मदत झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्हाला कधीच कुणासमोर हात पसरवण्याचे काम पडणार नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा वारकऱ्यांची हक्काची बँक राहील. त्यामुळे सर्वच संत-महंतांसह वारकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी निश्चित माझ्याकडून जी काही मदत लागेल ती करण्यासाठी तयार असल्याचं भुमरे म्हणाले. भुमरे यांनी केलेल्या या घोषणेचं उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले. 


पैठणला एकनाथी भागवत सुरु करणार...


याचवेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, ज्याप्रमाणे देहूला, आळंदीला भागवत आहे. त्याप्रमाणे पैठणला देखील एकनाथी भागवत मंदिराची उभारणी करणार असल्याची घोषणा देखील यावेळी भुमरे यांनी केली. त्यामुळे मी शब्द देतो की, एकनाथी भागवत मी करणारच, तसेच पैठण घाटावर आरती सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील भुमरे यावेळी म्हणाले. 


शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका; भाजप नेत्यांनी हात झटकले