Aurangabad News: जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. तर भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. मुख्यालयाचा ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये बंब यांच्याबद्दल रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका असून, भाजपची ही भूमिका नसल्याचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी म्हंटले आहे. 


भागवत कराड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मुख्यालयी वास्तव्य न करणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची भूमिका भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी घेतली असून, त्यावरून शिक्षकांत नाराजी असल्याकडे डॉ. भागवत कराड यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले.  त्यावर बोलतांना कराड म्हणाले की, मुख्यालयाचा मुद्दा हा आमदार बंब यांची वैयक्तिक भूमिका असून, भाजपची ही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षकांच्या मुख्यालयाच्या मुद्यावरून आमदार बंब यांनी घेतलेल्या भुमिकेवरून भाजपने हात झटकले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 


आमदार बंब यांची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरणार?


आगामी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. मात्र असे असतानाच आमदार प्रशांत बंब यांची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचा आमदार बंब यांनी उपस्थित केलेला मुद्दा त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 


प्रशांत बंब यांच्या रडारवर अधिकारी?


मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रशांत बंब यांच्या रडारवर आता केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारीअसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण  या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांत किती जि. प. शाळांना भेटी दिल्या, त्याचा अहवाल आमदार बंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागितला आहे. तर मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात आमदार बंब यांनी घेतलेल्या भुमिकेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांचे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. 


अखेर कारवाई! मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात; आमदार बंब यांच्या मागणीला यश