Agriculture News : परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. त्यांची हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. खरीप हंगामाची ((Kharif season) पिकं तर वाया गेली आहेत, आता रब्बी हंगाम (rabi season) आला आहे. काही ठिकाणी पेरण्या देखील सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्याप नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा मिळाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगाम पेरणी करण्याची वेळ आली आहे.
सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे 100 टक्के नुकसान
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. दरम्यान यावर्षी 1 हजार 350 ते 1 हजार 400 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटरपेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी पावसानंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्यानं यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करु असं आश्वासन देखील दिलं होतं. परंतू पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडी मदतरुपी सरकारची साखर पडून तोंड काय गोड झालं नाही. पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टीची मदत काहीच शेतकऱ्यांना मिळालीय, पण तीही अत्यल्प आहे. दरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना, रब्बीची पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे.
दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा,अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या दिवाळी निराशेची गेली. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केली आहे. दरम्यान आता तरी पिक विमा,अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान
दरम्यान, मराठवाड्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं होतं. मोठा फटका येथील शेती पिकांना बसला होता. जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान झाले होते. यातून सावरत असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ज्याचा 28 लाख 76 हजार 816 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर यासाठी 2479 कोटींची मदत अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या: