Maharashtra Political Crisis: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरही आरोप प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. तर शिवसेना आणि बंडखोर आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पाहायला मिळत आहे. माजी मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, 'माझ्या पैठण मतदारसंघामधील पर्यटन विकासासाठी मी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली, मात्र ते एकदाही भेटून त्याबद्दल बोलले नसल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. 


बंडखोरीनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच परतलेल्या भुमरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण सांगितले. तसेच कधीही कुणावर उघडपणे टीका न करणारे भुमरे यांनी यावेळी मात्र आपल्या मनातील खदखद स्पष्टपणे मांडली. यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, 'मी पैठण मतदारसंघातील पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. यासाठी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली. पण आदित्य ठाकरेंनी निधी देणे सोडा, पैठणला साधी भेटही दिली नाही. त्यांनी किमान दौरे तरी करायला हवे होते, असे भुमरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे सुद्धा भेटण्यासाठी वेळ देत नव्हते असेही भुमरे म्हणाले. 


खैरेंनाही दिले उत्तर...


बंडखोर आमदारांनी सात हजार कोटी घेतल्याच्या खैरेंच्या आरोपाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांचे आरोप बिनबुडाचे आहे. त्यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे. तर पैसे घेतल्याचा आरोप करणारे खैरे साहेबांनी सात हजार कोटी कशाला म्हणतात हे लिहून दाखवावे, असा खोचक टोला भुमरे यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या कोणत्याही आमदाराने पैसे घेतले नसून, ते फक्त प्रेमाखातर त्यांच्यासोबत गेल्याचं भुमरे म्हणाले. त्यामुळे आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणारे चंद्रकांत खैरे हे सुद्धा लवकरच आमच्यासोबत येतील असेही भुमरे म्हणाले. 


संबंधित बातम्या 


Aurangabad: 'पाय माझे जमिनीवर,नजर माझी...; भूमरे यांच्या पत्नीने घेतला उखाणा


Politics: 'लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोडा'; भूमरेंचा 'तो' फोन कॉल व्हायरल