Washim News Updates: वाशीम जिल्ह्यातील  शालेय पोषण आहारातील साखरेत कुजलेले बेडूक आढळल्याचा प्रकार कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झोडगा येथील अंगणवाडीत उघडकीस आला. त्यामुळे पोषण आहार वितरण करणाऱ्या कंपनीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.लहान बालकांचं आरोग्य सुधारून सुदृढ राहावं याकरता शासनामार्फत ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना पाकीटबंद आहार पुरवला जातो.  वाशिमच्या झोडगा येथील अंगणवाडीलसुद्धा पोषण आहार पुरवला गेला. त्या पोषण आहाराचे वाटप 4 जुलैला अंगणवाडी सेविकेकडून करण्यात आले. 


यावेळी स्थानिक अंगणवाडीतील विद्यार्थी कबीर खेडकर याला देण्यात आलेला पोषण आहार 5 जुलै रोजी त्याच्या पालकांनी उघडून पाहिला असता साखरेत कुजलेले बेडूक आढळून आले. त्यामुळे घडलेला प्रकार अंगणवाडी सेविकेच्या कानावर टाकण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत झोडगा येथील अंगणवाडीला भेट देऊन पंचनामा केला आणि मृत बेडूक आढळलेले साखरेचे पाकीट ताब्यात घेतले. 


साखरेत कुजलेलं बेडूक आढळून आलेले पॉर्किट तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल असे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले. 


पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्य आणि शारिरीक विकास व्हावा या उद्देशानं दिला जातो. मात्र वाशिममधील या प्रकारानं पोषण आहार पुरवणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या साखरेत बेडूक आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.