Sandipan Bhumre: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार तब्बल वीस दिवसांनी आपापल्या घरी परतले आहे. त्यामुळे घरच्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान पैठण तालुक्याचे आमदार तथा ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले संदिपान भुमरे हे सुद्धा मंगळवारी आपल्या घरी परतले. यावेळी त्यांच्या कुटुंबाने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. तर याचवेळी भुमरे यांच्या पत्नी यांनी आपल्या पतीच्या नावाने उखाणा घेतला. 


भुमरे यांच्या नावाने उखाणा घेतांना त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, 'पाय माझे जमिनीवर, नजर माझी आकाशावर, संदिपान पाटलांच नाव भारताच्या नकाशावर..'आपल्या पत्नीने घेतलेल्या हटके उखाणा आयकून भुमरे यांच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळा आनंद पाहायला मिळाला. तर यासर्व घडामोडींनंतर वीस दिवसांनी आज घरातील सदस्यांना भेटता आल्याचा आनंद असल्याचे भुमरे म्हणाले. 


खैरे सुद्धा लवकरच शिंदे गटात 


यावेळी 'एबीपी माझा'सोबत बोलतांना भुमरे म्हणाले की, आम्ही सात हजार कोटी घेतल्याचे जे काही आरोप चंद्रकांत खैरे यांनी केले आहेत ते बिनबुडाचे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे. तसेच त्यांना माझे आव्हान आहे की, खैरे साहेबांनी सात हजार कोटी कशाला म्हणतात हे लिहून दाखवावे, असा टोला भुमरे यांनी यावेळी लगावला. कोणताही आमदार पैशांनी विकले गेले नसून, एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर त्यांच्यासोबत गेले असल्याच भुमरे म्हणाले. तर आमच्यावर आरोप करणारे खैरे सुद्धा लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटात असतील असेही भुमरे म्हणाले. 


संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप...


औरंगाबादमध्ये परतलेल्या भुमरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी आमच्यावर अंत्यत खालच्या पातळीवर टीका केली आहे. राऊत हे आम्हाला रेडे म्हणाले, कुत्रे म्हणाले, यांचे मृतदेह येतील असेही म्हणाले. राऊत एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी महिला आमदारांना वेश्या असल्याचं म्हंटले असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.