Aaditya Thackeray: गेल्या दोन दिवसांपासून सिल्लोड येथे होणाऱ्या आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात सिल्लोड येथे आदित्य ठाकरे यांची कोणतेही सभा होणार नसून, तसे काहीही ठरलेलं नव्हतं अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठीचे नियोजन आधीपासून करण्यात आले होते, मात्र चुकून आमच्या सिल्लोड येथील पदाधिकाऱ्यांनी सभेची परवानगी पोलिसांकडे मागितली होती असेही दानवे म्हणाले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची सभा सिल्लोडमध्ये घेण्याबाबत काहीही ठरलेलं नसल्याच दानवे म्हणाले आहे. 


याबाबत बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, मुळात आदित्य ठाकरे यांच्या सभा ठरल्याच नव्हत्या, आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची कोणतेही सभा ठरलेली नव्हती. फक्त सिल्लोडमधून जातांना कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी तयारी केली होती. त्यामुळे सभाबाबत काहीही ठरलेलं नव्हते. तसेच चिखली येथे होणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात सुद्धा सभा नाही. तर सिल्लोड येथील आमच्या पदाधिकारी आणि आमच्यात कम्युनिकेशन गॅप झाल्याने त्यांनी पोलिसांकडे सभेची परवानगी मागितली होती. पण आदित्य ठाकरे यांची कोणतेही सभा ठरलेली नसून, आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत मात्र करण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. 


खरे रणछोडदास अब्दुल सत्तार... 


अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा रणछोडदास म्हणून उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अंबादास दानवे म्हणाले की, रणछोडदास कोण हे इतिहासात तपासले पाहिजे. अब्दुल सत्तार कुठे-कुठे होते आणि कोणाकोणा सोबत रन सोडून गेले आहेत, हे सिल्लोडमधील जनतेला माहित आहे. आधी सत्तार काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस सोडल्यावर अपक्ष झाले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि घडीत अशोक चव्हाण तर घडीत नारायण राणे यांची साथ पकडली. पुढे लोकसभा लढवणार म्हणून घोषणा केली, पण लोकसभेचं मैदान सोडून पळाले. त्यानंतर भाजप नेत्यांच्या रात्रीबेरात्री भेठीगाठी घेतल्या. पण तेथील देखील रण सोडून शिवसेनेत येण्यासाठी पायघड्या घातल्या. मातोश्रीच्या मागच्या दाराने किती भेटी घेतल्या होत्या. आता शिवसेना सोडून शिंदे गटात गेले, त्यामुळे रन कोण छोडत गेले आहे. म्हणून खरे रणछोडदास अब्दुल सत्तार असल्याचं दानवे म्हणाले. 


असा असणार आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा...


आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये आल्यावर लियाखेड नावाच्या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्याठिकाणी आठ ते दहा गावातील शेतकरी जमणार आहे. त्यानंतर तेथून आम्ही औरंगाबादच्या दिशेने जाणार आहे. परंतु सिल्लोड येथील शिवसैनिकांचा आग्रह आहे की, आदित्य ठाकरे यांनी रस्त्यात थांबवून त्यांचा स्वागत स्वीकारावा, त्यामुळे मी देखील तशी विनंती आदित्य ठाकरे यांना करणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. त्यामुळे सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.