Farmers News : शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers suicides) रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं असं मत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केलं. वारकरी हेच शेतकरी आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त महराष्ट्र करण्यासाठी वारकरी सांप्रदायानं मार्गदर्शन करावं असं सत्तार म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेच्या (Varkari Sahitya Parishad) माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (Vitthal Patil) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यानंतर कृषीमंत्री सत्तार यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.


नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये यासाठी सरकारनं संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. शेतकरी राज्यात आत्महत्या करतात ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी संताच्या विचारतून, मानसिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सत्तार यावेळी म्हणाले. 




कृषीमंत्र्यांच्या आवाहनाला वारकरी साहित्य परिषदेचा सकारात्मक प्रतिसाद


दरम्यान, वारकरी साहित्य परिषदेनं देखील कृषीमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासन चांगलं काम करणार असेल तर त्यांना मदत करु असे वारकरी साहित्य परिषदेकडून सांगण्यात आले. याबाबत एबीपी माझानं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी वारकरी सांप्रदाय जर सरकारच्या मदतीला आला तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्यात मदत होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना वारकरी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सत्तार यांच्याशी बैठक झाल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.  शासन जर शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं काम करणार असेल तर आम्ही त्यांना मदत करु असे पाटील म्हणाले. 


ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्रात प्रत्येकजण सन्मानानं जगला पाहिजे


ज्ञानोबा तुकोबांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात प्रत्येकजण सन्मानानं जगला पाहिजे असे पाटील म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख मंडळींना भेटायला येण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याप्रमाणे लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाल्यानंतर वारकरी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी मिळून पुढचा निर्णय घेऊ असे पाटील यांनी सांगितले. पुढच्या काळात वारकरी साहित्य परिषद प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळावा घेऊ चर्चा करणार आहे. तसेच गावोगावी दिंडी, रथयात्रा काढमार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणार आहे. त्या सर्व समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Marathwada: मराठवाड्यात गेल्या सात महिन्यात 515 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं; सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी