(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला, दहा ते पंधरा फुटापर्यंत नेले ओढत
Aurangabad : नागरिकांनी काठालाठ्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावीत महिलेची सुटका केली.
Dog Attack In Aurangabad: जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला करत लचके तोडले आहे. तर या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर पाचोरा येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरठाण येथे मंगळवार पहाटे पाच वाजता ही घटना घडली असून, प्रमिलाबाई अनिल खंडाळे (वय 45 वर्षे, रा. वरठाण,सोयगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वरठाण येथील प्रमिलाबाई खंडाळे या सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे अंगणात चूल पेटविण्यासाठी उठल्या होत्या. दरम्यान याचवेळी गावातील मोकाट फिरणाऱ्या पंधरा ते वीस कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. धक्कादायक म्हणजे महिलेचे लचके तोडून त्यांना दहा ते पंधरा फूट अंतरावर कुत्र्यांनी ओढत नेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रमिलाबाई प्रचंड घाबरुन गेल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज आयकून महिलेचा मुलगा रोषन खंडाळे व गल्लीतील नागरिक उठले. त्यांनी तत्काळ काठालाठ्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावीत महिलेची सुटका केली.
महिला गंभीर जखमी...
मोकाट कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात प्रमिलाबाई खंडाळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्या हातापायांचे व चेहऱ्यावरील लचके तोडून रक्तबंबाळ केले आहे. त्यांना जखमी अवस्थेत पाचोरा येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून, मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. तर प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Measles Disease: औरंगाबादेतील गोवरच्या 15 संशयित बालकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
शहरात एकाचे कुत्र्याने 9 जणांचे लचके तोडले
दुसऱ्या एका घटनेत औरंगाबाद शहरातील गणेश कॉलनी परिसरात सोमवारी रात्री मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला. सोमवारी रात्री पाकिजा फंक्शन हॉल परिसरात समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या नऊ जणांवर एकाच कुत्र्याने हल्ला करीत त्यांचे लचके तोडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. माजी नगरसेवक नासिर सिद्दिकी यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार केली. यानंतर प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहिद यांनी मोकाट कुत्रे पकडणारे पथक मंगळवारी परिसरात पाठवले. यावेळी या पथकाने लचके तोडणाऱ्या कुत्र्यासह अन्य 22 मोकाट कुत्री पकडली. या सर्वांची नसबंदी करून नंतर पुन्हा त्यांना सोडून देण्यात येईल.