Aurangabad Crime News: सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
Aurangabad : घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
Aurangabad Suicide News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. योगेश लक्ष्मण वाघ असे आत्महत्या करणाऱ्या युवकांचे नाव असुन, त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य दलात स्वप्न पाहणारा योगेश गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करत होता. त्यामुळे यासाठी तो दररोज पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडून, सराव करायचा. नेहमीप्रमाणे योगेश आज पहाटेचं सरावासाठी घराबाहेर पडला. मात्र सकाळचे आठ वाजले तरीही योगेश घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला.
विहिरीत आढळून आला मृतदेह...
योगेश सरावासाठी रोज शेतात जात असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतात गेले. यावेळी योगेशनी घरुन सोबत नेलेली दुचाकी शेतात लावलेली दिसली. परंतु योगेश कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो दिसून आला नाही. त्यामुळे नातेवाईकांना संशय झाला आणि त्यांनी शेजारच्या विहिरीकडे जाऊन पाहीले असता, विरीहिमध्ये योगेशची चप्पल तरंगत असल्याचे दिसून आले.
योगेशची चप्पल पाहिल्यावर या घटनेची माहिती तात्काळ गावकऱ्यांना देऊन योगेशचा विहिरीत शोध घेण्यात आला. विहिरीत पाणी जास्त असल्याने लोंखाडी गळ सोडून शोध घेण्यात आला. यावेळी योगेशचा मृतदेह विहीरीत आढळून आला. या घटनेची माहीती तात्काळ पाचोड पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तर पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान योगेशने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, पोलीस पुढील तपास करतायत.
गावात हळहळ...
योगेश वाघ हा गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करत आहे. यासाठी तो मोठे कष्ट घेत होता. रोज पहाटेच तो शेतात जाऊन सैन्य भरतीसाठी सराव करायचा. त्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे असे कुटुंबातील सदस्यांसह गावकऱ्यांना नेहमीच वाटायचं. पण आज सकाळी योगेशने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, वाघ कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.