मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादी- भाजपमध्ये होणार लढत
Election: राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.
Marathwada Teacher Constituency Election: राज्यात विधानपरिषदेसाठी पाच ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत असून, आज अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 15 अर्ज दाखल करण्यात आले होते. आज एकाने माघार घेतल्याने 14 अंतिम उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्यात खरी लढत होणार आहे.
याबाबत निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. नामनिर्देशनपत्र छाननी नंतर सर्व 15 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
राष्ट्रवादीत बंडखोरी!
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असतांना देखील, राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला अर्ज दाखल करत कायम ठेवला आहे. तर आपण माघार घेणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विक्रम काळे यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर "माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी विक्रम काळे यांचे काम करुन त्यांना मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून तीनवेळा निवडून दिले. पण काळे हे आमच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. मग काळे शिक्षकांचे प्रश्न काय सोडवणार. पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीच कशी? हा खरा प्रश्न माझ्यासह इतरांना देखील पडला असल्याचे', सोळुंके म्हणाले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचना!
औरंगाबाद (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 08 ते सायंकाळी 04 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा अनुज्ञेय करणे बाबत शासनाचे निर्देश आहेत. औरंगाबाद विभागात मुळ मतदान केंद्र-222 व सहाय्यकारी मतदान केंद्र 05 या प्रमाणे एकूण 227 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्राची यादी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना पूरविण्यात आली आहे. सोबतच निवडणूक प्रचारासाठी छपाई करण्यात येणारे पोस्टर्स, बॅनर्स, पोम्पलेटस इत्यादी प्रचार साहित्याच्या छपाईवर असलेले निर्बंध व Covid-19 साथरोगाचा प्रसार व प्रादूर्भाव टाळण्याचे अनुषंगाने निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांचा संच सर्व उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :