Devendra Bhuyar : आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि दंडाची शिक्षा
Devendra Bhuyar : आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
अमरावती : वरुड-मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील बेनोडा गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बॉटल फेकून मारली होती. त्यानंतर तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 साली ही घटना घडली होती. आज जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे...
बेनोडा गावाचा पाणीपुरवठयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना त्या प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार सातत्याने प्रश्न मांडत होते. मात्र, त्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नव्हते अनेक वेळा मागणी करून सुद्धा त्यावर मार्ग निघत नव्हता. आमदार देवेंद्र भुयार सभागृहामध्ये सातत्याने त्यांच्या अधिकाराचा उपयोग करून सभागृहात प्रश्न मांडत असतांना तो प्रश्न अधिकाऱ्यांच्या पचणी पडला नसल्याने त्यांना अडचणीत आणण्यासाठी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांना 8 दिवसाची शिक्षा झाली होती. 2019 साली जिल्हा परिषदेत पाणी टंचाई विषयावर विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासभेला तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, आमदार देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. या सभेत गटविकास अधिकारी सुभाष बोपटे पाणी टंचाईवर माहिती देत असताना त्यांच्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी माईक आणि पाणी बॉटेल्स फेकून मारल्या. त्यामुळे सभेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. सभेत पाणी बॉटल्स मारल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याने तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणात आज न्यायालयात न्यायाधीशांनी आमदार देवेंद्र देवेंद्र भुयार यांना कलम 353 भा दं.वि. अन्वये 3 महिने कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. जर आमदार देवेंद्र भुयार यांनी 15 हजार दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे..
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्याच्या 100 सजा जरी झाल्या तरी पर्वा नाही : आमदार देवेंद्र भुयार
बेनोडा गावाचा पाणीपुरवठयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला अटक करण्यात आली, त्यावेळी मला 8 दिवसाची सजा झाली. त्यानंतर बेनोडा गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली ती योजना आज कार्यान्वित सुद्धा झाली आहे. या प्रकरणामध्ये मला जी काही शिक्षा मिळाली ती मला मान्य आहे. या विरोधात मी न्यालायमध्ये दाद मागणार आहे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्याच्या 100 शिक्षा झाल्या तरी सुद्धा मला त्याची पर्वा नाही, सजेला आम्ही घाबरत नाही. आम्ही घेतलेला वसा सोडणार नाही कायम आमची भूमिका अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या विरोधात सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आम्ही कायम लढत राहणार, जनतेचा आदर करणारे जनतेचे तात्काळ कामे करणारे अधिकारी आहे. त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन सत्कार करू पण जे जनतेची कामे अडविणारे जाणीवपूर्वक त्रास देणारे, पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची रस्त्यावरून वरात काढण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. यासाठी आठवड्याची सजा लागली तरी पर्वा नाही. जनतेची अधिकाऱ्यांनी आपल्या पगारात प्रामाणिकपणे कामे करावी असं आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.