Maharashtra News : आता राज्यभरातल्या भाविकांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं जवळपास सगळ्याच गोष्टी नॉर्मल मोडवर आल्या आहेत. आता राज्यभरातल्या प्रसिद्ध देवस्थानांनी देखील ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी आता ई पासची गरज लागणार नाही. त्यामुळं आता अंबाबाई मंदिराच्या चार दरवाजातून भक्तांना प्रवेश मिळणार आहे. 


कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही, देवस्थान समितीने ई पासची सक्ती रद्द केली आहे. चारही दरवाजांतून आजपासून मंदिरात प्रवेश घेता येणार आहे. भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीक़डून निर्णय घेण्यात आला आहे. तिकडे जोतिबाच्या दर्शनासाठी आता ईपासची गरज लागणार नाही. त्यामुळे आता सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे.


शिर्डी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा...


शिर्डी साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत ‌सहभागी झाले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. 14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा लक्षवेधी ठरली. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल - ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासून सकाळी 6 वाजता परिक्रमेस सुरूवात झाली. 


साईबाबा हयातीत असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते, असा उल्लेख साईबाबांच्या‌ जीवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो. त्या धर्तीवर तीन वर्षापूर्वी ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला. मात्र कोविड संकटात ‌या उत्सवात खंड पडला होता. सर्व नियम शिथील झाल्यानंतर आज निघालेल्या शिर्डी परिक्रमेत पाच हजारांहून अधिक भाविक सामिल झाले आहेत. ग्रामस्थच नव्हे तर शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच राज्य आणि विदेशातून आलेले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.


साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, विश्वस्त मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे हस्ते साईबाबांची आरती पार पडल्यानंतर या परिक्रमेची सुरूवात झाली. ज्या मार्गावरून परिक्रमा जाणार त्या मार्गावर रांगोळी तसेच फुलांचे आच्छादन करण्यात आले. विविध वेषभूषा परिधान करत भाविक मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी झाले आहेत.