पंढरपूर : तब्बल 21 दिवसाच्या थकवत्यानंतर आजपासून देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून आज देवाचा पलंग लागल्याने देवाला आता रोज निद्रा घेता येणार आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी यात्रेपूर्वी देवाचा पलंग काढला जातो आणि 24 तास दर्शन देत विठुराया उभा असतो. आता यात्रा संपल्यानंतर आज प्रक्षाळपूजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरु होणार आहेत.  प्रक्षाळ पूजा म्हणजे  प्रक्षालन करणे म्हणजेच सफाई करणे होय . ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रेनंतर ही प्रक्षाळ पूजा होत असते.


 यात्रा कालावधीत हजारो  भाविक मंदिरात आल्याने मंदिर घाण होते आणि ते साफ करण्यासाठीची ही प्रक्षालन पूजा ज्याचे नाव पुढे प्रक्षाळ पूजा असे पडले. बडवे उत्पातांच्या काळात या पूजेचे औचित्य मंदिरासोबत देवाचा गाभारा आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सफाई अशीच होती. कार्तिकी यात्रेदरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास 21  दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो. ज्यामुळे देव झोपत नाही अशी भावना यात असते. यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा , नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी यासाठी दर्शन थोड्या काळासाठी बंद असते. या 21 दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही 24 तास खुले असते.


 कार्तिकी  यात्रेसाठी गेल्या 21 दिवसापासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळपुजेस आज सकाळी सुरुवात झाली.  काल  रात्री मंदिर समितीच्या वतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोळून मालिश करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यावर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. यानंतर मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते विठुरायाला पवमान अभिषेक करण्यात आला. तर रुक्मिणी मातेकडे मंदिर समिती सदस्यता साधना भोसले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. याचवेळी विठुरायाच्या पलंग पुन्हा देवाच्या शेजघरात नेण्यात येऊन त्यावरील गाद्या, लोड बदलण्यात आले. आज रात्री शेजारतीनंतर विठुराया निद्रेसाठी जाणार असून त्यापूर्वी त्याला 21 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या काढ्याचा नैवेद्य दिला जातो. आजच्या प्रक्षाळ पुजेपासून आता देवाचे सर्व नित्योपचार सुरु होतील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


Income Tax Saving Tips: तुमचं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न आहे? 'या' सोप्या टीप्स वाचवतील तुमचं 12 हजारांहून अधिक कर


Cryptocurrency: तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असली तरी घाबरण्याची गरज नाही!