Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सतत हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. अशात शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करत 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असल्याच्या नितेश राणे यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे यावरुन आता राजकीय वातावरण आणखीच पेटण्याची शक्यता आहे. 


याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, "गेल्या काही दिवसात पाहिले तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र या हिंसाचाराच्या घटना घडतायत कशा? याचं मार्गे काही कळायला तयार नाही." "दरम्यान नितेश राणे यांनी केलेले आरोप एवढे गंभीर आहेत की, 2004 साली मातोश्रीवर जी बैठक झाली. त्या बैठकीत एक वरिष्ठ नेते आणि लोकाधिकार संघटनेचे सरचिटणीस हे दोघे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही भागात हिंसाचार घडवण्याच्या त्यांना सूचना दिल्या. मुस्लीम भागात हत्यारे नेऊन हल्ले करा. ज्यामुळे हिंसाचार होईल. 1995 आणि 1997 मध्ये हिंसाचाराच्या घडलेल्या घटनांमुळे सत्ता मिळाली होती. त्यामुळे पुन्हा 2004 मध्ये असे काही घडवून सत्ता मिळवण्याच उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता. तर आता सरकार गेल्यावर पुन्हा असे प्रकार वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी अशा सूचना देण्यात आल्या आहेत," असेही शिरसाट म्हणाले आहेत. 


हिंसाचार घडवणारा चेहरा समोर आला पाहिजे


पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, काही कारण नसताना हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मात्र याचा आरोप दुसऱ्यावर ढकलून पुन्हा हिंदू एकजूट कशी होईल यासाठी प्रयत्न सुरु केला जात आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटत आहे की, जे कोणी हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, ज्यांच्यामुळे या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली पाहिजे. त्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमचं एक शिष्टमंडळ भेट घेणार आहे. तसेच हिंसाचार घडवणारा हा चेहरा कुठेतरी समोर आला पाहिजे. तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून, तुम्ही राज्यात हिंसाचार घडवत आहात, असेही शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nashik Sanjay Raut : त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरीनं घुसलं नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया