Maharashtra NCP Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची (BJP) कास धरत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. शिंदेंच्या बंडानंतर आधीच राज्याच्या राजकाणातील समीकरणं बदलली होती. अशातच आता अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. अशातच अजित पवारांनी एमईटी वांद्रे येथे झालेल्या बैठकीत काका शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केला होता. शरद पवारांवर अनेक आरोपही अजित पवारांनी केले. यावेळी अजित पवारांनी वय 82 वर्ष, आता तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा प्रश्नही विचारला. याला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी काल (6 जुलै) दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती. या सभेत त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार करत, "मी 82 वर्षांचा असो वा 92 वर्षांचा, मी नेहमीच प्रभावी असीन.", असं वक्तव्य केलं आहे. 


दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अन्य 9 नेत्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये औपचारिकपणे पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार करत राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष मीच आहे, असं ठणकावून सांगितलं. 


शरद पवारांना त्यांच्या वयावरुन काय म्हणाले होते अजित पवार? 


अजित पवार यांनी बुधवारी (5 जुलै) वांद्रे येथे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं आणि आपल्या काकांना निवृत्त होण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले होते, "सरकारी अधिकारी वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजप नेते वयाच्या 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होतात, तुमचे वय 83 आहे, तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल."


शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं... तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा... मार्गदर्शन करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच, शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत, असंही अजित पवार म्हणाले. 


"राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा कायदेशीर अधिकार नाही"


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावल्यावर अजित पवार यांच्या गटानं आक्षेप घेतला आणि त्यांना तसं करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचं सांगितलं. अजित पवार गटाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पण त्यांना अशी बैठक बोलावण्याचा कायदेशीर अधिकार नाही. 


अजित पवार गटानं दावा केलाय की, "अजित पवार यांची 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनात्मक पदं भूषविलेल्या सदस्यांच्या प्रचंड पाठिंब्यानं त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणालाही नाही."


दरम्यान, दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच, या परिस्थितीत शरद पवारांसोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra NCP Crisis : अजित पवारांचा थोरल्या पवारांवर हल्लाबोल; केले 'हे' 4 गौप्यस्फोट