Maharashtra Politics:  अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी दिसून आली. शिंदे गटाच्या आमदारांना मिळणारी मंत्रिपदे कमी झाल्याने इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असल्याची चर्चा सुरू झाली. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज खलबतं झाली. नंदनवन बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. 


या बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


आता होणाऱ्या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना सर्वाधिक स्थान मिळणार असल्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.


महामंडळाचे वाटप होणार


मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा  प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.  हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी? 


लवकरच मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याची अपेक्षा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवारांच्या एन्ट्रीने धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तर गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहे. त्यामुळे आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही देखील बंड केला होता, आम्ही फक्त पालख्या वाहत राहायचे का? असा प्रश्न नाराज आमदारांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. 


भाजपमध्येही नाराजी? 


मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: