Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसानं हजेरी लावलेली नाही. काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळं  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


कोकणात जोरदार पाऊस, रत्नागिरी शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली 


कोकणात सध्या चांगलाच पाऊस बसतोय. त्यामुळं येथील पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्णपणे भरले असून सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळं रत्नागिरी शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.


मुंबईतही जोरदार पावसाची हजेरी


मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळत आहे. 


हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस


हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी या पावसानं हजेरी लावली आहे. वसमत तालुक्यातील आकोली वसमत रोडवर आसलेल्या ओढ्याला या पावसामुळे पूर आला होता. तर पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मानवी साखळी करत ओढ्यातील पुरातून बाहेर काढले. 


जळगावमध्ये दमदार पाऊस


जळगावमध्ये पहिल्याच दमदार पावसाने अनेक घरात पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान झाले. जळगाव शहरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 मिनीटे मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
यानंतर मात्र शहरातील मेहरुन परिसरातील आणि तांबा पूर परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरात असलेल्या नाल्यावरील पाईप लाईन चोक अप झाल्यानं नाल्यातून वाहून जाणारे पाणी हे नाल्यात न जाता आजू बाजूच्या वस्त्यांमध्ये शिरल्यानं घरातील साहित्याचे नुकसान झाले. 


नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात पाच टक्क्यांची वाढ


गेल्या आठवडभरात नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विशेष म्हणजे धरणक्षेत्रात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने आठवडाभरातच जिल्ह्यातील धरणसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ होऊन धरणसाठा 26 टक्क्यांवर आला आहे. पावसाचा जोर बघता अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांना देखील सुरुवात केली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून पुन्हा पाऊस गायब झाला असून धरण परीसरात देखील कडाक्याचे ऊन पडल्याने चिंता व्यक्त केली जातेय. समाधानकारक पाऊस कोसळावा आणि धरणं तुडुंब भरावी अशीच अपेक्षा नाशिककर सध्या व्यक्त करतायेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, नद्यांना आले पूर