मुंबई : सत्ता येते सत्ता जाते पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ झालेलं मी पाहिले नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांनी भाजपवर  निशाणा साधला आहे.  गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीला  शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 


सरकार चांगले काम करते म्हणून अनेकांना अस्वस्थता : शरद पवार


शरद पवार म्हणाले, उद्याच्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.  दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले आहे. तुमचे सरकार चांगले काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे.


नवाब मलिकांच्या अटकेनंतर मागे न हटण्याचा ममतांचा पवारांना सल्ला


नवाब मलिकांच्या अटकेवर शरद पवार म्हणाले,  नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले आमच्याकडे चार लोकांना अटक झाली मात्र आम्ही मागे हटलो नाही लढलो संघटना वाढवली. तुम्ही देखील  तेच करा.  नगरपंचायत निवडणुकीत  महाविकास आघाडीने चांगली कामगिरी  केली. जनता तुमच्या बरोबर आहे.  लोकांचा पाठिंबा आहे.  जनतेशी असलेल्या बांधिलकीमध्ये तडजोड करायची नाही.


 रशिया - युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी काळजी नाही : शरद पवार


रशिया - युक्रेन युद्धावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये  भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. मोदी सरकारचे चार मंत्री तिकडे गेले आहेत.  परंतु एकही मंत्री युक्रेन किंवा रशियात गेले नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडले नाही, असा आरोप शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha