Navratri 2022 : 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सावाला (Navratri 2022) सुरुवात होतेय. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा असल्याने सगळीकडेच नवरात्रोत्सवाची रेलचेल पाहायला मिळतेय. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारपासून सुरुवात होतेय. या ठिकाणी मंदिर संस्थानाच्या वतीने तुळजापुरात जोरदार तयारी सुरु आहे.
मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता सगळे सण निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे.
राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांची मंदिरात उपस्थिती
महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी त्यांनी वाजत गाजत "आई राजा उदो"चा गजर केला. भवानी ज्योत प्रज्वलित केली. आज या तिर्थक्षेत्री तरूणाईचा जागर दिसून आला. तसेच, रविवार म्हणजेच (25 सप्टेंबर रोजी) सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असल्याने तिर्थक्षेत्र तुळजाई नगरीत पोलिसांनी कडक सुरक्षायंत्रणा केली आहे.
देवी नवरात्रोत्सवात घटस्थापना करण्यासाठी देवीची भोगीपूजा करुन पूजेचे श्रीफळ घटस्थापना करण्यासाठी वापरण्याची प्रथा असल्याने नवरात्रोत्सव मंडळं घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेतात. या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या चोहीबाजूंच्या रस्त्यावर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भवानी ज्योत घेऊन जात असल्याचे दिसून आले. वर्षानुवर्ष भवानी मंदिरात ज्योत प्रज्वलित करुन नेणा-या मंडळाच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचे नवरात्रोत्सव मंडळ या तिर्थक्षेत्री येत आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वीच तुळजापूर नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी जमा होत आहे.
तुळजापुरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी
भवानी कुंड आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात येत आहे. कुंडामध्ये एकावेळी एक हजार भाविकांच्या स्नानाची सोय करण्यात येणार आहे. तसेच, शहरात विविध ठिकाणी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी शहरातील सर्व मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्ग बॅरिकेटींग लावून बंद करण्यात आले आहेत. शहरातील सर्व वाहनतळ तसेच जुन्या बसस्थानकासमोर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांती चौक, बाबाजी अड्डा, तुळजापूर खुर्द यांसारख्या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना विद्युत रोषणाई
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या ठिकाणी छबिना वाहन अर्पण सोहळा शुक्रवार (23 सप्टेंबर रोजी) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तुळजाभवानी राजेशहाजी महाद्वार राजमाता जिजाऊ तसेच मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई पुणे येथील देवीभक्त विजय उंडाळे नितीन उंडाळे तसेच संजय टोळगे सोमनाथ टोळगे, गौरव टोळगे, सौरव परिवाराने केली.
तुळजाभवानी मातेच्या छबिना काढण्यासाठी चांदीचे आवरण असलेले नंदी मोर गरुड हे देवीजींचा छबिना काढण्यासाठी लागणारे वाहने आज देवीच्या चरणी अर्पण केले. यावेळी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय अधिकारी तसेच तहसिलदार योगिता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.