Dapoli Resort Kirit Somaiyya Anil Parab: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या  (Kirit Somaiya)अनिल परब यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्ट प्रकरणी (Dapoli Resort) आक्रमक झाले आहेत. सदानंद कदम यांनी हायकोर्टात रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेली याचिका खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. खोटी याचिका दाखल करून सदानंद कदम हायकोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे सोमय्यांनी म्हटले. सदानंद कदम हे रिसॉर्टचे मालक असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. तर, सोमय्यांच्या दाव्यानुसार दापोलीतील साई रिसॉर्ट (Dapoli Sai Resort)हे कदम नव्हे तर अनिल परब (Anil Parab) यांच्या मालकीचे असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. 


दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. अनिल परब यांनी आपला या रिसॉर्टशी संबंध नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. परब यांच्या दाव्यानुसार, सदानंद कदम यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट आहे. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सदानंद कदम यांची याचिका खोटी आणी दिशाभूल करणारी आहे. हायकोर्टाचा वेळ महत्वाचा आहे. खोट्या याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचं काम सदानंद कदम करत असल्याचे त्यांनी म्हटले. 


सोमय्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जुलै, 2018 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथपत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे घोषित केले होते. मूळ जमीन मालक विभास साठे यांच्याकडून एक कोटी रुपये देऊन दापोली रिसॉर्टची मुरुड गावातली जमीन विकत घेतले असल्याचे अनिल परब यांनी आपल्या निवडणुकीच्या मालमत्ते मध्ये (Assets) नमूद केले होते. या संबंधी अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सोमवरी सुनावणी होणार आहे. त्यात माझा हस्तक्षेप अर्ज (intervention application) दाखल केला असल्याचे सोमय्यांनी म्हटले. सोमवारी सदानंद कदम यांच्या याचिकेसोबत आता माझ्या हस्तक्षेप याचिकेची सुद्धा सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अनिल परब यांचा रिसॉर्टशी संबंध कसा, सोमय्यांनी क्रोनोलॉजी सांगितली


महावितरणने किरीट सोमय्या यांना दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांनी या रिसॉर्टच बांधकाम करण्यासाठी 3 फेज मीटर वीज जोडणी 5 मार्च 2020 रोजी घेतली होती. या मीटरच्या वीज पुरवठ्या प्रमाणे मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत या रिसॉर्टच बांधकाम गतीने करण्यात आल्याचे दिसत आहे. या 12 महिन्यांत वीज बिल अनिल परब यांच्याच नावाने येत होते. अनिल परब स्वतःच्या बँक खात्यातून वीज देयकाचे भरणा करत असल्याचे सोमय्यांनी सांगितले. चार मार्च 2021 रोजी वीज जोडणी सदानंद कदम यांच्या नावे हस्तांतरण करण्यात आले असल्याची माहिती सोमय्यांना महावितरणने दिली आहे. 26 जून 2019 रोजी अनिल परब यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने मुरुड ग्रामपंचायत, दापोली येथील सरपंच यांच्या नावाने पत्र दिले होते. "श्री विभास साठे कडून दापोली साई रिसॉर्टची जमीन अनिल परबने घेतली आणी त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम  अनिल परबच्या नावे करण्यात यावे" असा अर्ज दिला होता, असा दावा सोमय्यांनी केला. 


या रिसॉर्टची वर्ष 2019-20 ची घरपट्टी 14 नोव्हेंबर 2019 रोजी 46,806 रुपये अनिल परब यांनी स्वतःच भरली होती. वर्ष 2020-21 ची 46,806 रुपयांची घरपट्टी ही 17 डिसेंबर 2020 रोजी अनिल परब यांनी भरली होती. यांच्या पावत्याही आमच्याकडे उपलब्ध असल्याचे सोमय्यांनी सांगितले. दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे मूळ मालक  विभास साठे यांनी राष्ट्रीय हरित लवादा येथे दाखल केलेल्या शपथपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की त्यांनी जमीन मे/जून 2017 मध्ये अनिल परब यांना विकली आणि त्याचा ताबा परबांकडे दिला. त्यावरील सर्व बांधकाम हे अनिल परब यांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले असल्याचे सोमय्यांनी सांगितले. 


सदानंद कदम यांनी 27 जानेवारी 2021 रोजी मुरुड ग्रामपंचायत यांना दिलेल्या अर्जात स्पष्टपणे म्हटले आहे की गाव मुरुड, गट क्र. 446 वरील मालमत्ता क्र. 1074 म्हणजेच साई रिसॉर्ट हे,अनिल परब यांचे नावे असून ते आता त्यांनी अनिल परब कडून विकत घेतले असल्याने सदानंद कदम यांच्या नावाने करावे असा आग्रह केला होता. अनिल परब यांनीच दापोली येथील साई रिसॉर्टची जमीन विकत घेतली, ताबा घेतला, त्यावरील संबंधित बांधकाम, बिनशेती परवानगी अर्थात NA करीता अर्ज त्यांच्याद्वारेच करण्यात आले असल्याचा दावा सोमय्यांनी केला. रिसॉर्टचे बांधकाम त्यांनीच केले असून त्याची घरपट्टी, मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या खात्यातून भरली. कोविड लॉकडाऊनमध्ये या रिसॉर्टचे बांधकाम गतीने करण्याचे काम सुद्धा अनिल परब यांनीच केले असून आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला.