Sheetal Mhatre : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्वीट करत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. हा फोटो मॉर्फ केलेला आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं याविरोधात आदिती नलावडे (Aditi Nalawde) यांनी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी आक्रमक झाल्यानंतर शितल म्हात्रे यांनी घुमजाव केलं आहे. हा फोटो खरा असल्याचा आपण कुठेही दवा केला नसल्याचे म्हात्रे यांनी म्हटलं आहे.


नेमकं प्रकरण काय?


राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला होता. यामध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्वीट करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? असा सवाल म्हात्रेंनी उपस्थित केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यांच्या या ट्वीटचा राष्ट्रवादीने विरोध केला आहे. हा बदनामीचा डाव असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत म्हात्रे म्हणाल्या की, मी दावा केलेला नाही तर मी प्रश्न विचारलाय की कुणाच्या खुर्चीत कोण बसलंय.


 






श्रीकांत शिंदे यांचा फोटो देखील एडिट केलाय : म्हात्रे


सुप्रिया सुळे यांचा फोटो जर एडिट केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा फोटो देखील एडिट केला असल्याचा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडून पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असंही शितल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.


 






आदिती नलावडे यांनी नेमकं काय म्हटलंय


सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. हा फोटो मॉर्फ केलेला फोटो आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं याविरोधात मी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. याविरोधात कारवाई होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे आदिती नलावडे यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार, श्रीकांत शिंदेंचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा आरोप