Nashik Forest Fire : नाशिक जिल्ह्यातील वनक्षेत्रांमधील आगीच्या घटनांमध्ये (Fire in Forest) सातत्याने वाढ होत असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र नष्ट होऊ लागल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराजवळील बोरगड, पांडवलेणी, रामशेज (Ramshej), मातोरी या परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत. आता नाशिक इतर भागातील वनपट्ट्यात आगीच्या घटना घडण्यास सुरवात झाली आहे. नुकतेच त्र्यंबक (Trimbakesher) वनपट्ट्यातील रोहिले डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीत बरीचशी वनसंपदा जळून खाक झाली आहे. 


दरवर्षी नाशिक (Nashik) शहराजवळील डोंगररांगासह जिल्ह्यातील वनक्षेत्र असलेल्या त्र्यंबक डोंगररांगांना आग लागल्याच्या घटना घडतात. मार्च सुरु झाला की आग लागल्याचे प्रकार घडतात. यात हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक होते. परिणामी इथं वास्तव्यास असलेले प्राणी, पक्षी, वन्यप्राणी आदींचा होरपळून मृत्यू होतो. काही दिवसांपूर्वीच मातोरी परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली. त्यानंतर काल सायंकाळी त्र्यंबक तालुक्यातील रोहिला डोंगरास सहा वाजेच्या सुमारास आग लागली. यानंतर सुमारे आठ तासांहून अधिक काळ ही आग धुमसत होती. दरवर्षी यावेळी रोहिले डोंगरास आग लागण्याचा प्रकार चिंताजनक आहे. 


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात अनेक डोंगररांगा आहेत. तसेच वनसंपत्ती आणि नैसर्गिक वनॊऔषधी मोठ्या प्रमाणात आढळून येते. परंतु गत काही वर्षांपासून वनक्षेत्रांमधील वणवा लागण्याचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये मोठी वृक्षसंपदा नष्ट झाली आहे. त्र्यंबक वनपट्ट्यातील या डोंगरावर नव्याने लावण्यात आलेली झाडेही अशा वणव्यांचा शिकार झाल्याचे पाहायला मिळते. 'एकच लक्ष एक कोटी वृक्ष' या मोहिमेच्या अंतर्गत हजारो झाडे लावण्यात येतात. परंतु दरवर्षी वणवा लागण्याचे प्रकार घडत असल्याने उघडी बोडकी झाडेच पाहायला मिळत असल्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


नेमकी आग लावतंय कोण? 


दरवर्षी आग लागून हजारो झाडांचे नुकसान होण्याचा प्रकार घडत असतांना वनविभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसून येते. आग लागल्यानंतर ग्रामस्थ कोणत्याही अग्निशमन साधनशिवाय आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी वनविभागाशी तात्काळ संपंर्क न झाल्याने आगीचे रूपांतर वणव्यात होते. परिणामी अधिक नुकसान होते. एकीकडे जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम करायचे, याला अर्थ नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. 



औषधी वनस्पतींचे नुकसान


जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलातील औषधी वनस्पती नष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे या औषधी वनस्पती जतन करणे गरजेचे झाले आहे. वनसंपत्तीबरोबरच प्राण्यांवरही परिणाम होत असून त्या वन्यप्राण्यांच्याही सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर येत आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.